साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक आक्रमक, अपघात, अपघाती मृत्यूंचा चढता आलेख

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
12th July, 11:53 pm
साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

पणजी : सत्ताधारी आणि विरोधी आमदारांचे प्रश्न एकानंतर एक घेण्याची मागणी नाकारल्यानंतर विरोधी आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत कामकाज सल्लागार समितीच्या (बीएसी) बैठकीतून सभात्याग केला. गिरी येथील अपघातात कायदा खात्याचे अवर सचिवांचा अपघात, एफडीएचे विविध आस्थापनांवर छापे, धिरयोवर लक्ष ठेवण्यासाठी समित्यांची स्थापना याबरोबरच बाणावली येथे मच्छिमारीस प्रारंभ आदी घटनांसह या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.

रविवार 

महिलेवर हल्ला करीत दागिने लांबविले

होंडा सालेली येथे बुरखाधारी दोघा चोरांनी एका महिलेवर धारदार चाकूने हल्ला करून मंगळसूत्रासह अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या हल्ल्यात वैशाली पेडणेकर जखमी झाल्या. अज्ञात चोरांविरोधात वाळपई पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

बेकायदा वास्तव्य प्रकरणी दोघा परदेशी महिलांना अटक

गोव्यात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या दोन परदेशी महिलांना डिचोली पोलिसांनी एका संयुक्त शोध मोहिमेत कारवाई करीत अटक केली. या महिला अधिकृत व्हिसा आणि पासपोर्टशिवाय गोव्यात राहत असल्याचे निष्पन्न झाले.

सोमवार

पंढरपूरहून परतणाऱ्या गोव्यातील भाविकांच्या गाडीला अपघात

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील विठूरायाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या गोवा येथील भाविकांच्या व्हॅगन आर गाडीला आजरा तालुक्यातील घाटकरवाडी कित्तवडे येथे अपघात झाला. या अपघातात चार भाविक जखमी झाले. त्यापैकी दोघे गंभीर, तर दोघे किरकोळ जखमी झाले.


राजपत्रित अधिकाऱ्याच्या प्रमाणपत्रामुळे अटालाला मिळाले आधार कार्ड!

ड्रग्ज डिलर संशयित यानिव्ह बेनाईम उर्फ अटाला या इस्रायली नागरिकाकडे सापडलेले आधार कार्ड एका राजपत्रित अधिकाऱ्याच्या प्रमाणपत्रामुळेच दिले आहे, अशी माहिती भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (यूआयडीएआय) वकील रवीराज चोडणकर यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाला दिली. दरम्यान, अटालाला मंगळवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

डबे पुरवठा करणाऱ्या आस्थापनावर एफडीएचा छापा

ब्रिटोवाडा, पर्रा येथील एका जेवणाचे डबे पुरवठा आस्थापनावर अन्न व औषधे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून गलिच्छ जागी तयार करून भरलेले ४०० जेवण नष्ट केले. तसेच सदर घराला सील ठोकले.

महिलेला २.४५ कोटींचा गंडा घालणाऱ्यास अटक

गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने मोठ्या आर्थिक फसवणुकीचा छडा लावत सुमारे २.४५ कोटींच्या ऑनलाईन गुंतवणूक फसवणुकी प्रकरणी संजय एम. चव्हाण (वय ४५, महाराष्ट्र) याला अटक केली आहे. या गुन्ह्यात सासष्टीमधील एका महिलेला शेअरमध्ये गुंतवणुकीद्वारे मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

मंगळवार

महिला कर्मचाऱ्याकडूनच फार्मसीला १२ लाखांचा गंडा

वाळपई येथील ‘मेडी प्राईम’ या फार्मसीच्या व्यवहारात १२ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी पोलिसांनी कर्मचारी हिना खान (रा. नाणूस-सत्तरी) हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या गैरव्यवहारात तिचा थेट संबंध असल्याचा आरोप मेडी प्राईम या आस्थापनाच्या मालकांनी केला आहे.

पर्रा येथे मामाकडून भाच्याचा खून

पर्रा येथे व्हिलाच्या बांधकामस्थळी राहत्या झोपडीत द्रौपदा तुलाराम नाईक (३०, रा. मूळ ओडिशा) या कामगाराचा निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी सत्या काकणधर नाबरंगरूपा (५०) व थबीर सत्या नाबरंगरूपा (३१) या बाप-लेकाला अटक केली. संशयित आरोपीही ओडिशातीलच असून संशयित आरोपी सत्या हा द्रौपदाचा मामा होता.


गिरी येथे स्कूटर-बस अपघातात नारायण अभ्यंकर यांचा मृत्यू

गिरी-म्हापसा येथील ग्रीन पार्क जंक्शनवरील उड्डाण पुलानजीक बसने स्कूटरला ठोकर दिली. या अपघातात बसच्या चाकाखाली चिरडले गेल्याने कायदा खात्याचे अवर सचिव नारायण अभ्यंकर (५१, रा. रामनगर, कोलवाळ- बार्देश) यांचा जागीच मृत्यू झाला. पर्वरी येथील सचिवालयात ते सेवा बजावत होते.


बीएसी बैठकीतून विरोधकांचा सभात्याग

अधिवेशनात प्रश्नोत्तराला सत्ताधारी आणि विरोधी आमदारांचे प्रश्न एकानंतर एक घेण्याची मागणी नाकारल्यानंतर विरोधी आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत कामकाज सल्लागार समितीच्या (बीएसी) बैठकीतून सभात्याग केला.

