राज्यात साडेपाच महिन्यात ७३.७५ कोटींचे ड्रग्ज जप्त

७८ गुन्हे दाखल : ९८ जणांना अटक, १४९.४०२ किलो ड्रग्ज हस्तगत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th June, 07:01 am
राज्यात साडेपाच महिन्यात ७३.७५ कोटींचे ड्रग्ज जप्त

पणजी : गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हा शाखा तसेच राज्यातील इतर पोलीस स्थानकांनी मिळून १ जानेवारी १५ जून २०२५ या साडे पाच महिन्यांत ७८ गुन्हे दाखल करून ९८ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ७३.७५ कोटींचे १४९.४०२ किलो ड्रग्ज जप्त केले आहे. तर, अटक करण्यात आलेल्यापैकी सर्वाधिक २६.५३ टक्के गोमंतकीयांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

जगभरात दि. २६ जून रोजी आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने राज्यातील अमली पदार्थ विरोधी कारवाईचा आढावा घेतला असता, राज्यात गेल्या (२०२४) वर्षभरात १६२ गुन्हे दाखल करून १९० जणांना अटक केली होती. त्यांच्याकडून ९.९१ कोटी रुपये किमतीचे २७५.०८२ विविध प्रकारचे ड्रग्ज जप्त केले होते. यंदा साडे पाच महिन्याची कारवाई पाहिली असता, राज्यात ड्रग्ज व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर येत आहे.

गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने वरील कालावधीत राज्यभरात ११ गुन्हे दाखल केले. त्यात त्यांनी २० जणांना अटक केली. त्यांच्याकडून ५७.३३ कोटी रुपये किमतीचे ५०.३१० किलो ड्रग्ज जप्त केला आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने १६ गुन्हे दाखल करून २० जणांना अटक केली. त्यांच्याकडून १५.०८ कोटी रुपये किमतीचे २४.४०४ किलो ड्रग्ज जप्त केले. उत्तर गोवा पोलिसांनी ३४ गुन्हे दाखल केले. त्यात त्यांनी ३५ जणांना अटक केली. त्यांच्याकडून ९६.९० लाख रुपये किमतीचे ३९.०८८ किलो ड्रग्ज जप्त केले आहे. तर, दक्षिण गोवा पोलिसांनी १६ गुन्हे दाखल केले. त्यात त्यांनी २२ जणांना अटक केली. त्यांच्याकडून २८.५४ लाख रुपये किमतीचे २७.४१४ किलो ड्रग्ज जप्त केले. याशिवाय कोकण रेल्वे पोलिसांनी १ गुन्हा दाखल केला. त्यात त्यांनी एकाला अटक केली. त्याच्याकडून ८.१८ लाख रुपये किमतीचे ८.१८ किलो ड्रग्ज जप्त केले.



हेही वाचा