कर्ज फेडण्यासाठी पोटच्या गोळ्याला विकले, चौघांना अटक

उत्तर कर्नाटकमधील दांडेली येथील घटना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th July, 08:40 pm
कर्ज फेडण्यासाठी पोटच्या गोळ्याला विकले, चौघांना अटक

बेळगाव : उत्तर कर्नाटकमधील दांडेली येथील एका दांपत्याने खासगी फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करता न आल्याने आपल्या २० दिवसांच्या मुलाला ३ लाख रुपयांना विकले. या प्रकरणात संबंधित दांपत्यासह बाळ खरेदी करणाऱ्या बेळगाव येथील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दांडेली येथील देशपांडे नगरातील या दांपत्याच्या घरी १७ जून रोजी शासकीय रुग्णालयात बाळाचा जन्म झाला होता. यापूर्वी त्यांनी एका खासगी फायनान्स संस्थेकडून आठवड्याच्या हप्त्यांवर परतफेड करण्याच्या अटीवर कर्ज घेतले होते. कर्जफेड न झाल्यामुळे त्यांच्याकडे दररोज पैशासाठी तगादा लावला जात होता. या मानसिक त्रासातून सुटका मिळावी यासाठी त्यांनी आपले बाळ ८ जुलै रोजी धारवाड येथे ३ लाख रुपयांना बेळगावचे नूर मोहम्मद अब्दुलमजीद आणि किशन श्रीकांत इरेकर यांना विकले.

अंगणवाडी कार्यकर्त्या रेश्मा महादेव पावसकर यांनी या दांपत्याला ‘ताई कार्ड’ (मातृकार्ड) दिले होते, ज्याद्वारे त्यांना शासकीय लाभ मिळणार होते. परंतु बाळ घरी नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी संशय व्यक्त करत त्वरित दांडेली टाऊन पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दांपत्य व खरेदीदार दोघांना अटक केली. बाळाला शिरसी येथील बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, बेळगाव पोलिसांनी नागरिकांना बाल विक्री किंवा शोषणासंदर्भात संशयास्पद माहिती असल्यास तत्काळ कळविण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा