ध्येयाशी प्रामाणिक असणारे अग्नी सर...

लहान मुलं ही एखाद्या दगडासारखी असतात त्यांचा हिरा शिक्षकांनी करायचा हे त्यांचे ब्रीदवाक्य आणि त्या प्रमाणेच वाटचाल आहे त्यांची. चांगली प्राध्यापकी सोडून शाळेत मुख्याध्यापक पद घेणारे अग्नी सर खरोखरंच आपल्या ध्येयाशी खरोखर प्रामाणिक आहेत.

Story: व्यक्ती एके व्यक्ती |
13th June, 09:43 pm
ध्येयाशी  प्रामाणिक  असणारे अग्नी सर...

आमची कन्या त्यावेळी इयत्ता चौथीत होती. शाळा तशी जुनी आणि नामवंत शहरात. कित्येक मोठे लोक होते शाळा कमिटीवर. अगदी डोळे झाकून शाळेत घालावे मुलांना. दहा वर्षे बघायला नको याबद्दल विश्वास सर्वांना. फॅक्टरीतून कसा सुबक वेष्टनात माल बाहेर पडतो ना तसे दहावीनंतर विद्यार्थी बाहेर पडत तयार होऊन. मग ८० टक्के काय ९० टक्के काय. विचारू नका.

तर शाळा सुरु झाली. आम्ही पण खूश. रोज सकाळी चकाचक युनिफॉर्म घालून शाळेत जायचे, स्वच्छ दप्तर, वॉटर बॅग, बुट काय थाट नुसते. सुरुवातीस सगळेच एन्जॉय करीत होते. सकाळी ट्रॅक्समधून शाळेत मग दुपारी घरी जेवण, झोप, अभ्यास, मग टीव्ही झाला संपला दिवस. ४ वर्षे गेली सगळे सुरळीत. पण काहीतरी कमीपणा जाणवत होता. तसे माझे सासर रसिक घराणे. संगीत, नाट्य, राजकारण यात सदा पुढे. मी स्वतः सुध्दा लहानपणी नाटके, गाणी वगैरेत भाग घेणारी. घरात माझी मुलगीसुध्दा तशीच हौशी आहे हे कळत होते. पण शाळेत तसे वातावरण नव्हते म्हणा किंवा आणि काही म्हणा पण अभ्यासाव्यतिरिक्त इतर गुणांची जोपासना तिथे होत नव्हती हे नक्की.

एक रूटीन म्हणून मुलं स्पर्धांना जायची काहींना बक्षीस मिळायचे पण ते त्यांच्या अंगभूत गुणांमुळे. शाळेचा सहभाग तसा कमीच आणि एक शिक्षिका ह्या नात्याने मला ते पटतही नव्हते. आजकालच्या जगात अभ्यासाव्यतिरिक्त अनेक इतरही गोष्टी आहेत शिकण्यासारखे ह्या मताची मी. मग रहावेना मार्ग शोधायला सुरुवात केली.

मुलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय घेतलेल्या शाळेचा शोध चालू झाला. खूप फिरले, अनेकांना विचारले, उत्तर एकच आले "रविंद्र केळेकार ज्ञान मंदिर", अग्नी सरांची शाळा. म्हटलं ठीक आहे. अर्थात कोंकणी मिडियम शाळा पण तसा फरक पडणार नव्हता. कारण माझ्या लेकीला लहान वयातच सुंदर कोंकणी बोलायला येत होते. मग ठरवले गेलो आम्ही शाळेत. छोटीशी, सुबक, जुन्या ठेवणीची दोन मजली इमारत, मध्ये छोटेसे पटांगण, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुलांचा किलबिलाट आणि अगदी हसऱ्या, आनंदी चेहऱ्याचा कर्मचारीवृंद. मनाशी खूणगाठ बांधली आणि ऑफिसात चौकशी केली. सर कदाचित मीटिंगमध्ये असावेत. मधल्या वेळेत त्या क्लार्कने शाळेची पूर्ण माहिती दिली. पण माझे पूर्ण लक्ष त्यापेक्षा समोर कपाटात, टेबलवर खच्चून भरलेल्या ट्रॉफी, बक्षिसांच्या वरच खिळले होते. कथाकथन काय, खेळ काय, नाटक, नृत्य काही विचारु नका. अगदी राष्ट्रीय पातळीपर्यंत. काही विचारू नका. म्हटले योग्य ठिकाणी पोहोचलो.

