कृषी संचालकांची माहिती : गेल्या पाच वर्षांत कामगारांना २६.४६ कोटी रुपयांचे मानधन
पणजी : बंद पडलेल्या संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या कालावधीत, म्हणजेच गेल्या पाच वर्षांत ६०० हून अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ४६.८९ कोटी रुपये इतके विशेष आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. तसेच, याच काळात कारखान्यातील २१० कामगारांना कृषी खात्यामार्फत एकूण २६.४६ कोटी रुपये मानधन देण्यात आले, अशी माहिती कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी दिली. कारखाना बंद असल्यामुळे सुमारे ७५ टक्के ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अन्य पिकांकडे वळण्याचा निर्णय घेतल्याचेही फळदेसाईंनी सांगितले.
संजीवनी साखर कारखाना आणि त्यावर अवलंबून असलेल्या शेतकरी व कामगारांच्या सद्यस्थितीबद्दल माहिती देण्यासाठी संदीप फळदेसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. कारखाना बंदीच्या काळात ऊस उत्पादकांचे हित राखण्यासाठी कृषी खात्याने विविध उपक्रम राबवले, असेही फळदेसाईंनी यावेळी स्पष्ट केले.वर्ष २०२१ मध्ये संजीवनी साखर कारखाना बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांवर कोणताही आर्थिक भार पडू नये यासाठी राज्य सरकारने नरेंद्र सावईकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या पहिल्या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्याचे आश्वासन दिले होते, असेही फळदेसाई यांनी सांगितले.
या आश्वासनानंतर राज्य सरकारने ऊस उत्पादकांसाठी पाच वर्षांसाठी विशेष आर्थिक सहाय्य योजना लागू केली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेत नुकसान भरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार, २०२०-२१ ते २०२४-२५ या मागील पाच वर्षांत कृषी खात्याने ६०० हून अधिक शेतकऱ्यांना एकूण ४६.८९ कोटी रुपये नुकसानभरपाई म्हणून वितरित केल्याची माहिती फळदेसाई यांनी दिली.
कारखाना बंद असल्यामुळे जवळपास ७५ टक्के शेतकऱ्यांनी ऊस लागवड सोडून अन्य पिकांकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या अनेक शेतकरी भाजीपाला उत्पादनात गुंतले आहेत. कारखाना पुन्हा सुरू झाल्यास, हेच शेतकरी पुन्हा ऊस लागवडीकडे वळू शकतात, अशी शक्यता फळदेसाई यांनी वर्तवली. सध्या काही शेतकरी आपला ऊस इतर साखर कारखान्यांमध्ये पाठवत आहेत, तर काहीजण घरच्या घरीच उसापासून गूळ तयार करत आहेत.
संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या पुढील वाटचालीबाबत विचारले असता, फळदेसाई यांनी सांगितले की, कारखाना चालवण्यासाठी सरकारने दोन वेळा पात्रतेसाठी विनंती (आरएफक्यू) प्रसिद्ध केली. मात्र, दोन्ही वेळा कोणत्याही कंपनीने यात स्वारस्य दाखवले नाही. आता सुधारित स्वरूपात आरएफक्यू पुन्हा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
५ वर्षांत शेतकऱ्यांना दिलेली नुकसान भरपाई
वर्ष / शेतकरी / नुकसान भरपाई (कोटी)
२०२०-२१ ७३४ ११.८३
२०२१-२२ ६९० १०.२८
२०२२-२३ ६६९ ८.८६
२०२३-२४ ६८२ ८.३३
२०२४-२५ ६९७ ७.५६
कामगारांनाही मानधन
संजीवनी कारखान्यात कार्यरत असलेल्या २१० कर्मचाऱ्यांना कृषी खात्याच्या अधिपत्याखालीच ठेवण्यात आले. यामध्ये ११४ कायमस्वरूपी, ९० कंत्राटी आणि ६ रोजंदारी कामगार होते. या कर्मचाऱ्यांना पाच वर्षांच्या काळात २६.४६ कोटी रुपये मानधन देण्यात आले.