गोवा : १७० जीर्ण वाहनांनी सरकारच्या तिजोरीत आणले १.०७ कोटी

वाहन स्क्रॅप मेळाव्याला लोकांचा मोठा प्रतिसाद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th July, 12:31 am
गोवा : १७० जीर्ण वाहनांनी सरकारच्या तिजोरीत आणले १.०७ कोटी

पणजी : गोवा पोलीस राखीव दलाच्या कार्यालयात गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने आयोजित केलेल्या वाहन स्क्रॅप मेळाव्याला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात १७० निकामी झालेल्या वाहनांची विक्री होऊन १.०७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे, अशी माहिती गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
गोवा सरकारने तिसरा वाहन स्क्रॅप मेळावा अर्थ मंत्रालय आणि गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या वतीने आल्तिनो येथे गोवा राखीव पोलीस दलाच्या कार्यालयात आयोजित केला होता. राज्यातील जी सरकारी वाहने निकामी झालेली आहेत, त्यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कचरा व्यवस्थापन महामंडळाकडे सोपवण्यात आली आहे. या वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी महामंडळ या निकामी झालेल्या वाहनांचा लिलाव करते. यातून गाड्यांची विल्हेवाट तर लागतेच, पण सरकारला महसूलही मिळतो.
सुमारे ३२ सरकारी खाती, महामंडळे आणि स्वायत्त संस्थांमधील १७० निकामी झालेल्या गाड्यांपैकी १२८ गाड्या १५ वर्षांपेक्षा जुन्या होत्या आणि ४२ गाड्या १५ वर्षांपेक्षा कमी जुन्या होत्या. ही ४२ वाहने सामान्य नागरिकांनी लिलावात भाग घेऊन सर्वाधिक बोली लावून ती विकत घेतली. परंतु, जी वाहने १५ वर्षांपेक्षा जुनी आहेत, त्यांचा केंद्र सरकारच्या स्क्रॅपिंग धोरणानुसार वापर करता येत नाही आणि त्यांची विल्हेवाट लावावी लागते. यासाठी केवळ नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा असलेल्या कंत्राटदारांनीच बोली लावली. देशभरातून सहा कंत्राटदार निकामी झालेल्या वाहनांसाठी बोली लावण्यासाठी उपस्थित होते.
या मेळाव्यात १३५ बोलीदारांनी बोली लावून १७० वाहने विकत घेतली. लिलावाच्या शेवटी सरकारच्या तिजोरीत १.०७ कोटी रुपये इतका महसूल जमा झाला.

माजी मुख्यमंत्र्यांच्या वाहनाची ३.२० लाखांना विक्री

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या वापरातील एक्सयूव्ही ५०० हे सरकारी वाहन लिलावात ३.२० लाखांना विकले गेले. गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने आयोजित केलेल्या स्क्रॅप मेळाव्यात पार्सेकर यांच्या शासकीय वाहनाचा समावेश होता आणि त्याची किमान किंमत १.२० लाख रुपये इतकी होती. नीलेश देसाई यांनी सर्वाधिक ३.२० लाख रुपयांची बोली लावून ते वाहन विकत घेतले.          

हेही वाचा