आतापर्यंत लैंगिक अत्याचाराचे ६४, अपहरणाचे ४८ गुन्हे नोंद
म्हापसा : अल्पवयीन मुलांमध्ये मोबाईलचा अतिवापर आणि त्यातून सोशल मीडियावर होणार्या मैत्रीतून राज्यात अपहरण तसेच बलात्काराच्या गुन्ह्यांत मोठी वाढ झाली आहे. मागील सहा महिन्यांत गोव्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत बलात्कार ३५ टक्के तर अपहरण प्रमाणात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा जानेवारी ते आतापर्यंत लैंगिक अत्याचाराचे ६४ तर अपहरणाचे ४८ गुन्हे नोंद झाले आहेत.
बलात्काराची उत्तर गोव्यात ४२ तर दक्षिण गोव्यात २२ प्रकरणे घडली आहेत. उत्तर गोव्यात अपहरणाचे ३१ तर, दक्षिण गोव्यात १७ गुन्हे नोंदवले गेले असून २०२४ च्या तुलनेत या गुन्ह्यांची टक्केवारी जास्त आहे.
सोशल मीडियावरील विविध डेटींग संकेतस्थळ आणि अॅपवर होणारी मैत्री, त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण होतात. नंतर प्रत्यक्षात भेटण्याचा मोह निर्माण होऊन घर सोडून पळून जाणे. प्रियकरासोबत त्याच्या राज्यात जाणे, असे या अपहरण व बलात्कार प्रकरणातील बहुतेक गुन्हे आहेत.
बर्याचशा घटनांमध्ये फूस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलींसोबत लग्न केल्याचे प्रकारही पोलीस चौकशीत आढळून आले आहेत. संशयित मुलाच्या पालकांच्या संमतीने किंवा परस्पररित्या हे बाल विवाहाचे प्रकार घडलेले आहेत. सदर मुलींची पोलिसांकडून सुटका केल्यानंतर ही गोष्ट समोर येते. यामुळे वैद्यकीय अहवालाच्या आधारे हे अपहरण प्रकरण बलात्काराच्या गुन्ह्यात वर्ग करणे पोलिसांना भाग पडते.
सोशल मीडियावरील मैत्रीच्या आधारे भेटण्यासाठी बोलावणे व नंतर तिथे शारिरीक संबंध निर्माण होण्याचा प्रकारही हल्लीच आगशी पोलिसांत नोंद झालेल्या एका लैंगिक अत्याचार प्रकरणातून दिसून आला आहे.
पीडित सज्ञान असल्यास आणि अनेक दिवस किंवा महिने संबंध ठेवल्यानंतर प्रियकर आपल्याशी लग्न करण्यास तयार नसल्याची जाणीव होते. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याच्या तक्रारीचे अस्त्रही वापरण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. पर्वरी पोलिसांत हल्लीच नोंद झालेल्या गुन्ह्यातून हा प्रकार दिसून आला आहे.
उत्तर गोव्यातील तिसवाडी व बार्देश तालुक्यात तर, दक्षिण गोव्यातील सासष्टीमध्ये लैंगिक अत्याचार व अपहरण या गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे.
मुलांना समुपदेशनाची गरज
अल्पवयीन मुलींच्या अपहरणामागे प्रेमसंबंध, आकर्षण हेच प्रमुख कारण असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे शालेय पातळीवर तसेच घरी पालकांमार्फत मुलांना समुपदेशन देण्याची गरज आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना समुपदेशन दिले जाते. परंतु सोशल मीडिया अकाऊंट हाताळताना आणि त्यातून उद्भवणार्या परिणामाविषयी सविस्तर आणि मुलांना समजेल अशी माहिती आणि धडे आपल्या पाल्यांना देण्याची आवश्यकता आहे.