आधीच दुसऱ्याचे ऐकणे हे अवघड काम आणि त्यात आता आपल्यासमोर असलेली ही अनेक प्रकारची उपकरणे, जी आपले लक्ष विचलित करतात आणि दुसऱ्याचे म्हणणे ऐकणे हे आणखी अवघड होऊन बसते.
“समोरच्याचे म्हणणे ऐकून घ्या, समजून घ्या आणि मग उत्तर द्या. फक्त उत्तर द्यायच्या दृष्टीने ऐकू नका.”
शालेय जीवनात माझ्याप्रमाणेच अनेक जणांना ही शिकवण मिळाली असेल. पुढे अनेक प्रसंगांत, भांडणांमध्ये ती आठवलीदेखील असेल. कधी ती आपणच आपल्याला सांगितली गेली असेल तर कधी समोरच्याला ऐकवली गेली असेल. एकूणच ऐकून घेणे हे महाकठीण काम. हल्ली तर सतत 'अटेनशन स्पॅन' बद्दल बोलले जाते, लहान मुलांच्या संबंधितच नाही तर आपल्या मोठ्यांच्या संबंधितसुद्धा. दहा-पंधरा मिनिटांच्या वर एखादी गोष्ट आपल्याला ऐकवत नाही. म्हणून तर छोटे, दोन-तीन मिनिटांचे रील आपण सहज बघतो; पण तोच विषय दीर्घ व्हिडिओमध्ये मांडला असेल, तर आपल्याला बघवत नाही. हातात मोबाईल आल्यामुळे त्यात क्षणाक्षणाला डोकावायची इतकी सवय लागलेली असते की समोर टिव्ही चालू असतानाही बऱ्याचदा आपल्या हातात मोबाईल असतो आणि आपले लक्षदेखील त्यातच असते. टीव्ही फक्त समोर सुरू असतो.
आधीच दुसऱ्याचे ऐकणे हे अवघड काम आणि त्यात आता आपल्यासमोर असलेली ही अनेक प्रकारची उपकरणे, जी आपले लक्ष विचलित करतात आणि दुसऱ्याचे म्हणणे ऐकणे हे आणखी अवघड होऊन बसते.
लेखाच्या सुरुवातीला भांडण किंवा गैरसमज टाळण्यासाठी शालेय जीवनात हमखास दिलेली शिकवण सांगितली, ती फक्त ऐकून घेण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठीच. पण लेखाचा विषय मात्र जरासा वेगळा आहे. आपल्याला बोलण्याची जितकी गरज असते, तितकीच आपले म्हणणे कुणीतरी ऐकून घेण्याचीही गरज असते याबाबतीत कुणाचे दुमत नसेल. मला आठवतेय आमच्या लहानपणी आमच्या परिसरात एक वयस्कर बाई रहायच्या. संध्याकाळी एकट्या फिरायला जायच्या. मी आणि माझी मैत्रीण संध्याकाळी बाहेर चकरा मारायचो किंवा बाकावर बसून गप्पा मारायचो. कधी या बाई आम्हाला दिसल्या, की त्या आमच्यापाशी येऊन अर्धा तास बोलायच्या. वास्तविक आमच्या वयात फार अंतर होतं आणि आमची आणि त्यांची इतकी ओळखसुद्धा नव्हती! सुरुवातीला एकदोन वेळा आम्ही ते ऐकून घेतले, पण त्यात आमचा बराच वेळ जायला लागला. एकतर आम्ही भेटायचो तासाभरासाठी, त्यात आमच्या गप्पाच व्हायच्या नाहीत. मग आम्ही त्या बाई दिसल्या की आमची वाट बदलायचो. एकदा बोलता बोलता मी या घटनेचा उल्लेख आईसमोर केला, तेव्हा ती मला म्हणाली, “त्या बाई वयस्कर आहेत. घरी त्यांचे बोलणे कुणी ऐकत नसणार. त्या तरी कुणाजवळ बोलणार? आपल्याला त्यांनी काही सांगितलं, तर नुसते हो हो करायचे आणि सोडून द्यायचे. फार मनावर घ्यायचे नाही.”
