साहित्य:
१/४ किलो मटण खिमा, ५ ते ६ अंडी, १ कांदा (बारीक चिरलेला), १/२ वाटी आले-लसूण-हिरवी मिरची-कोथिंबीर यांचे हिरवे वाटण, १/२ चमचा हळद, १ चमचा गरम मसाला पावडर, चवीनुसार मीठ, २ चमचे तेल, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती:
१. प्रथम अंडी उकडून घ्यावीत.
२. एका पॅनमध्ये २ चमचे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला १ कांदा आणि १/२ वाटी हिरवे वाटण घालून छान परतून घ्यावे.
३. परतल्यानंतर त्यात १/२ चमचा हळद, १ चमचा गरम मसाला पावडर आणि चवीनुसार मीठ घालावे.
४. थोडे पाणी शिंपडून त्यात १/४ किलो खिमा घालावा आणि कोरडा शिजवून घ्यावा.
५. उकडलेल्या ५ ते ६ अंड्यांची टरफले काढून प्रत्येक अंड्याला ४ चिरे द्यावीत आणि त्यात शिजवलेला खिमा भरावा.
६. एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करून त्यात खिमा भरलेली अंडी ठेवावीत आणि मंद आचेवर ५ मिनिटे शिजवून घ्यावीत.
७. शेवटी बारीक चिरलेल्या कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करावे.
कविता आमोणकर