जर तुम्हाला आध्यात्मिक मार्गावर चालायचे असेल, तर तुमचे अंतरंग आनंदी ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण तो एक आव्हानात्मक मार्ग आहे. जर तुम्हाला तुमचे अंतरंग आनंदी कसे ठेवायचे हे माहित असेल, तर या मार्गावर चालणे ही एक आनंददायी प्रक्रिया बनते.
प्रश्न : एखाद्याला गुरूंप्रति प्रेम वाटले पाहिजे का? ही भावना आमच्यापैकी अनेकजण अनुभवतात.
सद्गुरू : तुमचे प्रेम कोणीही असो - गुरू, पर्वत, तुमचे पती, तुमची मुले, किंवा काहीही - ती केवळ तुमची भावना आहे. ती चूक किंवा बरोबर नाही, पण आत्ता, जर ती तुमच्या जीवनातली तुम्हाला माहित असलेली सर्वात तीव्र गोष्ट असेल, तर तिला आणखी तीव्र करा. पण तशीही ती मूर्खपणाची गोष्ट आहे. कारण तुम्हाला दुसरे काही चांगले माहित नसल्यामुळे, तुम्ही ते करत आहात.
जेव्हा मी "मूर्खपणाची" म्हणतो, तेव्हा मी हे म्हणत नाही की तुम्ही ती नष्ट करावी. तुम्ही ती नष्ट करू शकत नाही. तुमच्या आतील सर्वात आनंददायी स्थिती म्हणजे जेव्हा तुम्ही प्रेमात असता ती. लोक नेहमी दैवी प्रेमाबद्दल बोलतात, पण प्रेम ही एक मानवी भावना आहे. तुमच्यासाठी अस्तित्वात असण्याचा प्रेम हा एक अद्भुत मार्ग आहे. पण तो सर्वोच्च मार्ग आहे का? नाही. प्रेम म्हणजे, मुळात, तुम्ही अजूनही कोणत्यातरी गोष्टीशी किंवा कोणासोबततरी एक होण्याची ईच्छा बाळगत आहात. तुम्ही केवळ ईच्छा बाळगून आहात. ती तुम्हाला कधीच तिथे पोहोचवत नाही. प्रेम हे गंतव्यस्थान नाही. प्रेम हे फक्त एक वाहन आहे, जे तुम्हाला एका विशिष्ट दिशेने घेऊन जाते.
आनंदाने मार्गक्रमण करणे
प्रेम तुम्हाला अगदी एक असल्याची भावना देते, पण ते तुम्हाला खरोखर कधीच एक बनवत नाही. म्हणून एका ठराविक टप्प्यावर, जेव्हा ते तुम्हाला घेऊन जात असते, पण कुठेही पोहोचवत नाही, तेव्हा तुम्ही तुमच्या प्रेमामुळे पुरेसे निराश होता. जर तुम्ही कधी हिमालयात बस प्रवास केला असेल, तर असे वाटते की ते कुठेच पोहोचत नाहीत. असे वाटते की संपूर्ण गोष्ट ही बसमधून प्रवास करण्याबद्दल आहे. सुरुवातीला, ते मजेदार असते. काही वेळानंतर मात्र, प्रवास कितीही सुखद किंवा सुंदर असला तरी, तो निराशाजनक वाटणे अपरिहार्य आहे कारण तुम्हाला कुठेतरी जायचे असते. तुम्हाला कशासोबत तरी एक व्हायचे असते.
आत्ता तुम्ही बसमध्ये आहात - ते ठीक आहे. पण जर बस कुठेही जात नसेल, तर त्याला काही अर्थ राहत नाही. म्हणून जेव्हा तुम्ही "गुरूंप्रति प्रेम" म्हणता, तेव्हा तुमच्या प्रेमाचे लक्ष्य काय आहे हे महत्त्वाचे नसते: तुम्ही पर्वतांवर प्रेम करत आहात, किंवा गुरूंवर, किंवा मंदिरावर, किंवा तुमच्या आईवर, किंवा तुमच्या वडिलांवर. मुद्दा तो नाही. मुद्दा हा आहे की, जर तुम्ही स्वतःला प्रेमाच्या वातावरणात रूपांतरित केले, तर या जगातून अधिक आनंदाने पार जाण्याची शक्यता निश्चितच तुमच्यासाठी उपलब्ध आहे, तुमच्या आजूबाजूला काहीही घडत असले तरी. विशेषतः जर तुम्हाला आध्यात्मिक मार्गावर चालायचे असेल, तर तुमचे अंतरंग आनंदी ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण तो एक आव्हानात्मक मार्ग आहे. जर तुम्हाला तुमचे अंतरंग आनंदी कसे ठेवायचे हे माहित असेल, जर तुमच्या भावना नेहमी आनंदी असतील, तर या मार्गावर चालणे ही एक आनंददायी प्रक्रिया बनते.
