शिरदोण अपघातातील कार चालकावर गुन्हा नोंद

तीन वाहनांचा झाला होता अपघात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th July, 11:21 pm
शिरदोण अपघातातील कार चालकावर गुन्हा नोंद

म्हापसा : शिरदोण, गोवा वेल्हा येथील उड्डाणपुलावर झालेल्या तीन वाहनांच्या भीषण अपघातात रेनॉ कारचालक आदित्य अमोल तिळवे (२२, रा. आके मडगाव) हा ठार झाला. तर, चार जण जखमी झाले असून त्यातील एकावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मृत कार चालकाविरुद्ध आगशी पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

अपघात शुक्रवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास घडला होता. आदित्य हा पणजीहून आगशीच्या दिशेने जीए ०६ ई ७६८१ क्रमांकाच्या रेनॉ कारने जात होता. उड्डाणपुलावर ही कार पोहोचताच संशयिताचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कारने दुभाजकावरून विरुद्ध दिशेने जाऊन जीए ०७ एफ ८१९२ क्रमांकाची क्रेटा कार आणि केए ४७ जे ८७०३ क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. नंतर रेनॉ कार उलटल्याने चालक आदित्य हा गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. तर, क्रेटा कार चालक नागराज मालगीमनी (३८, खोर्ली तिसवाडी) व समीर कुमार डे (३६, गुजरात) आणि मोटरसायकलवरील भटकळ कर्नाटक येथील फैहान सौदागर (२१) व त्याची पत्नी फातिमा सौदागर (१८) जखमी झाले. जखमीपैकी समीर डे याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. इतरांना घरी पाठवण्यात आले.

अपघातास कारणीभूत कार चालक आदित्य तिळवे याच्याविरुद्ध बेदरकार आणि निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार उदय पालकर यांनी तक्रार नोंद केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत. 

हेही वाचा