'का य? हे कधी तरी शक्य आहे का?' अशीच प्रताक्रिया बहुतेकांच्या मनात शीर्षक वाचून आली असेल. ऐकायला अतिशय विचित्र वाटेल, पण झारखंडमधील धनबाद शहरातील एका वाईन शॉपमधून अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका ऑडिटदरम्यान तब्बल ८०२ वाईनच्या बाटल्या गायब असल्याचे उघड झाले, आणि यामागे उंदीर असल्याचा दावा दुकान कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला... आता यामागे खरे कारण काय आहे, याचा शोध स्थानिक अधिकारी घेत आहेत.
ही चक्रावणारी घटना बलियापूर परिसरातील प्रधानखंटा येथील एका वाईन शॉपमध्ये घडली. स्टॉक मॅचिंग, हँडओव्हर-टेकओव्हर, विक्री व ठेवीची प्रक्रिया सुरू असताना उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुकान उघडून पाहिले, तेव्हा अनेक बाटल्या तुटलेल्या अवस्थेत आढळल्या. काहींची झाकणेही ओरबाडलेली होती. अधिकाऱ्यांनी दुकानातील कर्मचाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली, तेव्हा त्यांनी यामागे उंदरांचा हात असल्याचे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे उंदीर दुकानात शिरले आणि त्यांनी दारूच्या बाटल्या फोडून त्यामधील दारू प्यायली.
या प्रकारामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या असून अधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला आहे. तथापी, उंदरांवर अशा प्रकारचे आरोप लावण्याची ही पहिलीच वेळ नाही. कारण, काही दिवसांपूर्वी धनबादमधील राजगंज पोलीस ठाण्यात जप्त केलेला गांजा उंदरांनी खाल्ला, असा आरोप करण्यात आला होता. आता दारूच्या साठ्याबाबतही त्यांच्याकडेच बोट दाखवले जात आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर 'धनबादचे उंदीर व्यसनी आहेत' अशी खिल्ली उडवली जात आहे.
उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले की, साठ्यातील नुकसान कोणत्याही कारणाने झाले तरी त्याची जबाबदारी संबंधित कंपनी किंवा तिचे कर्मचारी यांच्यावरच राहील. उंदरांच्या नावावर दारू गायब होणे ही गोष्ट गमतीशीर असली तरी शासकीय नोंदींमध्ये ती गंभीर अनियमितता ठरू शकते. दरम्यान, या प्रकारामुळे स्थानिक अधिकाऱ्यांची चाचपणी सुरू आहे. खरेच उंदरांनी ही करामत केली का, की कुणीतरी हेतुपुरस्सर या बाटल्या गायब केल्या, याचा तपास सुरू आहे. उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे की, साठ्यात तफावत आढळल्यास जबाबदारी कर्मचाऱ्यांचीच असेल. उंदीर असोत वा कुणीही, भरपाई स्टाफकडूनच वसूल केली जाईल. पण एक गोष्ट नक्की.. धनबादचे उंदीर ‘दारूचे दिवाने’ बनले आहेत का? यावरून सोशल मीडियावर हास्यविनोद आणि चर्चेला उधाण आले आहे.
प्रदीप जोशी,
(लेखक दै. ‘गाेवन वार्ता’चे उप वृत्तसंपादक आहेत)