मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून अभिनंदन
साखळी : केंद्रीय गृहनिर्माण नगर मंत्रालयातर्फे देशभर करण्यात आलेल्या स्वच्छता सर्वेक्षणात गोवा राज्यात राज्य पातळीवर साखळी नगरपालिका अव्वल ठरली आहे. या मंत्रालयाचा स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२४-२५ साखळी नगरपालिकेला जाहीर झाला असून १७ रोजी दिल्ली येथील उद्योग भवनात विशेष सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षीपासून हे स्वच्छ सर्वेक्षण सुरू होते. साखळी पालिकेचे नवीन पालिका मंडळ स्थापन झाल्यानंतर नगरपालिका क्षेत्र स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. साखळी नगरपालिकेला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे सर्व सहकारी नगरसेवक तसेच विशेषतः साखळी स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी दिवसरात्र झटणाऱ्या सफाई कामगाराच्या कामाचे फलित आहे. या पुरस्काराचे श्रेय हे पूर्णपणे याच सफाई कामगारांना जाते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करीत असलेल्या या पालिकेला त्यांचे मार्गदर्शन व सल्ले प्रत्येक कामात फायदेशीर ठरत आहेत, असे नगराध्यक्ष सिद्धी प्रभू यांनी या पुरस्काराबाबत सांगितले.
साखळी नगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षणात मिळालेल्या पुरस्काराबद्दल मुख्यमंत्री तथा साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी अभिनंदन केले आहे. स्वच्छ व सुंदर साखळीसाठी नगरपालिकेबरोबरच लोकांचा ही सहभाग व सहकार्य आवश्यक आहे. वेळोवेळी आपण तसेच नगरपालिकेनेही लोकांना दिलेल्या हाकेला लोकांनी सकारात्मक साथ दिली आहे. स्वच्छता ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असून ही जबाबदारी जर प्रत्येकाने निभावल्यास साखळी शहर व नगरपालिका क्षेत्र भविष्यात कायम स्वच्छ व सुंदर राहण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
पणजीला स्वच्छ सर्वेक्षणचा राष्ट्रपती पुरस्कार
पणजी शहराने स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये राष्ट्रपती पुरस्कार पटकावला आहे. येत्या १७ जुलै रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात आणि आयुक्त क्लेम माडेरा हे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारणार आहेत.