आजच्या काळात मुली प्रत्येक क्षेत्रात आपली छाप पाडत आहेत. मेकअप आर्टिस्ट हे असेच एक कलात्मक आणि उत्साही क्षेत्र आहे, जिथे तुम्ही केवळ सौंदर्य खुलवत नाही, तर स्वतःचं स्वतंत्र आणि यशस्वी करिअर घडवू शकता.
आजच्या काळात मुली प्रत्येक क्षेत्रात आपली छाप पाडत आहेत. शिक्षण, व्यवसाय, विज्ञान, कला, क्रीडा – कुठेही त्यांची उपस्थिती लक्षणीय आहे. अशाच एका कलात्मक आणि उत्साही क्षेत्राकडे मुलींनी लक्ष देणं गरजेचं आहे – ते म्हणजे मेकअप आर्टिस्ट म्हणून करिअर. हे क्षेत्र केवळ सौंदर्यसाधनांपुरतं मर्यादित नाही, तर यामध्ये नाव, पैसा आणि स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व कमावण्याची मोठी संधी आहे.
फिल्म इंडस्ट्री, फॅशन वर्ल्ड, वेडिंग इव्हेंट्स, फोटोशूट्स आणि अगदी सोशल मीडियासाठी देखील मेकअप आर्टिस्ट्सना प्रचंड मागणी आहे. प्रत्येक व्यक्तीला आज चांगलं दिसावं, आकर्षक वाटावं असं वाटतं आणि यासाठी एक कुशल मेकअप आर्टिस्ट आवश्यक असतो. विशेष म्हणजे हे क्षेत्र सतत बदलतं, नवीन ट्रेंड्स, प्रॉडक्ट्स आणि तंत्रज्ञान येत असतात – त्यामुळे काम नेहमीच चैतन्यदायी वाटतं.
या क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी अनेक प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत – थोड्याशा गुंतवणुकीतून हे शिक्षण घेता येतं. बेसिक ते ...डव्हान्स कोर्स, ब्रायडल मेकअप, एअरब्रश, सिनेमॅटिक लुक्स, अशा विविध शैली शिकायला मिळतात. प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्ही स्वतःचा स्टुडिओ सुरू करू शकता, फ्रीलान्सर म्हणून काम करू शकता किंवा नावाजलेल्या कलाकारांबरोबर अनुभव घेऊ शकता.
मेकअप आर्टिस्ट होणं म्हणजे केवळ चेहऱ्यावर रंग भरणं नाही – ती एक कला आहे जी आत्मविश्वास निर्माण करते. आज अनेक स्त्रिया या क्षेत्रातून स्वतःचा उदरनिर्वाह करत आहेत, त्यातल्या काही तर देश-विदेशात प्रसिद्धही झाल्या आहेत. तुम्हाला माणसांमध्ये काम करायला आवडतं, सौंदर्यविषयी जाणीव आहे आणि क्रिएटिव्ह विचार असतील, तर हे करिअर तुमच्यासाठी परफेक्ट आहे.
तुमचं स्वतःचं वेळापत्रक असतं, कुठे किती काम घ्यायचं ते तुम्ही ठरवू शकता. म्हणजेच हे करिअर ‘वर्क-लाईफ बॅलन्स’ ठेवण्यासाठीही उत्तम पर्याय आहे. विशेषतः महिलांसाठी, ज्या घर आणि करिअर एकत्र सांभाळू पाहतात, त्यांच्यासाठी हे क्षेत्र खूपच योग्य आहे.
मुलींनी आता पारंपरिक व्यावसायिक वाटांपेक्षा स्वतःची आवड आणि कौशल्य ओळखून निर्णय घ्यायला हवा. मेकअप आर्टिस्ट होणं हे केवळ एका छंदाचं रूपांतर न करता, स्वावलंबनाकडे नेणारा मार्ग ठरू शकतं. आपल्या हातातून इतरांचं सौंदर्य खुलवत, आपण स्वतःचं भविष्यही उजळवू शकतो!
- तृप्ती दत्तादीप गावस