गोमेकॉतील डॉक्टरांचे आंदोलन शमले, ड्रग्ज, महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ
पणजी : बांबोळी येथील गोमेकॉत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना फैलावर घेत सेवेतून निलंबित केले जाणार असल्याचे सांगितले. यानंतर गोमेकॉतील डॉक्टरांनी आंदोलन केले होते. मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्तक्षेपानंतर हे आंदोलन मिटले. या महत्त्वाच्या घटनेबरोबरच राज्य वारसा धोरणास मंत्रिमंडळाची मान्यता, याशिवाय महिलांवर अत्याचार, ड्रग्ज, अपघातांच्या घटना या आठवड्यात घडल्या असून या घडामोडींचा घेतलेला आढावा.
रविवार
डॉ. रुद्रेश कुट्टीकरांना निलंबित करणार नाही : मुख्यमंत्री
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्णाला इंजेक्शन देण्याच्या विषयावरून आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी फैलावर घेतलेल्या डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना सेवेतून निलंबित केले जाणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. शिवाय, लोकांचे जीव वाचवण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या डॉक्टरांचे त्यांनी कौतुकही केले.
कारच्या धडकेने दाबोळीत महिलेचा मृत्यू
दाबोळी विमानतळासमोरील रस्ता ओलांडणाऱ्या अंजना आदेल (५७, शांतीनगर) हिला एका वाहनाने धडक दिल्याने उपचारादरम्यान इस्पितळात तिचा मृत्यू झाला. वास्को पोलिसांनी या अपघातप्रकरणी वाहनचालक मंजू नाईकर (३४, केपे) विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका केली.
गांजासह युवकाला अटक
गांजा बाळगल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी कांपाल येथे कारवाई करून युवराज कर्डे (२७, बेती - बार्देश) या संशयिताला अटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख रुपये किमतीचा १ किलो गांजा जप्त केला. याशिवाय त्याने वापरलेली इनोव्हा गाडी जप्त केली आहे.
सोमवार
मुख्यमंत्र्यांकडून डॉक्टरांना आंदोलन थांबविण्याचा सल्ला
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गोमेकॉतील डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांच्यासोबत केलेल्या गैरवर्तनाचा निषेध करत सोमवारी आंदोलन छेडलेल्या डॉक्टरांची भेट घेऊन त्यांना आंदोलन थांबवण्याचा सल्ला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला. आंदोलक डॉक्टरांच्या मागण्या मान्य करण्यासह, गोमेकॉत यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी शिस्तपालन समितीची स्थापना करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.
ट्रक -कारच्या धडकेत युवकाचा मृत्यू
पणसुले येथे रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या ट्रकला भरधाव कारची धडक बसून झालेल्या अपघातात एका युवकाला जीव गमवावा लागला. हवेली कुर्टी येथील उत्तम सिन्हा (२३) हा मोले येथून फोंड्याच्या दिशेने येत होता. पणसुले येथे रस्त्यावर ट्रक उभा होता. उत्तम सिन्हाला उभ्या ट्रकचा अंदाज आला नाही. त्या ट्रकला त्याच्या कारची जोरदार धडक बसून हा अपघात घडला.
मंगळवार
गोमेकॉतील डॉक्टरांचे आंदोलन मागे
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गोमेकॉतील डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे गेल्या चार दिवसांपासून पेटलेला वाद अखेर मिटला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करून मंगळवारी हा वाद मिटवला. मंत्री राणे यांनी डॉ. कुट्टीकर यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी करत आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांच्या मागण्या मान्य करून आणि समजूत काढून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आंदोलन बंद केले.
हरमल येथे २.५९ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त
गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने हरमल येथे पथकाने छापा टाकून २.५९ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. या प्रकरणी स्वीडनच्या तीन नागरिकांनाही अटक करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशमधील लोकांना गंडा घालणाऱ्या टोळीला गोव्यात अटक
उत्तर प्रदेशमधील लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून त्यांची डिजिटल यंत्रसामग्रीमार्फत फसवणूक करणाऱ्या तिघांच्या ऑनलाईन टोळीला उत्तर प्रदेश पोलिसांनी साळगाव पोलिसांच्या सहाय्याने सांगोल्डा-बार्देश येथून अटक केली. या गुजराती टोळीने उत्तर प्रदेश मधील एका आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलीला देखील १० लाखांचा गंडा घातला आहे.
केशव राम चौरसियांनी घेतला महानिरीक्षकपदाचा ताबा
हल्लीच गोव्यात बदली झालेले भारतीय पोलीस सेवेचे (आयपीएस) अॅग्मू केडरच्या २००३ बॅचचे केशव राम चौरसिया गोवा पोलीस सेवेत रूजू झाले आहेत. त्यांनी नवीन पोलीस महानिरीक्षक म्हणून ताबा घेतला आहे. भारतीय पोलीस सेवेचे (आयपीएस) अधिकारी केशव राम चौरसिया यांची हल्लीच केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्लीतून गोव्यात बदली केली होती.
