रात्रीच्या सामसूमीत, मोकळ्या रस्त्यावर स्वीट लेकचा शोध घेत फिरणाऱ्या सुरेशसमोर अचानक एक गूढ बाई येते. तिचं गोड हसू आणि ‘माझ्यामागे ये’ म्हणणं त्याला एका भयाण वाटेवर घेऊन जातं.
शेताच्या कडेला भलीमोठी पडीक विहिरीतून आज मोठमोठ्याने “वाचता, वाचता” असा आवाज येत होता. शेताकडची विहिर भुतांची विहिर म्हणूनच प्रचलित होती. कुणी कुत्रादेखील ढुंकूनही त्याकडे जात नसे. मोठमोठ्याने येत असलेला आवाज ऐकून शेतात जाण्याऱ्या चार-पाच बायका तेथे वळल्या, त्यांच्यामध्ये भीती होतीच पण मिळून सर्वांनी एकत्र विहिरीकडे जाण्याचे त्यांनी ठरविले. त्या तिथे जाऊन पाहतात, तर एक पर्यटक त्यांना “वाचवा, वाचवा” असा ओरडताना दिसला.
“तू इथे कसा आलास? का आलास? कोण तू?” असे प्रश्न त्याला त्या बायका विचारु लागल्या. “मुझे बाहर निकालो प्लीज... मैं रात से यहा हूँ, मर जाउंगा मैं" असा म्हणत त्याने हंबरडा फोडला. त्या बायकांनी आपल्यापाशी असलेल्या साड्यांचे गाठोडे सोडवले आणि त्या एकत्र बांधून त्यांनी विहिरीत सोडल्या. त्या माणसाला त्यांनी असे ओढून वर काढले. विहिर जास्त खोल नव्हती. तिला कठडाही नव्हता. त्यांनी आपल्याकडे असलेले पाणी, भाजीभाकर त्याला दिली. त्याने ती खाल्ली व पाणी पिऊन तो जरा बसला. त्याच्या बोलण्यावरून तो पर्यटक असून गोव्यात फिरायला आल्याचे समजले तो आता आपल्या बरोबर काय घडले ते सविस्तर सांगू लागला आपले नाव सुरेश वर्मा असल्याचे त्याने सांगितले.
“हॅलो, क्या आपण बाता सकते हो, ये रास्ता स्वीट लेक के पास जाता है?” असे विचारत तो रात्रीच्या दोन वाजता मोरजीच्या रस्त्यावर फिरत होता. सुरेश दोन दिवसापूर्वी गोवा फिरायला आपल्या मित्राबरोबर आला होता. सुरेशचे मित्र त्या रात्री स्वीट लेकवर पुढे गेले होते. हा तिथेच जाण्याच्या प्रयत्नात होता.
अमावस्येची रात्र होती, काळाकुट्ट काळोख पसरलेला होता, भुंकण्याचा आवाज येत होता पण कुत्रे मात्र एकही रस्त्यावर दिसत नव्हते. घराची दारे बंद होती. वर्दळ पण नव्हतीच. एकदम सामसूम वातावरण होते.
सुरेश वाट चालतच होता. त्याला स्वीट लेक मिळेल, आपले मित्र भेटतील याची अपेक्षा होती. त्याचा फोनही बंद पडला होता. कुणाला वाट विचारु हे ही कळत नव्हते. एवढ्यात त्याला एक बाई दिसली. ती आपल्याला वाट सांगेल अशी आशा बाळगून, “हॅलो, क्या आप बता सकते हो आन्टी, ये स्वीट लेक कहा है? जाने का रस्ता बतायेंगे क्या?" असे तिला विचारले. ती बाई फिरली व गोड स्मीत हास्य देत म्हणाली, “हाँ, आओ मैं उसी तरफ जा रही हूँ, रास्ता दिखाती हूँ. फोलो मी” म्हणाली. सुरेश तिच्या मागे मागे चालायला लागला. चालता चालता त्याला खूप दमायला झाले. सुमारे दोन-तीन किलोमीटर चालणं झालं होतं. “अभी कितनी देर हैं?” असे तो मध्ये मध्ये विचारत होता. आता रस्ता शेताच्या कडेवरून जात होता. काय चालले होते याचे त्यालाच भान नव्हते. एवढ्यात कुणीतरी त्याला जोराचा धक्का दिला व तो विहिरीत पडला.
धक्का देणारी ‘ती’ बाईच होती. विहिरीत जास्त पाणी नव्हते. पण गाळ होता. विहिरीला कठडा पण नव्हता. एवढ्यात तो वर पाहतो तर ती बाई वर बसली होती व फक्त हसत होती. तिचे डोळे लाल दिसत होते. केस सोडलेले होते. तिचे ते हसू पाहून आणि एकूणच रूप पाहून सुरेश घाबरला आणि त्याची शुद्ध हरपली. तो विहिरीतल्या चिखलात पडला.
डोळे उघडले तेव्हा सकाळ झाली होती. सुरेश भांबावून गेला होता. “वाचवा वाचवा” असा आरडाओरडा तो विहिरीतून करू लागला. सुदैवाने त्या शेतात जाणाऱ्या बायकांमुळे त्याचे प्राण वाचले होते त्या बायकांनी त्याला सांगितले, “ही भुताची विहीर म्हणूनच प्रसिद्ध आहे. तुला इथे पोहोचवणारी व ढकलणारी ती बाई नसून भूतच असेल.”
बायकांचे आभार मानून तो हॉटेलवर निघाला. सुरेशला ती रात्र आणि तिचे ते भयानक रूप आठवायचेच नव्हते. त्याने प्रत्यक्ष तिला पाहिले होते. तो पटकन रूममध्ये गेला व ताबडतोब तिकीट घेऊन घरी जाण्यास रवाना झाला