हे केवळ नोकरी शोधण्याचे केंद्र नसून, विद्यार्थ्यांच्या करिअरला योग्य दिशा देणारे आणि त्यांना सक्षम बनवणारे व्यासपीठ आहे. रिजनल एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, गोवा हा उपक्रम गोमंतकीय युवा पिढीला केवळ आत्मनिर्भरच नाही, तर राज्याच्या विकासासाठी एक सक्षम मनुष्यबळ म्हणून घडवत आहे, हे निश्चित.
आजच्या स्पर्धात्मक युगात करिअर निवडताना योग्य मार्गदर्शन मिळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकदा विद्यार्थ्यांना विविध सरकारी नोकऱ्यांच्या संधींची पुरेशी माहिती नसते किंवा त्या परीक्षांची तयारी कशी करावी, याबाबत संभ्रम असतो. अशा वेळी, रिजनल एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, गोवा, हा उपक्रम गोव्यातील युवा पिढीसाठी एक आशेचा किरण बनून पुढे येत आहे. केवळ नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यापलीकडे जाऊन, हे एक्सचेंज विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य करत आहे.
जीपीएससी (Goa Public Service Commission) जागृतीचे स्तुत्य कार्य:
गोवा एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचा सर्वात महत्त्वाचा आणि प्रशंसनीय उपक्रम म्हणजे जीपीएससी परीक्षांविषयी जनजागृती करणे. जीपीएससी परीक्षांमधून राज्य प्रशासनात महत्त्वाच्या पदांवर अधिकाऱ्यांची निवड केली जाते. दुर्दैवाने, अनेक गोमंतकीय विद्यार्थ्यांना या परीक्षांबद्दल, त्यांच्या स्वरूपाबद्दल आणि तयारीबद्दल पुरेशी माहिती नसते. ही उणीव भरून काढण्यासाठी एक्सचेंज जीपीएससी विषयावर जास्तीतजास्त माहिती पुरवणे, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि नियमित कार्यशाळा आयोजित करणे यांसारख्या गोष्टींवर विशेष भर देत आहे. खरं तर, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सिव्हिल सर्विसेससाठी तयार करून, त्यांना गोमंतकीय अधिकारी बनवण्यासाठीचे अत्यंत स्तुत्य असे कार्य गोवा एम्प्लॉयमेंट एक्सचेंज करतं आहे.
कार्यशाळा आणि मार्गदर्शन सत्रे:
पाटो येथील 'श्रमशक्ती' इमारतीच्या चौथ्या मजल्यावर असलेले हे कार्यालय, श्री. गावस आणि श्री. केंकरे यांच्या अथक व नाविन्यपूर्ण परिश्रमामुळे गोव्यातील युवकांच्या आशांचे केंद्र बनले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळांचा लाभ घेतला आहे. या कार्यशाळांमध्ये जीपीएससी परीक्षांचे स्वरूप, अभ्यासक्रम, तयारीच्या पद्धती, वेळेचे नियोजन आणि मुलाखतीची तयारी यांसारख्या विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता, त्यांना आत्मविश्वास आणि योग्य दिशा कशी मिळेल, यावर भर दिला जातो. जेएसओ (Junior Scale Officer), मामलेदार (Mamlatdar) आणि सब-रजिस्ट्रार (Sub-Registrar) सारख्या महत्त्वाच्या पदांसाठी होणाऱ्या परीक्षांची 'मॉक टेस्ट' (सराव परीक्षा) देखील घेण्याचा एक्सचेंजचा विचार आहे. या सराव परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव मिळतो आणि त्यांना त्यांच्या चुका सुधारण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. सध्यातरी, अर्धदिवसीय कार्यशाळांच्या माध्यमातून जीपीएससीवर मार्गदर्शन चालू आहेच.