बुधवार
कळंगुटमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार
आगशी पोलीस स्थानकाच्या परिसरातील दोन अल्पवयीन मुलींवर कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी आगशी पोलिसांनी पर्वरीतील दोघा तरुणांना अटक केली आहे. पोलिसांनी दोन्ही पीडित मुलींसह आणखी एका अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका केली.
म्हापसा-धुळेर येथे ३० किलो गांजा जप्त
गुन्हा शाखेने धुळेर-म्हापसा येथे छापा टाकून धुळे-महाराष्ट्र येथील सुखदेव कोळी (२१) आणि रवींद्र भील (२४) या दोघा संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून ३० किलो गांजा जप्त केला. याशिवाय त्यांनी वापरलेली मारुती सियाझ कार आणि मोबाईल जप्त केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची किमत ४०.१० लाख रुपये आहे.
गुरुवार
बेकायदेशीर बांधकाम; प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
राज्यातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल घेतली आहे. या प्रकरणी दोन्ही जिल्हाधिकारी आणि नगरपालिका प्रशासनाने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रकरणी दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र दाखल करा, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्यातील पंचायतींना आणि नगरपालिकांना दिला आहे.
रशियनाकडून ३.६५ लाखांचे ड्रग्ज जप्त
मांद्रे पोलिसांनी हरमल येथील उर्मी योग अकादमीजवळ अमली पदार्थ बाळगणाऱ्याला पकडले आहे. मांद्रे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण देसाई यांच्या नेतृत्वाखाली दोन पंचासह कारवाई करत अमली पदार्थावर पोलिसांनी छापा टाकला. संशयित डेनिस स्क्रीच कोय (५१ वर्षे, मूळ रशिया. सध्या रा. हरमल) याच्याकडून ३०० ग्रॅम वजनाचा ३ लाखाचा चरस व ६५ हजार रुपयांचा अमली पदार्थ तसेच एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.
शुक्रवार
व्यावसायिक ब्रुनो फर्नांडिस याच्याविरोधात गुन्हा दाखल
हेल्थ सेंटरमध्ये नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून २०२३ पासून २७ वर्षीय महिलेवर बार्देश परिसरात तसेच गोव्याबाहेर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. या प्रकरणी पर्वरी पोलिसांनी व्यावसायिक ब्रुनो फर्नांडिस याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्रुनो फर्नांडिस हे आपचे २०२२ मधील हळदोणाचे उमेदवार होते. त्यांनी आप पक्ष सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
‘समग्र शिक्षा अभियान’ अफरातफर प्रकरणी मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक
शिक्षा अभियान’च्या गोवा शाखेच्या बँक खात्यातून ५.३६ कोटी रुपयांची अफरातफर करण्यात आल्याप्रकरणी गुन्हा शाखेने मुख्य सूत्रधार सुभाशीष सिकदर आणि म्रिगंका जाॅदिर या दोघांच्या मुसक्या आवळल्या. यातील सुभाशीष सिकदर याला पश्चिम बंगाल येथील न्यायालयाने अंतरिम जामीन देऊन २४ जून रोजी म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयात शरण येण्यास सांगितले आहे.
शनिवार
५६५ पोलीस कर्मचाऱ्यांची बदली
गोवा पोलीस खात्यात मोठ्या प्रमाणावर अंतर्गत बदल करण्यात आले आहेत. दोन निरीक्षक, ३४ उपनिरीक्षक आणि इतर मिळून एकूण ५६५ पोलीस कर्मचाऱ्यांची बदली झाली असून, यातील ६० जणांची नियुक्ती पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.
दुचाकीची गुरांना धडक बसून युवक ठार
गावणे येथे दुचाकीची भटक्या गुरांना धडक बसली. यात राजीनवाडा, बांदोडा येथील दुचाकीस्वार दिक्षय गुरुदास गावडे (३०) हा युवक ठार झाला आहे.
लक्षवेधी
अन्न व औषधे प्रशासनाने म्हापसा मार्केट सबयार्डमधील रसायन वापरून कृत्रिमरीत्या पिकवलेली दीड टनपेक्षा जास्त केळी जप्त केली. तसेच त्यांचे नमुने घेण्यात आले. शिवाय करासवाडा व थिवी येथील सहा मांस दुकानांची तपासणी केली. त्यापैकी दोन दुकाने अस्वच्छतेच्या कारणास्तव बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नीट परीक्षेत गोव्यातून रिषभ नीलेश तळवडकर प्रथम आला आहे.
काणकोण तालुक्यातील १७ वर्षीय मुलीवर २०१७ मध्ये लैंगिक अत्याचार, तर तिच्या बहिणीचा विनयभंग करण्यात आला होता. या प्रकरणी बाल न्यायालयाने वडिलांना दोषी ठरविले आहे. याबाबतचा निवाडा बाल न्यायालयाच्या अध्यक्ष सई प्रभुदेसाई यांनी दिला आहे. १९ जून रोजी शिक्षेवर सुनावणी होणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाने ‘राज्य वारसा धोरण-२०२५’सह चिंबल येथील युनिटी मॉलच्या वर्कऑर्डरलाही मान्यता दिली. बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबतची माहिती दिली.