प्रेमाचे जाळे

शैला, एक साधी, अभ्यासू मुलगी, तिचे ध्येय फक्त शिकून चांगली नोकरी मिळवणे हेच होते. पण कॉलेजच्या शेवटच्या वर्षात नाटकांच्या आवडीने ती एका वेगळ्याच जगात ओढली गेली. एका नाट्यकंपनीने तिला नायिकेची भूमिका देऊ केली आणि तिथेच तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले.

Story: कथा |
16 hours ago
प्रेमाचे जाळे

शैला, स्वभावतःच साधी आणि सरळ. ती फक्त स्वतःचा अभ्यास आणि घर या मर्यादेत रमणारी होती. घरची परिस्थिती बेताची असल्याने शिकून स्थिर होण्याचं स्वप्न तिने उराशी बाळगलं होतं. मात्र, हळूहळू समाजाच्या प्रभावाने ती स्वतःत बदल घडवत गेली. कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं आणि नाटकांची आवड असल्याने तिला संधी मिळताच ती उत्साहाने त्यात भाग घ्यायची.

एका नाटक कंपनीने तिला विचारलं, ओळखीचे काही जण तिथे असल्याने तिने लगेच होकार दिला. नाटकामध्ये तिला प्रेयसीची भूमिका करायची होती. तालमी सुरू झाल्या आणि बघता बघता नाटकाचा दिवस उजाडला. नाटक खूप छान झालं आणि सर्वांनी शैलाचं भरभरून कौतुक केलं.

या नाटकानेच तिच्या आयुष्याला अनपेक्षित कलाटणी दिली. नाटकात प्रियकराची भूमिका करणारा तिचा सहकलाकार, जित, यांच्यात खरीखुरी जवळीक निर्माण झाली. शैला लाजाळू असल्याने तिला तिच्या भावना व्यक्त करता आल्या नाहीत. जितने तिला एकांतात भेटायला बोलावले. शैलाच्या मनात कोणतीही शंका नव्हती, मैत्रीच्या भावनेने ती त्याच्या बोलण्याला बळी पडली. जितने तिला आपल्या रूमवर बोलावण्याचा विचार केला होता, तर शैलाला मात्र समुद्रकिनारी जायचे होते. तिने तसं बोलूनही दाखवलं, पण ते व्यर्थ ठरलं. काहीतरी चुकतंय हे तिला जाणवत होतं, पण जित आपल्यावर किती प्रेम करतो हे तो सतत सांगत असल्याने ती त्याच्या बोलण्याला भुलली.

कोणाशीही न बोलणारी शैला जितमध्ये पूर्णपणे रमून गेली. तिला सर्वकाही गुलाबी वाटू लागलं. पण जितच्या मनात वेगळंच काहीतरी होतं; त्याला फक्त शरीरसंबंध हवे होते. शैला जितवर पूर्णपणे अवलंबून राहू लागली, अगदी लहान मुलाप्रमाणे हट्ट करू लागली. त्यांना एकत्र येऊन आठ दिवसही झाले नसतील, पण शैला त्याला वर्षांपासून ओळखत असल्यासारखी वागू लागली.

जितने तिला लग्नाची मागणी घातली. शैलाला आधी वाटलं की तो मस्करी करतोय, कारण तिने त्याला आधीच सांगितलं होतं की ती एवढ्यात लग्न करू शकत नाही. त्यांची जवळीक वाढत चालली होती. महिना उलटला आणि जितने आपला खरा चेहरा दाखवायला सुरुवात केली. त्याने शैलाला फोन न करण्यास बजावले. तिला वाटलं तो मस्करी करतोय, त्यामुळे ती रोजच्याप्रमाणे फोन करत राहिली, पण तो उचलत नव्हता. एक आठवडा त्याने फोन उचलला नाही. आता शैला घाबरली. तिला काहीच सुचत नव्हतं. जितने तिला मेसेजद्वारे सांगितलं की, 'तू माझ्याशी लग्न कर, नाहीतर फोन करू नकोस आणि माझ्याशी काहीच संबंध ठेवू नकोस.' हे वाचताच तिच्या पायाखालची जमीन सरकली.

