अल्पवयीन मुलासह मोहम्मद रशीद ताब्यात
मडगाव : कुंकळ्ळी परिसरातील शेजारी शेजारी राहणार्या दोन १५ वर्षीय मुलींचे अपहरण झाल्याप्रकरणी गुन्हा नोंद होता. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी नाशिक-महाराष्ट्र येथून अल्पवयीनांसह दोघांना ताब्यात घेतले.
कुंकळ्ळी येथून ४ जुलै रोजी १५ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले असून शेजारी राहणार्या दुसर्या एका १५ वर्षीय मुलीचेही अपहरण झाल्याची तक्रार एका पालकांनी कुंकळ्ळी पोलिसांत केली होती. तक्रार मिळताच कुंकळ्ळी पोलिसांकडून अपहरणासह गोवा बाल संरक्षण कायद्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला व तपास सुरू केला होता. पालकांनी केलेला कॉल्स मुलीने घेतला होता. मुलींच्या मोबाईल कॉल्सबाबत माहिती घेण्यात आली असता, त्यांचे शेवटचे लोकेशन कणकवली-सिंधुदुर्ग येथे आढळून आले होते. त्यानुसार पुढील तपास केला जात होता.
दरम्यान, कुंकळ्ळी पोलिसांना या दोन्ही मुली महाराष्ट्रातील-नाशिक परिसरात असल्याचे समजताच त्याठिकाणी जात अपहरण झालेल्या दोन्ही मुलींची सुटका करण्यात आली. त्यांना पळवून नेणार्या एका अल्पवयीन मुलासह मोहम्मद रशीद (रा. उत्तरप्रदेश) याला कुंकळ्ळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक डायगो ग्रॅसिअस यांच्या मार्गदर्शनाखाली कुंकळ्ळी पोलीस उपनिरीक्षक किशोर वेळीप तपास करत आहेत.