स्नेहाच्या नृत्याला सुवर्ण स्पर्श

स्नेहा महाले खोत यांचा प्रवास हेच दाखवून देतो की, गृहिणी असो किंवा वर्किंग वुमन, स्त्री असो किंवा पुरुष, प्रत्येकाने कलेच्या रूपात आपल्याला मिळालेल्या दैवी देणगीची उपासना करायला हवी. कारण आपल्यामुळे आपली भावी पिढीसुद्धा आपल्या शास्त्रीय नृत्याचे आणि भारतीय संस्कृतीचे जतन करायला शिकेल.

Story: स्वयंसिद्धा |
27th June, 10:32 pm
स्नेहाच्या  नृत्याला  सुवर्ण स्पर्श

थिवी रेल्वे स्टेशन बस स्टॉप, अस्नोडा बस स्टँड, डिचोली बस स्टँड किंवा गोव्यातील महत्त्वाच्या ठिकाणी तुम्हाला 'स्नेहा डान्स अकादमी'चे बॅनर नक्की दिसतील. या बॅनरवर हसरी, कलावंत स्नेहा महाले खोत यांचे छायाचित्र असते, ज्या भरतनाट्यम या भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकाराला नव्या पिढीत रुजवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. आता तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. नुकत्याच काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य आणि गायन स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावून गोवा आणि भारताचा मान उंचावला आहे. "कितीही कठीण असले किंवा कितीही कठीण झाले तरी, मी ते करून दाखवणारच" हे तिच्या यशाचे खरे सूत्र आहे.

नृत्याच्या प्रेमातून सुरु झालेला प्रवास

मूळची स्नेहा रामदास महाले आणि लग्नानंतर सौ. स्नेहा ऋतुराज खोत झालेल्या या नृत्यांगणेला बालपणापासूनच नृत्याची आवड होती. टीव्हीवर गाणं किंवा नृत्य लागलं की तिचे पाय आपोआप थिरकायला लागायचे. तिच्यातील ही कला आणि आवड तिच्या वडिलांनी हेरली आणि अवघ्या नवव्या वर्षी त्यांनी तिला पहिल्या भरतनाट्यम गुरु सौ. प्रियंका राणे यांच्याकडे भरतनाट्यमचे धडे गिरवण्यासाठी पाठवले. इथेच तिच्या नृत्य क्षेत्रातील प्रवासाला खरी दिशा मिळाली. लहानपणी भरतनाट्यम म्हणजे काय हे पूर्णपणे उमगत नसले तरी, नृत्य करताना मिळणारा आनंद तिला जाणवत होता. त्यानंतर तिने पणजीच्या गोवा कला अकादमीतही काही वर्षं प्रशिक्षण घेतले. नृत्याच्या या प्रेमापोटी ती शाळेतून आल्यानंतर शिरसई ते पणजी असा रोजचा प्रवास आनंदाने करत असे. प्रवासाचा कितीही क्षीण असला तरी एकदा वर्गात गेली की तो कुठच्या कुठे पळून जात असे. या सगळ्या धावपळीतही ती शाळेत नेहमी पहिला नंबर मिळवत असे, हे तिच्या तीव्र इच्छाशक्तीचे द्योतक आहे.

तिने गोमंतकीय तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित नृत्य स्पर्धांमध्ये ७०० हून अधिक पारितोषिके पटकावली. गोवा दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या "छुम छननन" या नृत्य स्पर्धेची ती विजेती ठरली. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तिने आपली कला सादर केली. हे सगळे करत असताना तिने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विषयात पदवी प्राप्त करून अभियांत्रिकी शिक्षणही पूर्ण केले. आठ वर्षे आयटी क्षेत्रात विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करत असतानाही तिने आपले नृत्य प्रशिक्षण सुरूच ठेवले. एप्रिल २०१६ मध्ये तिने भरतनाट्यमचा 'आरंगेत्रम' हा कार्यक्रम कला अकादमी, पणजी येथे यशस्वीपणे सादर केला.