बुधवार

धिरयोवर लक्ष ठेवण्यासाठी सात समित्यांची नियुक्ती

धिरयोवर लक्ष ठेवण्यासाठी व कारवाई करण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी सात समित्यांची स्थापना केली आहे. यात मामलेदार, पोलीस निरीक्षक, पशुसंवर्धन अधिकारी व पशुकल्याण संघटनांचा समावेश आहे.

मदतीसाठी गेलेल्या वाहतूक पोलिसालाच मारहाण

आर्लेम फातोर्डा येथे दुचाकीवरुन पडलेल्या चालकाला मदतीसाठी गेलेल्या वाहतूक पोलिसाला मारहाणीचा प्रकार घडला. दारुच्या नशेत असताना संशयित सिमोन बोर्जेस (४६, रा. राय) याने वाहतूक पोलिसाला मारहाण केली. तक्रार दाखल झाल्यानंतर फातोर्डा पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

गुरुवार 

बेतोडात दुचाकी अपघातात विद्यार्थिनीसह युवक ठार

बेतोडा बगल रस्त्यावर दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका विद्यार्थिनीसह दोघांचा मृत्यू झाला आहे, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. एका दुचाकीच्या मागे बसलेली विद्यार्थिनी ईशा गावस (केरी- सत्तरी) ही जागीच ठार झाली असून दुसऱ्या दुचाकीवरील आदित्य देसाई (बेतोडा) याचाही जागीच मृत्यू झाला.

कळंगुटच्या टॅक्सी चालकावर जीवघेणा हल्ला

कळंगुट येथील ६५ वर्षीय टॅक्सी चालक संजीवन कृष्णा वेंगुर्लेकर यांच्यावर मालपे-पेडणे परिसरात पाच ते सहा अज्ञातांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या गोमेकॉ येथे उपचार सुरू आहेत.

गोवा उद्योग विकास महामंडळाच्या दोन फील्ड मॅनेजरचे निलंबन

कामातील गंभीर निष्काळजीपणामुळे गोवा औद्योगिक विकास महामंडळाने (जीआयडीसी) दोन फील्ड मॅनेजरवर निलंबनाची कारवाई केली आहे. या अधिकाऱ्यांविरोधात सध्या चौकशी सुरू असून, चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जीआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

न्यायालयीन कर्मचाऱ्याची आंबेली-सत्तरी येथे आत्महत्या

पर्ये सत्तरी येथील संजीव पुंडलिक राणे या तरुणाने आंबेली सत्तरी येथे बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. संजीव हा म्हापसा येथील जिल्हा सत्र न्यायालयामध्ये कर्मचारी होता.

शुक्रवार

एलआयसी अधिकाऱ्याकडून ४३.८० लाखांची अफरातफर

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) पणजी येथील कार्यालयातील अधिकाऱ्यावर तब्बल ४३.८० लाख रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने गुन्हा दाखल केला आहे. संबंधित प्रकरणात सात संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचेही तपासात उघड झाले आहे.

मालपेत टॅक्सीचालकावर हल्ला, दोघे जुने गोवा येथे ताब्यात

मालपे येथे टॅक्सीचालकावर हल्ला करून सावंतवाडी येथे चोरी केल्याप्रकरणी जुने गोवा पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले, अशी माहिती पेडणेचे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांनी दिली. दरम्यान, इतरांचा शोध घेण्यासाठी पेडणे पोलिसांसह सिंधुदुर्गातील पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.

बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून ७.३५ लाखांची फसवणूक

पणजी येथील सीएसबी बँकेच्या पणजी शाखेत बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून तब्बल ७.३५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पणजी पोलिसांनी संशयित जन्नत हनाबरकादादी (केवणे - करंझाळे) या महिलेसह सोन्याचे मूल्यांकन करणारे सोनार प्रणेश कारेकर (फातोर्डा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शनिवार


बाणावलीत मासेमारीला प्रारंभ

बाणावली परिसरातील पारंपरिक मच्छीमारांकडून प्रार्थना केल्यानंतर बोट समुद्रात उतरवून रापण टाकत नव्या हंगामाची सुरुवात करण्यात आली. १ ऑगस्ट रोजी मासेमारी बंदी उठल्यानंतर हवामानाचा अंदाज घेत खोल समुद्रात बोटी उतरवण्यात येतील, असे पारंपरिक मच्छीमारांनी स्पष्ट केले.

लक्षवेधी

क्रिप्टो गुंतवणुकीमध्ये चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवत शिरोडा येथील राजीव गुप्ता यांना दोघांनी सुमारे ३ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घातला.

मालकाच्या मृत्यूनंतर मालमत्तेला कायदेशीर वारस नसेल, तर संबंधित मालमत्ता सरकारच्या ताब्यात घेण्याच्या कायद्याची कार्यवाही सुरू झाली आहे. मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून सरकारने तालुक्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ‘गोवा एस्चीटस, फोरफीचर अॅण्ड बोना वॅकंशिया कायदा २०२४’ मागील वर्षाच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर झाला होता.

वेरोडा कुंकळ्ळी येथील कालव्याच्या पाण्यात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत सदर मृतदेह वितेन गावकर (६३, रा. सिंपलेर) यांचा असल्याचे समोर आले. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून प्रकरण नोंद केले.

नवेवाडे येथील सुरेश दोड्डामणी याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी मांगोरहिल येथील अमित व इतर तीन युवकांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

हेही वाचा