पिसुर्ले-कुंभारखण येथे दीड किलो गांजा जप्त; संशयित ताब्यात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
6 hours ago
पिसुर्ले-कुंभारखण येथे दीड किलो गांजा जप्त; संशयित ताब्यात

वाळपई : होंडा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील पिसुर्ले-कुंभारखण भागात शुक्रवारी संध्याकाळी पोलिसांनी दीड किलो गांजा जप्त करून एका संशयिताला ताब्यात घेतले. मात्र, अद्यापपर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही, यामुळे होंडा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

कुंभारखण-पिसुर्ले येथे गांजा विक्रीच्या तयारीत असतानाच पोलिसांनी छापा टाकून होंडा येथील एका तरुणाला ताब्यात घेतले. शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेनंतर संशयिताला होंडा पोलीस चौकीवर आणण्यात आले. परंतु, माहितीनुसार, या संदर्भात कोणताही गुन्हा नोंदवला गेलेला नाही. याबाबत पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेला संशयित गांजा विक्री करण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी वेळीच कारवाई करत त्याला पकडले. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या काही वर्षांपासून याच संशयिताला स्थानिक पोलिसांनी ड्रग्ज आणि गांजा तस्करीच्या अनेक प्रकरणांमध्ये अटक केली आहे. असे असतानाही त्याच्यात सुधारणा झाली नसून, पोलिसांच्या धाकाला न जुमानता तो सातत्याने या भागामध्ये ड्रग्ज आणि गांजाची विक्री करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

या प्रकारामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. काही नागरिकांच्या मते, गेल्या काही दिवसांपासून कुंभारखण-पिसुर्ले भागात गांजा आणि ड्रग्जचे प्रकार वाढले असून, अनेक तरुण त्यात अडकले आहेत. पोलिसांनी आपली कामगिरी चोखपणे बजावणे गरजेचे आहे, मात्र पोलीस या कामात कमी पडत असल्यामुळेच असे संशयित बिनबोभाटपणे व्यवहार करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

हेही वाचा