गैरवर्तन, शिवीगाळ केल्याचा आरोप : कर्मचाऱ्याला पालिकेने निलंबित करण्याची मागणी
म्हापसा : म्हापसा बाजारपेठेतील अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान नगरपालिका कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ आणि गैरवर्तन केल्याचा आरोप करून विक्रेत्यांनी म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली. संबंधित कर्मचाऱ्याला पालिकेने निलंबित करावे, अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे.
पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पूर्वसूचना न देता विक्रेत्यांना ठरवून दिलेल्या जागेवरून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. एका कर्मचाऱ्याने आम्हाला अपमानास्पद भाषा वापरली आणि शिवीगाळ केली, असे एका विक्रेत्याने सांगितले. या प्रकाराबाबत नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ‘हे विक्रेते म्हापसा बाजारपेठेचा अविभाज्य घटक आहेत. लोकांच्या गरजेच्या वस्तू आणि सेवा प्रदान करतात. त्यांना आदर मिळायला हवा,’ असे एका स्थानिकाने सांगितले.
विक्रेत्यांनी सोपो शुल्क वसूल करण्यातील कथित अनियमिततेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. शुल्क वसूल करण्यासाठी नियुक्त केलेला एजंट अनेकदा पावत्या देत नाही आणि काही वेळा ठरलेल्या दरापेक्षा जास्त शुल्क आकारतो, असा दावा विक्रेत्यांनी केला. आम्ही पावत्या मागितल्यास दुर्लक्ष केले जाते किंवा धमकावले जाते, असा आरोप अन्य एका विक्रेत्याने केला.
विक्रेत्यांच्या प्रमुख मागण्या
विक्रेत्यांनी चार प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. गैरवर्तनाचा आरोप असलेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे, सर्व कर्मचाऱ्यांकडून विक्रेत्यांना सन्मानाची वागणूक मिळावी, सोपो शुल्क वसुलीत पारदर्शकता, अधिकृत पावत्या देणे बंधनकारक करावे आणि बाजारात विक्रीच्या जागांचे वाटप करण्यासाठी निष्पक्ष आणि पारदर्शक व्यवस्था असावी.