पावसाळा आणि आपले आरोग्य: लहान दोस्तांनो, चला निरोगी राहूया!

पावसाळ्यातील गारव्यामुळे, दमट हवेमुळे पचनशक्ती थोडी कमी होते, आपली रोगप्रतिकारशक्तीही कमी होते आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजारसुद्धा होऊ शकतात. पण आपण जर आयुर्वेदात सांगितलेल्या नियमांप्रमाणे पावसाळ्यात आपल्या आहारात, राहणीमानात बदल केले, तर पावसाळासुद्धा निरोगी आणि आनंददायी होऊ शकतो.

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
16 hours ago
पावसाळा आणि आपले आरोग्य:  लहान दोस्तांनो, चला निरोगी राहूया!

संस्कृत भाषेत 'वर्षा ऋतू' असं म्हटलं आहे. पावसाळा हा तसा आपणा सर्वांचा आवडता ऋतू; कारण खूप पाऊस पडायला लागला की शाळेला सुट्टी मिळते. पावसाळ्यातील हिरवागार निसर्ग, तुडुंब भरलेल्या नद्या, सरोवर हे दृश्य बघून मन आनंदित होतं. पण या पावसाळ्यातील गारव्यामुळे, दमट हवेमुळे पचनशक्ती थोडी कमी होते, आपली रोगप्रतिकारशक्तीही कमी होते आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजारसुद्धा होऊ शकतात. पण आपण जर आयुर्वेदात सांगितलेल्या नियमांप्रमाणे पावसाळ्यात आपल्या आहारात, राहणीमानात बदल केले, तर पावसाळासुद्धा निरोगी आणि आनंददायी होऊ शकतो.

वेगवेगळे आजार निर्माण करणारा, आपल्या आरोग्याचा सर्वात मोठा शत्रू पावसाळ्यात कोण असेल, तर तो आहे 'ओलावा'. पावसाळ्यातील दमट हवामानामुळे आपल्या आजूबाजूला ओलावा वाढतो आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात.

वातावरणात वाढलेल्या ओलाव्यामुळे आपल्या शरीरात काय काय होऊ शकतं? 

  •   सर्दी, खोकला, ताप. 
  •   भूक लागत नाही किंवा खूप कमी भूक लागते. 
  •   वेगवेगळे त्वचा रोग होतात. काखा, जांघा, मान, कंबर या भागांवर गोलाकार चट्टे येतात व खाज सुटते, त्वचा काळसर होते. 
  •   पायाच्या बोटांच्या पेरांमध्ये खाज येते, पाणी सुटतं, रक्त येतं आणि वेदना होतात.

आयुर्वेदात ओलाव्यापासून होणाऱ्या आजारांपासून आपल्या शरीराचे रक्षण करण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत, ते आपण समजून घेऊया: 

१. अंघोळीनंतर अंग व्यवस्थित पुसा. सुती टॉवेलने अंग पूर्ण कोरडं करा. ओले केस पटकन वाळवा. केस ओले राहिले तर उवा होण्याची शक्यता वाढते, कोंडा होऊन डोक्यात खाज येऊ शकते. टॉवेलसुद्धा नीट पंख्याखाली वाळवून वापरा. 

२. ओले कपडे किंवा बूट लवकर बदला. ओले कपडे अंगावर ठेवल्यास सर्दी होते. बूट ओले असतील तर पायांना फंगल इन्फेक्शन (Fungal infection) होऊ शकतं. शाळेत जाताना पाऊस असतो, पाय ओले होतात. त्यामुळे शाळेत गेल्यावर पायातून सँडल, बूट काढून ठेवा आणि पाय व बूट सुकले की ते परत पायात घाला. घरी आल्यावर पाय गरम पाण्याने स्वच्छ धुवून टॉवेलने बोटांच्या पेरांमध्ये असलेले पाणी पुसा. 

३. घरातील हवेशीर ठिकाणी कपडे वाळत घाला. शाळेचा गणवेश, इतर कपडे घालण्यापूर्वी नीट वाळलेले नसतील, तर इस्त्री करून त्यातील ओलावा पूर्ण गेल्यानंतरच ते वापरा. 

४. पावसाळ्यात आपण घरात धूप घालतो, तोच धूप कपडे वाळत टाकलेल्या ठिकाणी कपड्यांना धूर लागेल असा खाली ठेवावा. औषधी धूपाचा स्पर्श झाल्याने ओलावा कमी होतो, जंतुसंसर्ग होत नाही व ओलाव्यामुळे होणारे आजार पसरत नाहीत.

पावसात खेळा, नाचा, मजा करा – पण ओलावा वाढून होणाऱ्या आजारांपासून स्वतःचं संरक्षण करणं विसरू नका.


वैद्य कृपा नाईक,
आयुर्वेदाचार्य