सिझेरियननंतर पाठदुखी होणे सामान्य आहे का?

सहा महिन्यापूर्वी गर्भारपणात व्यायाम शिकण्यासाठी आलेली एक पेशंट आज परत ओ.पी.डी.ला आली. सिझेरियन होऊन जेमतेम तीन महिने अन् डिलीवरीनंतर सुरू झालेली पाठदुखी कमी होण्यापेक्षा वाढतच चाललेली...

Story: आरोग्य |
27th June, 10:06 pm
सिझेरियननंतर  पाठदुखी होणे  सामान्य आहे का?

सिझेरियन डिलीवरीनंतर अशा प्रकारची पाठदुखी अनुभवणे सामान्य बाब आहे. गर्भारपणात व प्रसूतीनंतर वजन वाढणे, हार्मोनल बदल, चुकीच्या हालचाली, बाळाला सतत उचलून धरणे, स्तनपानासाठी जास्त वेळ बसून राहणे यामुळे होणाऱ्या ताणतणावामुळे पाठीवर परिणाम होण्याची शक्यता असते. बहुतेक वेळा डिलीवरीनंतर सुरू झालेले हे दुखणे कालांतराने कमी होते, पण योग्य ती काळजी न घेतल्यास वेदना तीव्र किंवा दीर्घकाळ टिकू शकते व यामुळे बऱ्यापैकी त्रास होऊ शकतो. अशा पाठदुखीची संभाव्य कारणे तसेच अस्वस्थता कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो यावर आपण आज नजर घालू.

सिझेरियननंतर सरासरी १८ % महिलांना तीन महिन्यांनंतरही पाठदुखी सुरू राहते. सहा महिन्यांनंतर ती सुमारे ११ % पर्यंत कमी होते आणि एक वर्षानंतर सुमारे ६–७ % महिलांना पाठदुखी चालूच असते.

पाठदुखी कशामुळे होते?

 हार्मोनल बदल : गर्भधारणेदरम्यान, रिलेक्सिन हार्मोनचे स्राव गर्भाशय आतून मऊ आणि रुंद करते, ज्यामुळे शरीर प्रसूतीसाठी तयार होते. हे हार्मोन पेल्विसमधील सांध्यावर परिणाम करते, ज्यामुळे ते अधिक लवचिक बनतात. हे सांधे ताणले गेल्यामुळे खाली किंवा मध्यभागी पाठदुखी होऊ शकते. तसेच प्रसूतीनंतर काही महिन्यांत सांधे, स्नायू आणि अस्थिबंधन हळूहळू मजबूत होतात. त्यावेळेसही पाठ आणि खालच्या भागात ताण येऊ शकतो.

 बाळाला उचलणे: सिझेरियननंतर बाळाला सतत उचलावे, घेऊन राहावे लागत असल्याच्या ताणामुळे पाठदुखी वाढू शकते. उचलताना चुकीच्या पद्धतीने पकडल्याने मानेवर व पाठीवर परिणाम होऊ शकतो ज्यामुळे हळूहळू अस्वस्थता आणि तीव्र पाठदुखी होऊ शकते.

 वजन वाढणे : गरोदरपणातील, बाळाचे अतिरिक्त वजन सिझेरियननंतर तीव्र पाठदुखीस कारणीभूत ठरू शकते. पोटाच्या भागात अतिरिक्त वजन राहिल्याने शरीराचे संतुलन बदलते, ज्यामुळे पाठीच्या मणक्यावर ताण येतो. तसेच पोटातील स्नायूंची ताकद कमी झालेली असते ज्यामुळे पाठ आणि कोर स्नायूंवर अधिक भार पडतो व पाठदुखी होऊ शकते. 

 स्तनपान : स्तनपान हा एक सुंदर अनुभव असला तरी, स्तनपान करताना चुकीच्या स्थितीत राहणे, जसे की खांदे किंवा मान वाकणे-ताणणे, यामुळे सिझेरियननंतर पाठदुखीचा त्रास होऊ शकतो.

 अॅनेस्थेसियाचा परिणाम: सिझेरियन दरम्यान वापरल्या जाणाऱ्या स्पाइनल किंवा इपिड्युरल ब्लॉकमुळे कधीकधी सभोवतालच्या स्नायूंमध्ये आकुंचन होऊन ताण जाणवू शकतो व तीव्र पाठदुखी होऊ शकते जी प्रसूतीनंतर फक्त काही दिवस किंवा आठवडे टिकू शकते. 

 सॅक्रोइलिएक सांध्याची समस्याः गर्भाशयाचा आणि स्नायूंचा ताण सॅक्रोइलिएक सांध्यावर प्रभाव टाकतो. प्रसूतिनंतर हॉर्मोनल बदलामुळे ही सांधे अस्थिर राहू शकतात आणि पाठदुखी वाढवतात.

  डाएस्टेसीस रेक्टी: गर्भावस्थेत पोटातील स्नायूंच्या मध्यभागी भेगा आल्याने पोटाच्या स्नायूंची क्षमता कमी होते. त्यामुळे पाठीवर अधिक भार येतो आणि पाठ दुखणे वाढते.

सिझेरियननंतर पाठदुखी टाळण्यासाठी...

  ऑपरेशनपूर्वीच सुदृढ फिटनेस राखा.

  योग्य पोश्चर: बसताना पाठ उशीला टेकवून बसा, आपले खांदे आरामशीर ठेवा आणि स्तनपान करताना हाताला आधार देण्यासाठी कोपराखाली उशी वापरून पहा. बाळाला उचलताना पोटाचे स्नायू घट्ट करून उचला तसेच वाकून पाठ ताणण्याऐवजी पाठ सरळ ठेवा व बाळाचा पाळणा किंवा इतर वस्तू आईला आरामात वापरता येतील अशा उंचीवर ठेवा.

 हलके व्यायाम व चालणे: हालचाली सुरु करा. स्ट्रेचिंग, योग, कॅट-काऊ व्यायाम, चाईल्ड पोझ हे व्यायाम करा.   

 गरम किंवा थंड कम्प्रेशन: १५-२० मिनिटांसाठी गरम/थंड कम्प्रेशनचा वापर करा. 

 ओटीसी वेदनाशामक औषधे: 

डॉक्टरच्या सल्ल्याने आयब्यूप्रोटेन किंवा अ‍ॅसिटामिनोफेन घेतली जाऊ शकते. 

 अॅबडॉमिनल बाइंडर: पोट व पाठ यांना स्थिरता देण्यासाठी प्रसूतीनंतर काही काळासाठी बाइंडरचा वापर केला जाऊ शकतो.

  पेल्विक फ्लोर व कोर स्ट्रेंदनिंग: दीड महिना संपल्यानंतर फिजीओथेरपीस्टच्या सल्ल्याने पोट व पाठीचे व्यायाम चालू केले जाऊ शकतात ज्यामुळे कोर स्नायूमध्ये लवकर स्थिरता येण्यात मदत होते. 

सिझेरियननंतर तात्पुरती पाठदुखी हे अपेक्षित असते. पण ती दीर्घकाळासाठी म्हणजे ६-१८ महिन्यांपर्यंत राहिल्यास त्यासाठी वैद्यकीय देखरेखीची गरज असते. त्यामुळे प्रसूतीनंतरच्या सामान्य अस्वस्थतेमध्ये आणि वैद्यकीय मदतीची आवश्यकता असलेल्या लक्षणांमध्ये फरक समजून घेणे आवश्यक असते. लक्षणे लवकर ओळखून, योग्य काळजी आणि वेळेत योग्य उपचार केल्यास ही पाठदुखी त्रासदायक ठरत नाही.


- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर