रस्त्याच्या दुर्दशेमुळे घडली होती दुर्घटना
म्हापसा : काणका येथील मिल्टन मार्कीस जंक्शनजवळ शुक्रवारी सकाळी झालेल्या दुचाकी अपघातात लक्ष्मी सावंथी (वय ४५, रा. पर्रा) या महिलेचा उपचारादरम्यान गोमेकॉ रुग्णालयात मृत्यू झाला. दुचाकीवरील पायलटचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. येथील रस्त्याची दुर्दशाच या दुर्घटनेस कारणीभूत ठरली.
लक्ष्मी सावंथी ही म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्यावेळी जाणाऱ्या एका दुचाकी पायलटला थांबवत त्यांनी लिफ्ट घेतली. मात्र, काणका येथे पोहोचताच खराब रस्त्यामुळे दुचाकी डळमळली आणि मागे बसलेल्या लक्ष्मी यांचा तोल जाऊन त्या रस्त्यावर कोसळल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली.
प्रथम त्यांना म्हापसा जिल्हा इस्पितळात नेण्यात आले आणि नंतर गोमेकॉत दाखल करण्यात आले. रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. म्हापसा पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.