जर तुम्ही अशा प्रकारे नसाल, जर तुमच्या आत प्रेम नसेल, तर तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचा आनंद माहित असला पाहिजे - कशाबद्दल तरी आनंदी असणे नाही - केवळ तुमचे असणे आनंदी आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशी गोड झाली आहे. तुम्ही कोणावरही प्रेम करत नाही, तुम्हाला कोणी आवडत आहे किंवा नापसंत आहे असे नाही - तुम्ही फक्त आनंदी आहात.
जेव्हा तुम्ही स्वतःच्या आत इतके गोड आणि आनंदी असता, तेव्हा तुमची उपस्थिती आनंददायी असते. आनंदी राहण्यासाठी तुम्हाला भावना उत्तेजित करावी लागत नाही. तुम्ही ज्या कशाकडे पाहता, तुम्ही ज्या कशाला स्पर्श करता किंवा स्पर्श करत नाही - असे सर्वकाही गोडवा म्हणून अनुभवले जाते. तुम्ही अशा प्रकारे होईपर्यंत, सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रेमात
असणे.
एका विशिष्ट गैरसमजुतीमुळे आणि एका विशिष्ट समजुतीमुळे गुरूंवरच्या प्रेमाला इतके महत्त्व दिले गेले आहे. ज्या क्षणी तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता, तेव्हा तुम्ही अशी अपेक्षा करता की त्या व्यक्तीने प्रतिसाद दिला पाहिजे. जेव्हा ती व्यक्ती प्रतिसाद देते, तेव्हा दोन लोकांमध्ये एक देवाणघेवाण होते. काही वेळानंतर, ही देवाणघेवाण अपेक्षा आणि बंधनाच्या जाणीवेकडे जाते. मग एक विशिष्ट प्रकारचे वर्तन आणि जीवनाची पद्धत अपेक्षित असते. नाहीतर ते एकाला किंवा दुसऱ्याला प्रचंड वेदना देते.
भावनेपासून ऊर्जेपर्यंत
गुरूंवरच्या प्रेमाबद्दल बोलले गेले आहे, कारण तो गुरु फक्त अशा एका मर्यादेपर्यंत खेळ खेळत आहे, की तुम्ही त्याच्या प्रेमात पडावे, पण त्याच वेळी तो तुमच्यासोबत कधीही गुंतणार नाही. तुम्ही त्याच्यासोबत तुम्हाला हवे तितके गुंतू शकता. त्याने तुम्हाला पकडून ठेवण्याचा कोणताही धोका नाही. म्हणून तुम्ही सखोल गुंतण्याच्या एका विशिष्ट टप्प्यातून जाल; ते ठीक आहे. पण हळूहळू, जर तुम्ही तुमची साधना चालू ठेवली, तर तुम्हाला आढळून येईल की, प्रेम ही आता केवळ एक भावना राहिलेली नाही, ती फक्त ‘तुम्ही ज्या एका विशिष्ट प्रकारे आहात’ ते बनले आहे. तुमच्या ऊर्जा त्याच्यासोबत स्पंदित होत आहेत. ती आता भावनिक राहिलेली नाही.
भावनिक स्थितीपासून, हळूहळू आपण ते ऊर्जा स्थितीकडे स्थलांतरित करू शकतो. गुरूशी तुमचा संबंध केवळ ऊर्जात्मक आहे, आणि ते खूप चांगले आहे. अस्तित्वात असण्याचा तो एक अद्भुत मार्ग आहे कारण त्या स्थितीत, परमोच्च शक्यता खूप जवळ आहे. त्या स्थितीत, गुरूला जे करायचे आहे ते करण्यासाठी खूप अधिक स्वातंत्र्य असते. पण सध्या, भावना तुमचा एक महत्त्वाचा भाग आहे, जी तुम्हाला एका दिशेने नेत आहे. भावनेशिवाय, तुम्ही सहभागी होऊ शकत नाही. तुम्ही सध्या अशा प्रकारे बनलेले आहात, म्हणून भावना ठीक आहे; त्यात काही चूक नाही.
(ईशा फाऊंडेशन)