आफ्रिकन देश कॅमेरूनचे ९२ वर्षीय राष्ट्राध्यक्ष पॉल बिया यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. गेल्या ४३ वर्षांपासून सत्तेत असलेले बिया यांनी सोशल मीडियावर ही घोषणा केली. देशसेवेसाठी आपण पूर्णपणे तयार असून देश-विदेशातील अनेकांनी निवडणूक लढविण्याची मागणी केल्याने हा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी लिहिले आहे. मात्र, ही मागणी खरोखरच जनतेने केली होती की केवळ दाखवण्यासाठी होती, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पॉल बिया १९८२ मध्ये कॅमेरूनचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि त्यानंतर ते कधीही निवडणूक हरले नाहीत. प्रत्येक वेळी ते पुन्हा सत्तेत येतात. पुन्हा पुन्हा निवडणूक लढवता यावी यासाठी त्यांनी एकदा देशाची राज्यघटना बदलली होती. २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत ते ७१ टक्के मतांनी विजयी झाले होते, परंतु विरोधकांनी त्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता.
यावेळीही ते जिंकल्यास वयाच्या जवळपास १०० व्या वर्षापर्यंत ते देशाचे राष्ट्रपती राहू शकतात, जे जगातील कोणत्याही लोकशाही देशासाठी असामान्य आहे. गेल्या वर्षी बिया जवळपास सहा आठवडे सार्वजनिकपणे दिसले नव्हते, ज्यामुळे त्यांच्या निधनाची अफवा पसरली होती. मात्र, नंतर ते एक-दोन बैठकांमध्ये दिसले. आता लोकांचे म्हणणे आहे की त्यांचे वय आणि तब्येत दोन्ही या मोठ्या जबाबदारीसाठी योग्य नाहीत, तरीही त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
बिया यांनी आता सत्ता सोडावी, अशा निषेधाचे सूर कॅमेरूनच्या आतून आणि बाहेरून देशात उमटत आहेत. जनतेला नव्या, तरुण आणि गतिमान नेत्यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा आहे. बियांचे काही जुने आणि विश्वासू नेतेही त्यांच्या विरोधात गेले आहेत. ज्या नेत्यांनी त्यांना पूर्वी निवडणूक जिंकण्यास मदत केली होती, त्यांनी आता स्वतः निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. इसा चिरोमा बकरी आणि बेलो बुबा मगरी या प्रमुख नेत्यांनी सत्ताधारी पक्षाशी संबंध तोडले असून, बिया यांनी लोकांचा विश्वास तोडल्याचा आरोप केला आहे.
दुसरीकडे, बिया यांच्या समर्थनार्थही काही आवाज उठवले जात आहेत. काही लोकांचा असा विश्वास आहे की बिया यांनी देशात शांतता आणि स्थैर्य राखले आहे. एका महिला सल्लागाराने म्हटले की, तिला बदलाची गरज वाटत असली तरी सध्या बियापेक्षा चांगला पर्याय उपलब्ध नाही. दरम्यान, कॅमेरूनमधील ही आगामी निवडणूक पॉल बिया यांच्या दीर्घकालीन सत्तेला आणि देशाच्या राजकीय भवितव्याला कोणत्या दिशेने घेऊन जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
- सुदेश दळवी, गोवन वार्ता