या कथेचा जन्म कधी झाला हे नक्की कोणीच सांगू शकत नाही; पण ज्याने कोणी ही कहाणी रचली, त्या प्रतिभावंत व्यक्तीला हे मात्र नक्कीच माहीत होते की, चंद्रावरची भूमी ही आपल्या पृथ्वीसारखीच असेल आणि येणाऱ्या शतकामध्ये कधीतरी माणूस चंद्रावर जाईल.
गोवा, ह्या गोव्यातील वाघेरीच्या दऱ्याखोऱ्या आणि या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेली असंख्य गावे. या प्रत्येक गावाने एक एक लोकवेद जिवंत ठेवला आहे. हे लोकवेद आहेत प्राचीन व्यवस्थेचा विश्वकोश. हे लोकवेद आहेत संस्कृतीचा संग्रह आणि हे लोकवेद आहेत प्रज्ञेचा आणि प्रतिभेचा मिलापसुद्धा. यापैकीच एक आहे 'गाऊन काणी' म्हणजेच गेयरूपात सांगितली जाणारी कहाणी. अशीच एक गाऊन काणी 'सोनुल्या केसाच्या धुयेची'.
असे एक आटपाट नगर होते. या नगराच्या राजाची कन्या लाखात एक होती, कारण तिचे केस सोनुले म्हणजेच सोनेरी रंगाचे होते. आपल्या या लाखात एक दिसणाऱ्या कन्येला राजाच्या राणीने सर्वांपासून लपवून ठेवले होते, अगदी आपल्या पदराच्या आड.
एके दिवशी ही राजकन्या आपल्या मैत्रिणींसह नदीवर जलविहार करायला गेली. मैत्रिणींसोबत जलविहाराचा आनंद घेत असताना अचानक तिचे काही सोनुले केस हातात आले. राजकन्येला फार दुःख झाले. आपले हे अनमोल केस असेच सोडून कसे देऊ? असा विचार करून राजकन्येने कुमयाच्या झाडाचे एक पान घेतले. त्या पानात आपले केस ठेवले, त्या पानाची पुडी बांधली आणि नदीत सोडून दिली. नेमक्या त्याच वेळी तिचा भाऊ नदीच्या खालच्या बाजूला आपल्या सवंगड्यांसह नदीत पोहत होता. वरून बहिणीने सोडलेली केसांची पुडी त्या राजकुमाराच्या हाताला लागली.
हाताला लागलेली पानाची पुडी राजकुमाराने उत्सुकतेने उघडून पाहिली. पुडीत लांबलचक, सोनुले केस होते. राजकुमाराला ते केस फार आवडले. तो तसाच ती पुडी घेऊन घरी आला. आपल्या वडील राजाकडे त्याने हट्ट धरला की, त्याला अशा केसांच्या मुलीशीच लग्न करायचे आहे.
हा राजाचा थोरला मुलगा असल्यामुळे त्याच्यावर राजाचा फार जीव होता. आपल्या मुलाचा हा हट्ट पूर्ण करण्यासाठी त्याने अख्खे जग पालथे घातले; पण सोनुले केसांची त्याची धू (कन्या/मुलगी) फक्त एकटीच असल्यामुळे त्या केसांची दुसरी मुलगी राजाला सापडेना आणि राजकुमारही आपला हट्ट सोडेना.
हट्टाला पेटून राजकुमाराने अन्न-पाणी सोडले. राजपुत्र खंगत चाललेला पाहून राजाही विचलित झाला. शेवटी, हृदयावर दगड ठेवून त्याने निर्णय घेतला की, आपल्या मुलीशीच आपल्या मुलाचे लग्न लावायचे. नीतिमत्तेला धरून नसलेल्या या निर्णयामुळे राजगुरूने राजाचा धिक्कार केला; पण राजाच्या डोक्यावर कली स्वार झाला होता. त्यामुळे राजा आपल्या निर्णयापासून तसूभरही हलेना. राणीनेही राजाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. शेवटी, राणीने जड अंतःकरणाने राजकन्येला, आपल्या सोन्याच्या केसांच्या धुवेला, हा निर्णय सांगितला. हा निर्णय ऐकून राजकन्येवर तर आभाळ कोसळले!
दुःखीकष्टी राजकन्या आपल्या राजवाड्याच्या बागेत बसली होती. आपल्या नशिबावर ती रडत होती. भावाशी लग्न करण्याचा विचारसुद्धा तिला करवत नव्हता. तिने जीवाच्या आकांताने ईश्वराचा धावा केला आणि चमत्कार घडला. विजेच्या लखलखाटासह तिच्यासमोर एक साधू सदृश व्यक्ती उभी राहिली. त्या साधूने राजकन्येला दुःखीकष्टी असण्यामागचे कारण विचारले. राजकन्येने सर्व कहाणी साधूला कथन केली.
साधू म्हणाला, 'कन्ये, घाबरू नकोस. जो अधर्म आजपर्यंत झाला नाही, तो यापुढेही होणार नाही. मी तुला या दोन बिया देत आहे. यातील एक बी आहे चंदनाची आणि दुसरी बी आहे बावनची. या दोन्ही बिया तू तुळशीच्या बाजूला रुजत घाल. यांना मातीचे लिंपण आणि दुधाचे शिंपण दे. या दोन्ही बिया रुजू लागतील आणि चंद्राच्या कलेप्रमाणे वाढू लागतील, तेव्हा या झाडावर बस आणि चंद्रलोकात निघून जा.'
