पहाटेची शिफ्ट

दहा मिनिटांचं बुलेटीन म्हणजे बरोबर दहा मिनिटं. ते ९ किंवा ११ मिनिटं चालत नाही. ते कसं व्यवस्थित 'फीट' करून 'गुंडाळावं', ही कला व शिस्त आकाशवाणीने शिकवली. शिकणाऱ्याचा चौकसपणा महत्त्वाचा असतो. कितीही शिकता येतं.

Story: ये आकाशवाणी है |
21st June, 11:03 pm
पहाटेची  शिफ्ट

आकाशवाणी न्यूज रूमची पहाटेची शिफ्ट सहा वाजता सुरू होते, पण मुख्य प्रसारण त्या आधीच सुरू झालेले असते. एफएमचे पहिले बुलेटीन साडेसहा वाजता वाचायचे असते. पहिल्या दिवशी रात्री झोपताना सकाळी लवकर उठायला पाहिजे या विचाराने टेन्शन येते. त्यामुळे लवकर झोपावे लागते.

झोपूनच राहिलो तर, या विचाराने झोपमोड आणि चलबिचलताही होते. अलार्म वगैरे लावलेला असतो. मी दोन-दोन अलार्म लावत असे, पण तरीही सकाळी लवकर उठणे म्हणजे एक तापच होता, कारण सवय नव्हती. पावसात वगैरे खूप हाल व्हायचे. त्यावेळी गाडी नसल्याने स्कूटरने जाणे व्हायचे. कधी कधी असा पाऊस येई की, रेनकोट आणि हेल्मेट असूनही पाणी शर्टात जात असे. त्या परिस्थितीत तिथे पोहोचल्यावर चहा वगैरे सोडा, अगोदर एफएमचे पहिले बुलेटीन करायचे असे. लक्ष तिथेच असे. कॅन्टिनवाला उशिराच येई. आमच्या चार लोकांसाठी तो कशाला लवकर येईल!

नंतर वेळ नसायचा. एक बुलेटीन झालं की दुसरं असायचं. सुरुवातीच्या काळात संगणक नसल्याने मी भराभर पेनाने लिहित असे. अर्धी लघुलिपी काढत असे. 'प्र' म्हणजे प्रधानमंत्री, असे संकेत वापरत असे. इ, म  म्हणजे इतले मजगतीं...संपादक हसत असे, पण त्यांना ताणही येई. कारण, अकस्मात काही कारणास्तव म्हणजे 'इमरजन्सी' झाली आणि मी तिथून गेलो तर बुलेटीन वाचणार कोण? ...ही लघुलिपी कुणालाही उमगणार नाही. त्यांचंही बरोबर होतं.

अगोदर मी खोर्ली (जुने गोवे) येथून पणजीला जात असे. फोंड्याला राहायला आल्यावर मी कधीकधी माझा चुलतभाऊ रोहित याला घेऊन जात असे. असेच आम्ही दोघे सकाळी (पहाटे) निघालो. गप्पागोष्टी करत चाललो असताना कुंडईला पोहोचल्यावर अचानक गाडीचा टायर पंक्चर झाल्याचं रोहितला कळलं. गाडी बाजूला नेली. खाली उतरतो तो दोन टायर पंक्चर झाले होते. "अरे बाप रे! देवा पाव रे," असा जप सुरू केला. दोन मिनिटांत सिमेंटचा एक मोठा क्रशर मिक्सर आला. नवीनच होता. स्वच्छ होता, नाही तर तो सिमेंटने भरलेला असतो. दोघांनी हात दाखवला. तो थांबला. आम्हां दोघांना त्याचं केबिन उंच असल्याने चढायला थोडा त्रास झाला. वेगवान मिक्सर एकदाचा पणजीत पोहोचला. मी मोटरसायकल पायलट करून ऑफिसमध्ये पोहोचलो. वेळेवर पोहोचल्याने कसलीही कुचंबणा किंवा खोळंबा झाला नाही.

पहाटेच्या वेळी फक्त रोगी, भोगी आणि योगी जागे असतात असं म्हटलं जातं, ते खरं आहे. वेडेपणा हा एक मानसिक रोग आहे. हे 'रोगी' सकाळी काळोखात कुठेही, कसेही, कुठल्याही दिशेने फिरत असतात. म्हणूनच पहाटे जाताना काळोखात मी कमी वेगातच जात असे. कधीकधी ते रस्त्यावर झोपलेले असत. एकदा खोर्ली सिबा कंपनीजवळ मला काहीतरी रस्त्याच्या मधोमध असल्याचं जाणवलं. जवळ पोहोचल्यावर एक वेडा माणूस रस्त्याच्या मधोमध विभाजकासारखा आरामात झोपला होता. कितीतरी हॉर्न वाजवले, पण तो हलायला तयार नव्हता. शेवटी मी बाजूने वळसा घालून पुढे निघालो.

पहाटेच्या शिफ्टचं मुख्य काम ९ वाजता संपायचं. त्यानंतर कॅन्टीनमध्ये जाऊन हसत-खेळत पावभाजी खाणं शक्य व्हायचं. वेळ ही आकाशवाणीसाठी अगदी महत्त्वाची. ती शिस्त आम्हांला अंगी मुरवून घ्यावी लागली. दहा मिनिटांचं बुलेटीन म्हणजे बरोबर दहा मिनिटं. ते ९ किंवा ११ मिनिटं चालत नाही. ते कसं व्यवस्थित 'फीट' करून 'गुंडाळावं', ही कला व शिस्त आकाशवाणीने शिकवली. शिकणाऱ्याचा चौकसपणा महत्त्वाचा असतो. कितीही शिकता येतं.

(लेखक साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत.)   


- मुकेश थळी