गोवा : बेकायदा मच्छीमारीवर आळा आणण्यासाठी ड्रोनद्वारे देखरेख!

मत्स्योद्योगमंत्री हळर्णकर : कुडतरीतील कार्यक्रमात मत्स्योत्पादकांचा गौरव

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th July, 12:30 am
गोवा : बेकायदा मच्छीमारीवर आळा आणण्यासाठी ड्रोनद्वारे देखरेख!

मडगाव : बुल ट्रोलिंग, एलईडी मासेमारीसह परराज्यातील बोटींमुळे मत्स्य उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यामुळे आगामी मासेमारी हंगामापासून मत्स्य खात्याकडून कोस्टल गार्डच्या सहकार्यातून ड्रोनचा वापर करून बेकायदेशीर मच्छीमारीवर देखरेख ठेवण्यात येईल, अशी माहिती मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिली.
राष्ट्रीय मत्स्योत्पादक दिनाचे आयोजन कुडतरी येथील पंचायतीच्या हॉलमध्ये करण्यात आले होते. यावेळी मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार आलेक्स रेजिनाल्ड, सरपंच ज्योकीम इस्तिबेरो, खात्याच्या संचालक डॉ. शर्मिला मोंतेरो, सचिव प्रसन्ना आचार्य यांच्यासह इतर उपस्थित होते. यावेळी मंत्री हळर्णकर यांनी सांगितले की, मासेमारी व मासळीपासून बनवलेल्या प्रॉडक्टस ही मोठी बाजारपेठ आहे. या उत्पादनांना जास्त मागणी असते. नीलक्रांतीमुळे गोव्याच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होत आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री झाल्यापासून आतापर्यंत खात्याकडून एकदाही मच्छीमारांची कोणत्याही प्रकारची सबसिडी देणे प्रलंबित राहिलेले नाही. मच्छीमारांसाठी खात्याकडून विविध योजना असून त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत.
राज्याच्या सागरी क्षेत्रात राज्याबाहेरील बोटींकडून होणार्‍या मच्छीमारीसह बुल ट्रोलिंग व एलईडी फिशिंगवर बोलताना मंत्री हळर्णकर यांनी सांगितले की, बेकायदेशीर मच्छीमारी रोखण्यासाठी तटरक्षक दलाच्या सहकार्यातून मच्छीमार खात्याकडून संयुक्त कारवाई सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी ड्रोनचा वापर करून देखरेख यंत्रणा राबविली जाईल. या कामांसाठी मच्छीमार खात्याकडून तीन एजन्सींना नियुक्त करण्याची प्रक्रिया प्राथमिक स्तरावर आहे. आगामी मच्छीमारी हंगामाआधी सर्व प्रक्रिया पूर्ण करून बेकायदेशीर मच्छीमारीवर आळा आणण्याचा प्रयत्न राहील, असेही हळर्णकर म्हणाले. दरम्यान, बाणावली येथील हॅचरीसाठी संपादित ५० हजार चौमी जागेपैकी ५ हजार चौमी जागा पारंपरिक मच्छीमारांना मिळण्यासाठी मच्छीमार खाते सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.

मत्स्यशेतीचा वारसा टिकविण्याची गरज!
आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सांगितले की, शेतकरी व मत्स्योत्पादक खूप मेहनतीने उत्पादन घेत असतात. उत्पादन जास्त मिळण्यासाठी ते परिश्रम घेतात. कुडतरी भागाला शेतीसह मत्स्यशेतीचा पारंपरिक वारसा असून हा वारसा टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. शेतकर्‍यांनी एकमेकांना सहकार्य करत या क्षेत्रात वाढ करण्याचा प्रयत्न करावा. मत्स्योत्पादकांनाही अनेक अडचणी येत असून त्याबाबत कृषी खाते व मच्छीमार खात्याकडून आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे. कोणत्याही राजकारणाविना कृषी व मच्छीमार क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न करणार आहे.

हेही वाचा