तेवढ्यात दरवाज्यात एक उंच, सावळ्या वर्णाचे दाढीधारी व्यक्तिमत्त्व प्रकटले. ओळख झाली "अग्नी सर", हसतमुख चेहऱ्याने ते समोर बसले. बोलणी झाली. वागण्यात आत्मविश्वास, बोलण्यात ठाम, शब्दोच्चार स्पष्ट, मुळात कुठेही गर्वाचा लवलेश नाही, मुख्याध्यापक पदाचा साधा उल्लेखही नाही. मनाला भावले व्यक्तिमत्त्व आणि चालु झाला मुलीचा नवीन प्रवास.

खरोखरंच काही माणसे एका ठराविक कार्याकरता जन्माला येतात आणि यशस्वीही होतात. कदाचित हा ईश्वरी संकेतही असावा. पण खरंच सरांच्या पूर्ण व्यक्तिमत्त्वात फक्त शिक्षक नी शिक्षकच दिसतो. शिशुवर्गापासून ते दहावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना सर आपलेसे तर वाटतातच पण त्या पलीकडे एक नाते आहे विश्वासाचे. एकदा अग्नी सरांच्या ताब्यात पाल्य गेला की मग तो त्यांचाच.

एखाद्या कामात झोकून देणे हा पिंडच त्यांचा आणि ते ज्ञान दानाबाबत असेल तर पाहायलाच नको. प्रत्येक गोष्ट स्वतः अनुभवून मग मुलांना शिकवणे यात तर हातखंडा त्यांचा. महात्मा गांधींचे निस्सीम चाहते असणारे सर ज्या वेळेस माझ्या मुलीने राज्यस्तरीय महात्मा गांधी स्मृती कथाकथन स्पर्धा जिंकली त्या वेळेस खरेच गहिवरुन आलेले पाहिले त्यांना. एक बघितले सरांचे एखादा विद्यार्थी त्यांच्या सहवासात दोन दिवस जरी राहिला तरी बास. सर त्यांचे योग्य गुण जोखुन त्यांना योग्य प्रवाहात आणतात.

एक प्रसंग सांगते, ३ वर्षांपूर्वी पिकनिकला गेले असता अचानक हल्ला केला मधमाशांनी मुलांवर. सगळे घाबरले, पळाले पण सर शेवटचा विद्यार्थी व कर्मचारी रिसॉर्टमध्ये येईपर्यंत बाहेरच थांबले. मधमाशांनी हल्ला केला त्यांच्यावर पण ठाम राहिले खरेच विद्यार्थ्यांना आपल्या मुलासारखे वागवणारे शिक्षक आहेत तरी कुठे आता? त्या पार्श्वभूमीवर सर खरेच उल्लेखनीय.

लहान मुलं ही एखाद्या दगडासारखी असतात त्यांचा हिरा शिक्षकांनी करायचा हे त्यांचे ब्रीदवाक्य आणि त्या प्रमाणेच वाटचाल आहे त्यांची. अहो चांगली प्राध्यापकी सोडून शाळेत मुख्याध्यापक पद घेणारे अग्नी सर खरोखरंच आपल्या ध्येयाशी खरोखर प्रामाणिक आहेत. कोंकणी भाषेचा ज्वलंत अभिमानी असा हा माणूस एक कवी, स्तंभलेखक म्हणून सुपरिचित सर्वाँना. सूत्रसंचालन हा तर हातखंडा त्यांचा. आज त्यांच्या शाळेतून अनेक क्षेत्रात विद्यार्थी गोव्यात, राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. पण सर मात्र तिथेच आहेत. फॅक्टरी चालु जरूर आहे पण फक्त सुबक वेष्टनातील मालाची नव्हे तर दर्जेदारपणाची, ध्येयाची, कलागुणांची, आणि मुख्य म्हणजे दुसरे अग्नी सर व्हायचे ठरवून बाहेर पडणाऱ्यांची.


-   रेशम जयंत झारापकर 

मडगाव