आपण गोव्यात जाऊन विधानसभेत अर्थसंकल्प मांडणार असे पर्रीकर यांनी डॉक्टरांना सांगितले तेव्हा डॉक्टरांनाच धक्का बसला. व्हेंटिलेटरवर असलेल्या एखाद्या पेशंटने असे काही सांगितले असते तर डॉक्टरने त्याला वेड्यातच काढले असते. पण मनोहर पर्रीकर एका राज्याचे मुख्यमंत्री होते.
मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री होते म्हणूनच विजय सरदेसाई व सुदिन ढवळीकर यांच्यासारखे नेते नियंत्रणात होते. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपद दिले असते तर सरकार फार काळ टिकणार नाही अशी भीती सगळ्यांनाच वाटत होती. पर्रीकर मुंबईतील इस्पितळात उपचार घेत असताना त्यांची प्रकृती बरीच खालावली होती. आता नवा मुख्यमंत्री निवडण्याची वेळ आली आहे असे गोवा भाजपा सुकाणू समितीचे मत बनले. समितीचे सर्व सदस्य मुंबईला गेले. इस्पितळात जाऊन मनोहर पर्रीकर यांना भेटले. पर्रीकर यांची प्रकृती गंभीर असूनही त्यांनी समितीचे म्हणणे ऐकून घेतले.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना नवे मुख्यमंत्री करण्यात यावे यावर बैठकीत एकमत झाले. सरकारमधील घटक पक्ष व अपक्ष आमदारांना हा निर्णय कळविण्यात आला. भाजपाच्या केंद्रीय नेत्यांच्या कानावर हा निर्णय घालण्यासाठी श्रीपाद नाईक व इतर मंडळी दिल्लीला रवाना झाली. मात्र ते दिल्लीत पोहचण्यापूर्वीच अशा काही घडामोडी घडल्या की श्रीपाद नाईक यांना श्रेष्ठींंबरोबरची नियोजित बैठक रद्द करावी लागली. नवे मुख्यमंत्री म्हणून श्रीपाद नाईक आम्हाला मान्य नाहीत असा संदेश घटक पक्षांच्या नेत्यांनी दिला होता. त्यामुळे पर्रीकरच मुख्यमंत्री राहिले.
फेब्रुवारी २०१९ मध्ये गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पी अधिवेशन बोलाविण्यात आले होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर मुंबईतील इस्पितळात अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. आपण गोव्यात जाऊन विधानसभेत अर्थसंकल्प मांडणार असे पर्रीकर यांनी डॉक्टरांना सांगितले तेव्हा डॉक्टरनाच धक्का बसला. व्हेंटिलेटरवर असलेल्या एखाद्या पेशंटने असे काही सांगितले असते तर डॉक्टरने त्याला वेड्यातच काढले असते. पण मनोहर पर्रीकर एका राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे नाकात वादी घालून बाहेर गेल्यास काय घडू शकते याची सुस्पष्ट कल्पना त्यांना दिली. पण मुख्यमंत्री पर्रीकर यांनी आपला हट्ट सोडला नाही, तेव्हा आमची परवानगी नसताना रुग्ण बाहेर पडल्याचा शेरा मारुन पर्रीकर यांना सोडले. ते विधानसभेत आले आणि अर्थसंकल्प वाचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर १६ मार्च २०१९ रोजी त्यांना दोनापावल येथील निवासस्थानी हलविण्यात येऊन व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६.३२ मिनिटांनी त्यांची प्राण ज्योत मालवली. एका महान युगाचा अकाली अस्त झाला.
गुरुदास सावळ
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)