मच्छिमार बांधवांनी पारंपरिक पद्धतीने प्रार्थना करून बोटी समुद्रात उतरवून टाकले रापण
मडगाव : मच्छिमार बांधवांनी बाणावली समुद्रकिनाऱ्यावर पारंपरिक पद्धतीने प्रार्थना करत शनिवारी मासेमारी हंगामाची सुरुवात केली. पारंपरिक मच्छीमारांनी बोटी समुद्रात उतरवून रापण टाकले. १ ऑगस्ट रोजी मासेमारीवर असलेली बंदी उठल्यानंतर हवामानाचा अंदाज घेत खोल समुद्रात बोटी उतरवण्यात येतील, असे पारंपरिक मच्छीमारांनी स्पष्ट केले. यावेळी पाद्रींनी विशेष प्रार्थना करत या हंगामात भरपूर मासळी मिळो आणि कोणतीही अघटीत घटना घडू नये, यासाठी समुद्राला साकडे घातले.
गोव्यात जूनपासून लागू असलेली मासेमारी बंदी १ ऑगस्ट रोजी उठवण्यात येणार आहे. त्याआधीच मच्छीमार बांधवांनी तयारी सुरू केली असून, हवामानाचा अंदाज घेत खोल समुद्रात बोटी उतरवण्याचे नियोजन आहे. कुटबण, बाणावलीसह दक्षिण गोव्यातील विविध जेटींवर सध्या बोटींची डागडुजी, जाळ्यांची देखभाल, कामगारांसाठी साहित्य पुरवठा आणि स्वयंपाकासाठी भांडी तयार ठेवण्याचे काम सुरू आहे.
बंदीदरम्यान झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि ओडिशामधील कामगार आपल्या गावी परतले होते. सध्या काही कामगार पुन्हा जेटींवर हजेरी लावत आहेत. त्यामुळे जेटींवर हलकीच लगबग जाणवण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान, बंदीमुळे दोन महिन्यांपासून स्थानिक बाजारपेठेत ताज्या मासळीचा तुटवडा होता. परिणामी ग्राहकांना बर्फात साठवलेली मासळी खरेदी करावी लागत होती. आता हंगाम सुरू होत असल्याने ताजी मासळी माफक दरात उपलब्ध होईल, अशी आशा खवय्ये व्यक्त करत आहेत.