राजकन्येने साधूने सांगितल्याप्रमाणे चंदन आणि बावनच्या बिया रुजत घातल्या. मातीचे लिंपण आणि दुधाचे शिंपण दिले. इकडे राजवाड्यात राजकुमार आणि राजकन्येच्या लग्नाची लगबग सुरू झाली. सोनुल्या केसांची धू मात्र चंदन बावनच्या बिया रुजण्याची वाट बघू लागली. बघता बघता दोन्ही बियांचे अंकुर मातीच्या वर आले. वाऱ्याच्या गतीने दोन्ही झाडे वाढू लागली. राजकन्या पटकन त्यापैकी चंदनाच्या झाडावर जाऊन बसली आणि ती गाऊ लागली...
चढ चढ रे चंदन इरसा
चढ चढ बावन इरसा
मियां जातुय चंद्राच्या मुलखा
काही क्षणातच ती झाडे आभाळाशी स्पर्धा करू लागली. इकडे लग्नाचा मुहूर्त जवळ आल्याने सर्वजण राजकन्येला शोधू लागले. पण राजकन्या मात्र दिसेना. शेवटी त्यांना मागीलदारी बागेत चंदनाच्या झाडावर बसलेली राजकन्या दिसली.
आई जिवाच्या आकांताने आपल्या लेकीला हाक मारू लागली,
उतार उतार गे सोनुल्या केसाचे धुये
तुझो वळणीर साडो लोळता गे
तुजो कंड्यात कुकुम तवता
पण कशीबशी ह्या संकटातून सुटलेली सोनुले केसाची धू मागे परत थोडीच येणार? ती प्रतिउत्तर देत आईला बोलू लागली,
आधी आसलय आई गे तिया
जावची झालंय माय गे तिया
जावची झालंय माय
चढ चढ रे चंदन इरसा
चढ चढ बावन इरसा
मियां जातुय चंद्राच्या मुलखा
राणीचे ऐकत नाही म्हणून राजा येतो. तो लेकीला म्हणू लागतो,
उतार उतार गे सोनुल्या केसाचे धुये
तुझो वळणीर साडो लोळता गे
तुजो कंड्यात चुडो तवता
उत्तरा दाखल लेक म्हणते,
आधी आसलय बापूय रे तिया
जावचो झालंय माव रे तिया
जावचो झालंय माव
चढ चढ रे चंदन इरसा
चढ चढ बावन इरसा
मियां जातुय चंद्राच्या मुलखा
बहीण येते, तीही राजकन्येला खाली येण्याची विनवणी करते,
उतार उतार गे सोनुल्या केसाचे भयणी
तुझो वळणीर साडो लोळता गे
तुजो कंड्यात वेडो तवता
सोनुल्या केसाची धू म्हणते,
आधी आसलय भयण गो तिया
जावची झालंय नणंद गो तिया
जावची झालंय नणंद
चढ चढ रे चंदन इरसा
चढ चढ बावन इरसा
मियां जातुय चंद्राच्या मुलखा
शेवटी तिच्याशी लग्न करू इच्छिणारा तिचा भाऊ येतो. तो म्हणतो,
उतार उतार गे सोनुल्या केसाचे भयणी
तुझो वळणीर साडो लोळता गे
तुजो कंड्यात मणी तवता
आणि मनात असल्या नसलेल्या वेदना एकवटून ती म्हणते,
आधी आसलय भाव रे तिया
जावचो झालंय घो रे तिया
जावचो झालंय घो
चढ चढ रे चंदन इरसा
चढ चढ बावन इरसा
मियां जातुय चंद्राच्या मुलखा
आणि अशा प्रकारे चंदनाचे झाड गरगर वाढत वाढत थेट चंद्रावर पोहोचले. तिथे सोन्याच्या केसांची धू चंद्राच्या जमिनीवर उतरली. तिथे राज्य करत असलेल्या चंद्र राजाच्या दासींनी तिला पाहिले आणि चंद्र राजासमोर उभे केले. आपल्यासमोर अस्सल सौंदर्य असलेली ही कन्या पाहून चंद्र तिच्यावर भाळला. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. सोन्याच्या केसांच्या धुवेलाही चंद्र मनोमन आवडलेला होता. तिने त्याच्या मागणीला होकार दिला. दोघांचाही विवाह झाला आणि सोन्याच्या केसांची धू चंद्राची चांदणी होऊन आनंदाने संसार करू लागली.
या कथेचा जन्म कधी झाला हे नक्की कोणीच सांगू शकत नाही; पण ज्याने कोणी ही कहाणी रचली, त्या प्रतिभावंत व्यक्तीला हे मात्र नक्कीच माहीत होते की, चंद्रावरची भूमी ही आपल्या पृथ्वीसारखीच असेल आणि येणाऱ्या शतकामध्ये कधीतरी माणूस चंद्रावर जाईल. त्याचे हे कोणी एकेकाळी केलेले भाकीत आज एकविसाव्या शतकात प्रत्यक्षात येत असलेले आपण सर्वजण पाहत आहोत आणि त्याचे साक्षीदार बनत आहोत.
गाैतमी चाेर्लेकर गावस