स्पर्धा परीक्षांची विस्तृत व्याप्ती:
केवळ जीपीएससीच नव्हे, तर बँकिंग परीक्षांसाठी देखील कॉमर्स आणि आर्ट्स शाखेतील विद्यार्थ्यांना घडवण्याचे प्रयत्न चालू आहेत. बँक क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये प्रचंड स्पर्धा असते आणि त्यासाठी विशिष्ट तयारीची गरज असते. एम्प्लॉयमेंट एक्सचेंज विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील संधींची माहिती देऊन, त्यांना आवश्यक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देणार आहे. या उपक्रमामुळे गोव्यातील युवक केवळ राज्य सरकारच्याच नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्येही यशस्वी होऊ शकतील. गोवा सरकारचे खरंच या उपक्रमाबद्दल खूप मनापासून अभिनंदन करावयास हवे, कारण ते युवा पिढीच्या भविष्यासाठी दूरदृष्टीने विचार करत आहेत.
डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि माहितीचे आदानप्रदान:
या उपक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे 'व्हॉट्सअॅप ग्रुप'ची निर्मिती. एम्प्लॉयमेंट एक्सचेंजतर्फे एक खास व्हॉट्सअॅप ग्रुप बनवलेला आहे, ज्यावर जीपीएससीच्या सर्व नोटिफिकेशन्स एकाच वेळेस हजारो विद्यार्थ्यांना मिळतात. त्यामुळे 'पेपर वाचलाच नाही', 'वेबसाईट बघितलीच नाही', 'वेळच मिळाला नाही', 'लक्षातच आले नाही' अशा सबबींना जागाच उरत नाही. व्हॉट्सअॅपवरील मेसेज बघितलाच जातो, त्यामुळे वेळेवर अपडेट्स मिळतात आणि परीक्षांना सामोरे जाणे सोपे होते. या ग्रुपमुळे माहितीचा अभाव ही अडचण दूर झाली आहे.
याबरोबरच, या ग्रुपवर 'लाइक-माइंडेड' (समान विचारसरणीचे) विद्यार्थी असल्यामुळे एकत्र जीपीएससीचा अभ्यास करणे सोपे होते. योग्य विद्यार्थ्यांची योग्य विद्यार्थ्यांशी ओळख होते, ज्यामुळे पीअर-लर्निंग आणि स्टडी-ग्रुप्स तयार होतात. एकत्रित अभ्यासातून शंकांचे निरसन होते आणि एकमेकांना प्रोत्साहन मिळते, जे स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वच दृष्टीने या एक्सचेंजचे योगदान अमूल्य आहे. याच ग्रुपवर खासगी नोकऱ्यांच्या जाहिराती सुद्धा, तसेच वॉक-इन इंटरव्ह्यूजची माहिती देखील पुरवली जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या तात्काळ रोजगाराच्या गरजाही पूर्ण होतात.
पालक आणि विद्यार्थ्यांसाठी आवाहन :
गोवन वार्ताच्या वाचक विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला स्वतःला जोडून घेतले तर त्यांना फारच फायदा होईल. विद्यार्थ्यांनी खरं तर याचा खूप लाभ घ्यायला हवा. पालकांनी देखील एकदा पाटो येथील त्यांच्या कार्यालयात संपर्क साधून अथवा प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या कार्याची माहिती घेतली पाहिजे. आणि तेथील सर्व उपक्रमांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना खरंखुरे 'घडवण्यासाठी' सतत पाठवले पाहिजे. कारण, हे केवळ नोकरी शोधण्याचे केंद्र नसून, विद्यार्थ्यांच्या करिअरला योग्य दिशा देणारे आणि त्यांना सक्षम बनवणारे व्यासपीठ आहे. रिजनल एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, गोवा हा उपक्रम गोमंतकीय युवा पिढीला केवळ आत्मनिर्भरच नाही, तर राज्याच्या विकासासाठी एक सक्षम मनुष्यबळ म्हणून घडवत आहे, हे निश्चित.
अॅड. शैलेश कुलकर्णी,
कुर्टी - फोंडा
(लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)