त्यादिवसानंतर मी अनेकदा रस्त्यात थांबून त्यांचे बोलणे ऐकले आहे. लोकांना जसे डोळे बंद करता येतात, तसे काहीवेळा मला कान बंद करता येतात. त्यामुळे त्यांचे म्हणणे मी काही वेळा ऐकल्याचे दाखवले आहे हेही तितकेच खरे आहे! पण त्यांना त्यातून समाधान मिळालेले मला जाणवले आहे. कारण त्यांना इतर कसलीच अपेक्षा नसायची. उत्तराची नाही की सल्ल्याची नाही. त्यांना फक्त बोलायचे असायचे. आता हे बोलणे आरशासमोर होऊ शकतेच, किंवा डायरीमध्ये लिहून काढून भावनांचा निचरा होऊ शकतो पण त्यांचे म्हणणे ऐकून घेणारा कुणीतरी हवा असेल, तर काय?
अशी गरज आपल्यालाही अनेकदा वाटली असेलच. आपणही असे कुणाकडे तरी जाऊन, मनातले घडाघडा बोलून टाकून मन मोकळे केले असेलच आणि आपल्याकडे बोलून दुसऱ्याचे मन मोकळे झालेलेही आपल्याला जाणवले असेलच. माझ्यासारखी, कान बंद करायची कला ज्यांना अवगत आहे, त्यांना हाही अनुभव असेल की आपण ते खरेच ऐकल्या किंवा न ऐकल्याने बोलणाऱ्याला फारसा फरक पडत नाही. त्याला फक्त ऐकून घेण्याचा आभास पुरेसा असतो.
हेच सूत्र लक्षात ठेवून की काय, माहीत नाही; 'द लिस्नर' नावाच्या लघुपटात असा एक लिस्नर असतो, जो एका ठरावीक हॉटेलमध्ये आपण चक्क ऑर्डर करू शकतो! म्हणजे त्या हॉटेलमध्ये गेल्यावर आपल्या खाद्यपदार्थांच्या ऑर्डरबरोबर हा लिस्नर ऑर्डर करायचा. तो आपल्यासमोर येऊन बसणार आणि आपले बोलणे ऐकून घेणार.. अर्थातच दर तासाचा चांगला मोबदला घेऊनच! बोलणाऱ्याला कोणतेच विषय वर्ज्य नाहीत.
लघुपट बघताना अनेक गोष्टी मनात येतात. त्यापैकी अपरिचित माणसांसमोर आपण अधिक चांगल्या प्रकारे बोलू शकतो ही गोष्ट सर्वप्रथम मनात आली. त्यानंतर जाणवले की लोकांच्या गरजा ओळखून कशा नवनवीन संकल्पना डोक्यात येऊन, नवीन उद्योगधंद्यांचा शोध लागत असेल. आपल्याला बोलता यावे, मनातले सांगता यावे यासाठी कुणालातरी पैसे देऊन आपल्या समोर बसवता येऊ शकते.. आमच्या आजीला ही गोष्ट सांगितली, तर तिला आश्चर्य वाटेल. बोलण्यासाठी माणूस भाड्याने घ्यायची संकल्पना माझ्या लेकाला मात्र तो मोठा होईल तेव्हा कदाचित फार विचित्र वाटणारही नाही! मग काही मैत्रिणी आठवल्या. मी त्यांच्याजवळ केलेली बडबड आठवली. त्यातून झालेला भावनांचा निचरा आठवला. कधीकधी तर बडबडीला अर्थच नसतो काही, ती लक्षातही राहत नाही. त्यानंतर वाटलेले मोकळेपण मात्र जाणवत राहते. मैत्रिणी नसत्या तर मी काय केले असते? असाही विचार डोक्यात आला.
आजकाल काही भागात संध्याकाळच्या वेळेत वृद्धांना सोबत करायला म्हणून काही जण स्वेच्छेने किंवा मोबदला घेऊन काम करतात. तेही यापेक्षा काय वेगळे आहे? वृद्धांसोबत वेळ घालवणे, त्यांच्याशी पत्ते खेळणे, गप्पा मारणे हेच फक्त काम असते. लघुपट बघताना मनात हे सगळे विचार चालू होते, तोच लघुपटाचा शेवट एकदम अनपेक्षित अशा वळणावर झाला! ऐकण्यापेक्षा ऐकण्याचा आभास पुरेसा असतो असे दर्शवणारा तो शेवट असला, तरी जाता जाता एक गोष्ट मात्र मनात येऊन गेली. येत्या काही वर्षांत, 'सोबत‘ ही एक दुर्मीळ आणि प्रचंड महाग 'कमोडिटी' होणार आहे हे नक्की!
मुग्धा मणेरीकर
फोंडा