ध्येयपूर्तीसाठी कठीण निर्णय आणि स्नेहा नृत्य अकादमीची स्थापना

आयटीसारख्या धावपळीच्या क्षेत्रात काम करताना नृत्यासाठी पुरेसा वेळ देता येत नव्हता आणि नृत्याची आवड तिला स्वस्थ बसू देत नव्हती. अखेरीस, तिला आयटी क्षेत्र की नृत्य क्षेत्र यापैकी एकाची निवड करण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला. या निर्णयात तिला माहेरच्या आणि सासरच्या माणसांनी मोलाची साथ दिली. त्याचवेळी तिला तिच्या गुरूंचे शब्द आठवले, 'ज्या पद्धतीने स्वतःची कला जोपासतेस, त्याच पद्धतीने ही कला पुढच्या पिढीने आत्मसात करावी यासाठी प्रयत्न कर.' याच प्रेरणेतून २०१७ साली 'स्नेहा नृत्य अकादमी' ची स्थापना झाली. सुरुवातीस २०१७ साली डिचोली येथील तिच्या घरी आणि त्यानंतर २०१८ साली शिरसई येथे तिने अकादमीची दुसरी शाखा सुरू केली. विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद पाहून तिने स्वतःच्या पुढच्या नृत्य शिक्षणाबरोबरच ही कला सोप्या पद्धतीने पुढच्या पिढीपर्यंत कशी पोहोचेल यावर लक्ष केंद्रित केले. कोरोनाच्या काळातही तिने ऑनलाइन वर्ग सुरू ठेवत या कलेची ज्योत तेवत ठेवली. तिच्या अकादमीच्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन आपली कला सादर केली आहे, आणि १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी तिच्या अकादमीत प्रशिक्षण घेतले आहे.

सुवर्णपदकाचे नवे शिखर आणि गोव्याला अभिमान!

आज, नृत्य क्षेत्रात २५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या स्नेहा महाले खोत यांनी प्रशिक्षण घेण्यापासून ते विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यापर्यंत आणि भरतनाट्यम तसेच विविध भारतीय नृत्य प्रकारांचे प्रशिक्षण देण्यापर्यंत अनेक भूमिका यशस्वीपणे निभावल्या आहेत. नुकतेच काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य आणि क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून तिने आपले आणि आपल्या राज्याचे नाव रोशन केले आहे. नेपाळच्या स्पर्धकांनी कडवी झुंज दिली असली तरी, तिने आपले सर्वोत्तम प्रदर्शन केले, हे तिच्या समर्पण आणि कठोर परिश्रमाचे फळ आहे. हा क्षण संपूर्ण गोव्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे, कारण आपली लेक आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकली आहे!

स्नेहाचा दृढनिश्चय आहे की, ती नृत्यकलेचा प्रचार आणि प्रसार करतच राहणार. गोव्यात भारतीय शास्त्रीय नृत्याचे एक भक्कम स्थान निर्माण करण्यात तसेच ही कला फक्त शहरांपुरती मर्यादित न ठेवता ग्रामीण भागातही पोहोचावी यासाठी ती प्रयत्नशील राहणार आहे. लहान मुलांना नृत्यकलेचा छंद जोपासण्यात आणि त्यांच्या मनात भारतीय शास्त्रीय नृत्यकलेबद्दल आदर आणि उत्सुकता रुजवण्यासाठी ती अथक प्रयत्न करत आहे. सध्या त्यांचे पुढील भरतनाट्यम प्रशिक्षण आणि मार्गदर्शन गुरु, मुंबईचे प्रख्यात भरतनाट्यम कलाकार श्री निलेश सिंघा यांच्याकडे घेत आहे. स्नेहा महाले खोत यांचा प्रवास हेच दाखवून देतो की, गृहिणी असो किंवा वर्किंग वुमन, स्त्री असो किंवा पुरुष, प्रत्येकाने कलेच्या रूपात आपल्याला मिळालेल्या दैवी देणगीची उपासना करायला हवी. कारण आपल्यामुळे आपली भावी पिढीसुद्धा आपल्या शास्त्रीय नृत्याचे आणि भारतीय संस्कृतीचे जतन करायला शिकेल. स्नेहा, तुमच्या या सुवर्णमय यशाबद्दल गोवा तुम्हाला सलाम करतो!


- स्नेहा सुतार