गेल्या काही महिन्यांपासून गोवा हे गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले आहे. विविध राज्यांचे पोलीस आणि तपास यंत्रणांनी गोव्यात लपलेल्या अनेक गुन्हेगारांना अटक केली आहे. काही वेळा स्थानिक पोलिसांच्या मदतीने, तर काही वेळा त्यांना कळू न देता या कारवाया त्या त्या राज्यांतील पोलिसांनी केलेल्या आहेत. बांगलादेशी नागरिकांनाही गोव्यातून पकडून त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आले आहे. यावरून राज्यातील वाढती गुन्हेगारी अधोरेखित होते.
गोव्यासारख्या प्रमुख पर्यटनस्थळी देशी-विदेशी पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र, याच पर्यटनाच्या नावाखाली परप्रांतीय गुन्हेगार येथे आश्रय घेत आहेत. इतर राज्यांत गुन्हे करून गोव्यात लपून बसणे गुन्हेगारांना सुरक्षित वाटू लागले आहे. धक्कादायक म्हणजे, काही गुन्हेगार राष्ट्रविरोधी कारवायांमध्येही सहभागी असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने यापूर्वी अनेकदा गोव्यातून दहशतवादी आणि संघटित गुन्हेगारांना पकडले आहे. उत्तर प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, मुंबई पोलिसांनीही गोव्यात कारवाया केल्या आहेत. त्यावेळी त्यांनी स्थानिक पोलिसांची मदत घेतली नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड हेडली आणि इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक यासीन भटकळ यांनीही गोव्यात वास्तव्य केल्याचे उघड झाले होते. नुकतेच, पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया सदस्यांवरही एनआयएने कारवाई केली, परंतु यापैकी अनेक घटनांची स्थानिक यंत्रणांना माहिती
नसते.
१९ जुलै रोजी उत्तर प्रदेश पोलिसांनी 'मिशन अस्मिता' अंतर्गत गोव्यातून एका संशयित महिलेला अटक केली, जिचा संबंध बेकायदेशीर धर्मांतरण आणि ऑनलाइन कट्टरतेशी होता. उत्तर प्रदेश पोलिसांनी सांतआंद्रे मतदारसंघातील सातान तळावली परिसरात राहणाऱ्या मूळ ओडिशातील आयेशा ऊर्फ एस. बी. कृष्णा हिला अटक केली होती. ही कारवाई स्थानिक पोलिसांच्या मदतीशिवाय करण्यात आली होती.
यावर आळा घालण्यासाठी, गोवा पोलीस आणि स्थानिक यंत्रणांकडून भाडेकरू सत्यापनासाठी वारंवार आवाहन केले जाते. याचे उल्लंघन करणाऱ्या घरमालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते, काही प्रकरणांमध्ये कैदेची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.
ही गंभीर परिस्थिती रोखण्यासाठी कठोर कायद्यांची अंमलबजावणी आवश्यक आहे. तसेच, राज्यातील पोलीस बीट यंत्रणा, स्थानिक गुप्तचर विभाग आणि भाडेकरू तपासणी यंत्रणा अधिक सक्रिय करणे गरजेचे आहे. यामुळेच गुन्हेगारी कारवायांवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येईल. यासाठी गोवा पोलिसांची गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्यता आहे.
- प्रसाद शेट काणकोणकर