मांद्रे पोलिसांनी घेतले ताब्यात, चौकशी सुरू.
पणजी : मांद्रेमधील मधलामाज येथील हनुमान देवस्थानात काही महिन्यांपूर्वी घडलेल्या चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेला विनोद पटेकर हा सध्या पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी सापडला आहे. जामिनावर सुटल्यावर त्याने या प्रकरणातील साक्षीदारांना धमकावल्याचा आणि एका साक्षीदाराला मारहाण केल्याचा आरोप असून या पार्श्वभूमीवर स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.
देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी यासंदर्भात मांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. काल रात्री स्थानिकांनी पोलीस स्थानकाबाहेर गर्दी करत पोलिसांवर दबाव आणला. विनोद पटेकरला तात्काळ हद्दपार करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
सध्या विनोद पटेकर मांद्रे पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विनोद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मांद्रे, पेडणे आणि डिचोली पोलीस स्थानकांमध्ये विविध गुन्ह्यांची नोंद आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.