स्वयंपाकघरातील सुपरहिरो मसाले आरोग्यदायी फायदे

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
7 hours ago
स्वयंपाकघरातील सुपरहिरो  मसाले   आरोग्यदायी फायदे

आज आपण स्वयंपाकघरातील काही खास मसाल्यांची ओळख करून घेणार आहोत. हे मसाले आपल्या रोजच्या जेवणात कमी प्रमाणात असले तरी त्यांचे फायदे मात्र खूप मोठे आहेत. हे छोटे सुपरहिरो आपल्याला आजारी पडू देत नाहीत आणि शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. विशेषतः पावसाळ्यात तर ते औषधाप्रमाणे काम करतात. चला तर मग, या सुपरहिरोंची सविस्तर माहिती घेऊया.

मिरी
काळी मिरीचे छोटे दाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
सर्दी झाली किंवा घसा दुखू लागला, तर चिमूटभर मिरपूड मधासोबत एकत्र करून चाटण घेतल्यास सर्दीपासून आराम मिळतो.
तुमची आई पावसाळ्यात तुळस, मिरी, आलं आणि गूळ टाकून जो काढा करते, तो घेतल्याने छातीतील कफ सुटतो आणि सर्दी कमी होते.

लवंग

पावसाळ्यात लवंग अत्यंत उपयुक्त आहे.
 वातावरण थंड झाल्यावर दातदुखीचा त्रास वाढतो. अशावेळी लवंगाचे तेल कापसाला लावून दुखणाऱ्या दाढेत धरल्यास तात्पुरता आराम मिळतो. दातांच्या डॉक्टरांकडे जाईपर्यंत हा उपाय निश्चितच उपयोगी पडतो.
खोकला झाल्यास मधात चिमूटभर लवंगपूड घालून चाटण दिल्यास खोकला कमी होतो.

आलं

पावसात आलं हमखास वापरले जाते. पावसाळ्यातील थंड वातावरणात गरमागरम आल्याचा वाफाळता चहा घरातील मोठ्यांचा अतिशय आवडीचाअसतो.

पावसाळ्यात बऱ्याचदा भूक लागत नाही.
अशावेळी आल्याचा छोटासा तुकडा चिमूटभर सैंधव लावून जेवणाआधी १५ मिनिटे चावून खावा. यामुळे भूक लागण्यास मदत होते. 
अन्न नीट न पचल्याने पोटात दुखत असल्यास, पाव चमचा आल्याचा रस, ७-८ थेंब लिंबाचा रस आणि चिमूटभर सैंधव घालून चाटण घेतल्यास पोटदुखी थांबते.
काढ्यात, चटणीत तसेच वेगवेगळ्या भाज्या बनवताना आलं वापरल्याने पदार्थांची चव तर वाढतेच, शिवाय ते पदार्थ पचायला सोपे होतात.

जिरे
गॅस, अपचन किंवा पोट फुगल्यास जिऱ्याचा गरम काढा प्यावा.
जेवणानंतर थोडेसे भाजलेले जिरं चावून खाल्ल्याने पचनक्रियेत मदत होते आणि पोट हलके वाटते.
पावसाळ्यात पोट बिघडल्यास आई किंवा आजी जिरं टाकून काढा करून देतात.
पावसाळ्यात चुकून पाय घसरून पडल्यास आणि पाय मुरगळल्यास, जिरे वाटून त्यात पाव चमचा सुंठ घालून लेप लावावा. या लेपाने वेदना कमी होतात आणि सूजही उतरते.

हे मसाले केवळ जेवणाची चव वाढवण्यासाठी नसतात, तर ते आपल्या शरीराचे वेगवेगळ्या रोगांपासून रक्षण करणारे खरे सुपरहिरो आहेत!


वैद्य कृपा नाईक,
आयुर्वेदाचार्य