आता लग्न केलं तर पुढच्या शिक्षणाचं काय, स्वप्नांचं काय, या प्रश्नांनी तिला घेरले. अखेर न राहवून तिने त्याला रिप्लाय केला, 'जर तुला माझ्याशी लग्न करायचं असेल, तर दोन वर्षे थांबावं लागेल.' हा मेसेज तिने जितला पाठवला. मनातलं कोणातरी जवळच्या व्यक्तीला सांगण्याची तिला गरज होती, म्हणून तिने तिच्या भावासारख्या मानलेल्या मित्राला सगळा प्रकार सांगितला आणि आपला लग्न न करण्याचा विचारही स्पष्ट केला. या सगळ्यातून तिला बाहेर पडायचं होतं, पण तिचं मन मात्र अजूनही जितभोवती फिरत होतं.

जित, घरातला एकुलता एक मुलगा होता. त्याचं प्रेमप्रकरण आंतरजातीय मुलीशी होतं, त्यामुळे घरच्यांचा विरोध होता आणि त्यांना वेगळं व्हावं लागलं होतं. वय झाल्यामुळे घरचे त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होते. जितलाही शरीराची भूक भागवण्यासाठी कोणीतरी हवी होती, त्यामुळे मिळेल त्या मुलीला तो आपल्या जाळ्यात अडकवीत असे. शैला सरळ स्वभावाची असल्याने तिला जितच्या स्वभावाची खरी ओळख पटली नाही.

एक दिवस जित तिला म्हणाला, 'आपलं लग्न ठरलं आहे आणि आजपासून तू तुझ्या वाटेवर आणि मी माझ्या वाटेवर.' हे ऐकून शैला कोसळलीच. एकदा शेवटचं भेटावं असं ती त्याला वारंवार सांगत होती. आता जितला हवं तसं वागायला आयती संधी मिळाली. त्याने भेटायला होकार दिला. शैलाने आपलं सगळं बळ एकत्र केलं आणि ती जितकडे गेली. काहीतरी मार्ग काढू असं ती त्याला वारंवार सांगत होती, पण तो तयार नव्हता. शेवटी तिला मनवण्यासाठी आणि आपलं काम साधण्यासाठी त्याने तिच्या म्हणण्याला होकार दिला. तिला स्वर्ग गवसल्यासारखं झालं. आणि याच क्षणी जितने आपल्याला हवं ते मिळवलं.

ती आनंदात होती. आता सगळं ठीक होईल असं तिला वाटत होतं. शिक्षण संपलं की घरी सांगावं असं तिने ठरवलं. पण आता सगळं हळूहळू बदलू लागलं. परत पूर्वीसारखंच होऊ लागलं. आता मात्र ती त्याच्या जाळ्यात अडकली नाही. यावेळी पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण झाली, तर खचायचं नाही, असा तिने मनात निश्चय केला. देवाला काय हवं होतं कोण जाणे, 'सगळे संबंध तोडून टाकूयात, माझं लग्न ठरलंय,' असा मेसेज शैलाला आला. यावेळी ती डगमगली नाही. तिने त्याला प्रतिउत्तर दिले, 'ठीक आहे,' आणि त्याला कायमचं ब्लॉक केलं.

तिच्या मनात आता वेगळंच वादळ निर्माण झालं. कोणालाही आपल्या जवळ येऊ द्यायचं नाही असा तिने पक्का निश्चय केला. 'आपल्याला कोणीच स्वीकारणार नाही,' असं तिला वारंवार वाटत होतं आणि तेच तिने मनात कोरून ठेवलं. तिने शिक्षण पूर्ण केले आणि आपल्या पायावर उभी राहिली, पण या काळात कोणालाही तिच्या जवळ येऊ दिलं नाही. त्या घटनेला आता सहा वर्षे पूर्ण झाली होती. शैला सगळं मागे ठेवून पुढे जात होती, स्वतःला सिद्ध करण्यासाठी ती तळमळत होती. एक दिवस अचानक अनोळख्या नंबरवरून तिला फोन आला. तिने तो उचलला, पण पलीकडच्या आवाजाने ती किंचित दचकली आणि फोन ठेवून तो नंबर पाहू लागली... मनात असंख्य गोष्टी फिरू लागल्या. सहा वर्षांनंतर या माणसाला काय हवंय... माझं सगळंच तर याने ओरबाडून नेलं, आता काय हवं... असं म्हणत ती बेशुद्ध झाली.


इंदू लक्ष्मण परब
मेणकूरे