पणजी : कुजिरा-सांताक्रूझ येथील एका रहिवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आज शनिवार दुपारी १.४५च्या सुमारास घडली. जितू तळेकर (५०, मुंबई-महाराष्ट्र) असे या व्यक्तीचे नाव आहे.
या घटनेची माहिती मिळताच जुने गोवे पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून, त्यांनी या मृत्यूच्या परिस्थितीचा तपास सुरू केला आहे. जितू तळेकर यांनी आत्महत्येच्या उद्देशाने चौथ्या मजल्यावरून उडी मारली असावी, असा संशय व्यक्त होत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास जुने गोवे पोलीस स्थानकाचे निरीक्षक सतीश पडवळकर आणि उपनिरीक्षक संकेत पोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवण्यात आला असून, या प्रकरणातील सर्व बाजूंनी तपास केला जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.