एकावेळी १५ कार, ४० स्कूटर, १०० प्रवासी क्षमता, मंत्री सुभाष फळदेसाई यांची चाचणीदरम्यान माहिती
पणजी: रायबंदर-चोडण मार्गावरील रो रो फेरीच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळाला असून १४ जुलैला या रो रो फेरी सेवेचे उद्घाटन केले जाईल. या बोटीची क्षमता एका वेळी १५ कार, ४० स्कूटर आणि १०० प्रवासी वाहून नेण्याची आहे. तर मार्गक्रमणासाठी प्रतिक्षा वेळासहित १२ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नसल्याची माहिती नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.
रायबंदर- चोडण मार्गावर दोन रो रो फेरी दाखल झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून या फेरींच्या चाचण्या सुरू होत्या. या फेरीची अंतिम चाचणी शनिवारी घेण्यात आली. यावेळी मंत्री सुभाष फळदेसाई, नदी वाहतूक खात्याचे संचालक विक्रमसिंह राजभोसले आणि फेरी बोट बनवणाऱ्या विजय मरीन सर्व्हिसेसचे अधिकारी उपस्थित होते.
या फेरी सेवेबाबत मंत्र फळदेसाई म्हणाले, १४ जुलै रोजी रो रो फेरी सेवेचे उद्घाटन करण्यात येणार असून 'द्वारका' आणि 'गंगोत्री' नामक फेरी रायबंदर-चोडण मार्गावर धावणार आहेत. या अद्ययावत दोन फेरी बोटींची क्षमता चार सामान्य फेरी बोटींच्या बरोबरीची आहे. विशेष म्हणजे ही फेरी रायबंदर ते चोडण हे अंतर सात ते आठ मिनिटांत पूर्ण करणार असल्याने प्रवासासाठी १२ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही.
कार, स्कूटरसाठी जागा, दर निश्चित
कार आणि स्कूटरसाठी बोटींवर जागा चिन्हांकित केल्या आहेत. फेरीच्या दोन्ही बाजूला कार पार्क केल्या जातील तर स्कूटर मध्यभागी पार्क केल्या जातील. ही सर्व वाहने एका बाजूने प्रवेश करून दुसऱ्या बाजूने एकत्र बाहेर पडतील. सुरक्षित प्रवासासह अपघाताची शक्यता टाळून वाहने फेरीच्या धक्क्यांवरून सुरक्षितरित्या बाहेर पडतील अशी माहिती फळदेसाईंनी दिली. प्रवासी आणि स्कूटरसाठी मोफत प्रवास असून कारसाठी मासिक ६०० रुपयांचा पास देण्यात येणार आहे. जर तुमच्याकडे पास नसेल तर कारचालकांना ३० रुपये द्यावे लागतील. या हिशोबाचा दर महिन्यानंतर आढावा घेतला जाईल, असे मंत्री फळदेसाई म्हणाले.
स्कूल बसेस, व्हॅनसाठी सूट विचाराधीन
शालेय मुलांना घेऊन जाणाऱ्या बसेस किंवा व्हॅनसाठी शुल्कातून सूट देण्याचा विचार आम्ही करत आहोत. आम्ही सरकारसोबत बसून याचा आढावा घेणार आहोत. संबंधित शाळा किंवा महाविद्यालयांनी त्यांना दिलेल्या प्रमाणपत्रांवर सूट देऊन विद्यार्थ्यांसाठी फेरीचे दर कमी केले जातील, असे फळदेसाई म्हणाले.