गोव्यातील नाट्यकलेचा उगम सोळाव्या शतकातील मंदिरांमधील कलाप्रकारांपासून झाला असून, त्यात १८१८ सालासारख्या जुन्या नाट्यप्रयोगांचाही उल्लेख आढळतो. या परंपरेतील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे कृष्णंभट बांदकर, ज्यांनी अण्णासाहेब किर्लोस्करांना स्फूर्ती दिली आणि गोव्याच्या नाट्यकलेत मोठे बदल घडवले.
गोवा हा नाट्यवेडा प्रांत आहे. उत्सवी नाटकांची परंपरा ही खास गोव्याची आहे. मात्र ही परंपरा केव्हापासून सुरू झाली आहे याबद्दल जाणकारांचे एकमत नाही, पण गोमंतकात नाट्यकला सोळाव्या शतकापासून अस्तित्वात होती याचे काही महत्त्वाचे पुरावे आहेत असे स्व. विष्णू सूर्या वाघ यांनी एका स्थानिक दैनिकात लिहिलेल्या स्तंभलेखात नमूद केले आहे. धारगळच्या शांतादुर्गा मंदिरात १८१८ साली रघुनाथ शेठ सावंत व व्यंकटेश रघुनाथ सावंत या पिता-पुत्रांनी लिहिलेल्या नाटकाचा प्रयोग झाला होता अशी नोंद या नाटकाच्या छापील प्रतीवर असल्याचा निर्वाळा एक गोमंतकीय नाट्य संशोधक सीताराम गणपती मणेरीकर यांनी दिला होता. नाट्य समीक्षक व संशोधक ज. वि. कामत यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. १८४० सालापासून होऊन गेलेल्या २९ नाट्य लेखकांची व त्यांनी निर्माण केलेल्या ८८ नाट्यकृतींची यादी त्यांनी १९५० साली मुंबईत “समाज सुधारक” मासिकाच्या अंकात प्रसिद्ध केली होती. केपे तालुक्यातील पारोडा गावचे
चंद्रेश्वर देवस्थानातील कीर्तनकार व तेथील पर्वतकर नाट्यमंडळात सूत्रधाराचे काम करणारे ह.भ.प. वामन बुवा गोसावी १८४१ साली सूत्रधाराचे व हरदासाचे काम करीत होते व यासाठी त्यांनी एक पद्यमय नाटक लिहिले होते अशी सरकारी दप्तरात नोंद आहे असे विष्णू वाघ आपल्या स्तंभात पुढे लिहितात.
उत्सवी संगीत नाटकांची सुरुवात आणि कृष्णंभट बांदकरांचे योगदान
स्व. विष्णू सूर्या वाघ यांच्या मते, उत्सवी संगीत नाटकांची सुरुवात डोंगरी येथून झाली आहे. महाराष्ट्राचे नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर काही कामानिमित्त गोव्यात आले असता, त्यांनी डोंगरी येथील श्रीरामजन्मोत्सवात 'शुकरंभा-संवाद' हे बांदकरांनी लिहून सादर केलेले नाटक पाहिले व त्यापासून स्फूर्ती घेऊन त्यांनी आपले 'शाकुंतल' हे पहिले मराठी संगीत नाटक लिहिले. याचा संदर्भ विश्वकोशात सापडतो.
ते पुढे सांगतात की, कृष्णंभट बांदकर हे उत्तम नाट्य कलाकार होते. त्यांनी 'शुकरंभा-संवाद', 'अहिल्योद्धार', 'लोपामुद्रा-संवाद' आणि 'नटसुभद्रा विलास' यांसारखी अनेक नाटके लिहिली आहेत. पूर्वीची नाटके व बांदकरांची नाटके यात मोठा फरक असा होता की, पूर्वीच्या नाटकात एकटा सूत्रधार गायन करायचा व संवाद म्हणायचा, तर बाकीची पात्रे नुसत्याच हालचाली करायची. बांदकरांनी आपल्या नाटकात थेट पात्रांच्या तोंडी संवाद घातले व गाणी त्या त्या पात्रांनी म्हटली पाहिजेत अशी योजना केली. गावच्या हौशी तरुणांना एकत्र करून त्यांनी या नाटकांचे प्रयोगही डोंगरी गावात चालू केले.
'अहिल्योद्धार' नाटकाची पुनर्रचना
'अहिल्योद्धार' वगळता त्यांच्या इतर नाटकांच्या प्रती सापडत नाहीत. 'अहिल्योद्धार' नाटकाची प्रत त्यांचे पणतू सीताराम बांदकर यांच्याकडे आहे. २००४ साली गोव्यातील नामवंत नाटककार विजयकुमार विश्वनाथ नाईक यांनी या नाटकाची पुनर्रचना करून ते नाटक ठिकठिकाणी सादर केले. या नाटकाचे प्रयोग गोव्यात आणि गोव्याबाहेरही झालेले आहेत. या नाटकाचा प्रथम प्रयोग फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरात ५ डिसेंबर २००४ रोजी सादर करण्यात आला. या नाटकावरूनच गोव्याचे आद्य नाटककार हे कृष्णंभट बांदकरच असल्याचे अनेक जाणकारांनी मान्य केले आहे.
गोव्याच्या हौशी रंगभूमीचा काळ
दैनिक 'नवप्रभा' मध्ये लिहिलेल्या आणखी एका लेखात स्वर्गीय विष्णू सूर्या वाघ सांगतात की, त्यांचे वडील सूर्या वाघ हे उत्तम नाट्य कलाकार व दिग्दर्शक होते. अक्षरशः गोव्यामधल्या प्रत्येक गावात, एकही शहर किंवा खेडे असे नसेल की जिथे सूर्या वाघांनी जाऊन नाटक बसवले नाही. उलट, एकाच गावातल्या पाच-पाच, सहा-सहा वाड्यांवर ते नाटक शिकवायचे. 'नाटक बसवायचे तर सूर्या वाघांनीच', असा दंडकही काही ठिकाणी वर्षानुवर्षे पडला होता. त्यांचा जन्म १९३७ साली झाला होता. तर, कृष्णंभट बांदकर यांचा जन्म सूर्या वाघांच्या आधी सुमारे शंभर वर्षांपूर्वी (१८४४) झाल्याचा दावा ते करतात. यावरून गोव्यातील हौशी रंगभूमीचा काळ केव्हापासून सुरू झाला याचा साधारण अंदाज बांधणे शक्य आहे; मात्र हा संशोधनाचा विषय आहे.
मंदिरातील कलाप्रकारांपासून नाटकांपर्यंत
गोव्यात देवालयांची संख्या खूप मोठी आहे. गावोगावी देवालये आहेत. देवालय म्हटले की, त्याचा वार्षिक उत्सव आलाच. सुरुवातीच्या काळात हे उत्सव जागर, काला, त्राटिका, वीरभद्र, पूतना, रणमाले, विविध प्रकारचे काले इत्यादी नाट्यप्रकार मोठ्या श्रद्धेने देवालयाच्या प्रांगणात होत आले आहेत. त्यांचेच रूपांतर पुढे नाटकांमध्ये झाले असावे. 'गौळण काला' म्हणजे आधुनिक नाटकाची पूर्वावृत्ती आहे, असे वाघ यांचे मत असून त्यात अभंग, भक्तिगीते, श्लोक, आर्या, वगैरेचा समावेश आहे. (क्रमश:)
उमेश नाईक
कुळे
(लेखक ‘गोवन वार्ता’चे धारबांदोडा प्रतिनिधी आहेत.)