इतर तर्कात न अडकून पडता त्या योगायोगावर विसंबून निर्णय घेणे सोपे असेल, नसेल... पण या शक्यतेवर विश्वास ठेवणे सुंदर नक्कीच असेल!
‘गुगल फोटोज्’ हे ऍप्लिकेशन मला फार आवडते. आपले एकसारखे फोटो, व्हिडिओ एकत्र करून ते आठवणींच्या स्वरूपात, अगदी त्याला छान संगीत वगैरे लावून आपल्यासमोर पेश करत असते. दर आठवड्याला तर गेल्या अनेक वर्षांच्या फोटोंमधले काही निवडक फोटो निवडून ते आपल्याला दाखवत असते. अगदी दहा-बारा वर्षे जुने फोटो असे न शोधता आपल्यासमोर आले की किती सुख आणि दुःखही घेऊन आठवणी दाटून येतात? अशावेळी वाटते की आपल्या आठवणींचा असा सोहळा आपल्याव्यतिरिक्त दुसरा कुणीतरी साजरा करतोय हे एक वरदानच ना, मग ते सॉफ्टवेअर का असेना! अशा आठवणी वर आल्या की मी त्या संबंधित व्यक्तींना पाठवत असते. यामुळे कदाचित त्यांचाही दिवस आठवणींनी उजळून निघून आनंदी होत असेल. जुन्या, संपर्कात नसलेल्या व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी आठवणींचा धागा पकडण्यापेक्षा सहज आणखी काय असू शकते?
परवा ८ वर्षांपूर्वीच्या एका संध्याकाळचा एक फोटो एका मैत्रिणीला पाठवला. तिला ती संध्याकाळ आठवत असेल का? असा प्रश्न मनात आला पण तरीही दिला पाठवून. त्यावर तिचे उत्तर आले की हा अजब योगायोग आहे. तिला म्हणजे अगदी दोन-तीन दिवसांपूर्वीच ती संध्याकाळ आठवली होती! ती म्हटली, कदाचित माझी आठवणच इतकी प्रकर्षाने तुझ्यापर्यंत पोहचली असेल. म्हणूनच तर तीन-चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मला तिला मेसेज करावासा वाटला! हे न सांगता येण्यासारखे किंवा सांगूनही न समजण्यासारखे योगायोग सतत घडत असतात. ‘कावळा बसायला आणि फांदी तुटायला’ असे म्हणून आपण बऱ्याचदा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा त्यांना गांभीर्याने घेत नाही. काहीवेळा तर या सगळ्यावर विश्वास ठेवायला आपला मेंदूही तयार नसतो. पण अशावेळेला जरा मनाचे ऐकले, तर लक्षात येते की हे योगायोग खूप सुंदर असतात. ते घडत असतात, तेव्हा त्यांच्यावर आणि आपल्याला न दिसणाऱ्या कोणत्यातरी शक्तीवर विश्वास ठेवला की येणारी अनुभूती सुंदर असते.
एखादी कलाकृती आपल्याला का भावते याचे काही ठोकताळे नसतात. आज न आवडलेले पुस्तक किंवा आज कंटाळवाणा वाटलेला चित्रपट काही वर्षांनी आपल्याला आवडू शकतो. उलट बाबतीतही हे खरे आहे. आपले वाढत जाणारे वय, विस्तारत जाणारे अनुभवाचे विश्व हे यासाठी जबाबदार असतेच; पण आपली त्या वेळेची मनःस्थिती आपली एखाद्या कलाकृतीकडे बघण्याची नजरच पूर्णपणे बदलून टाकू शकते. म्हणजे एखाद्या कलाकृतीतून काय घ्यायचे किंवा त्यातील कोणत्या संदर्भाने जास्त प्रभावित व्हायचे याचे काही नियम असत नाहीत. बघणाऱ्याचे (किंवा पुस्तकांच्याबाबतीत वाचणाऱ्यांचे) वय, क्षेत्र, विचार यांवर ते अवलंबून असतात; मात्र हल्लीच ‘सेपिया’ नावाचा लघुपट पाहिला आणि जाणवलं की आपल्या मनाच्या आत चालू असणारी विचारचक्र प्रत्यक्ष नाही तरी आडवळणाने कशी प्रकट होत असतात.
त्या संध्याकाळचा फोटो, मैत्रिणीचा मेसेज, तिने सांगितलेला योगायोग हे डोक्यात नसते तर मी अतिशय वेगळ्या संदर्भात या लघुपटाबद्दल विचार केला असता. आत्तासुद्धा मला असे जाणवते आहे, की मला अनेक प्रकारे या लघुपटाबद्दल लिहिता येईल; पण मी मात्र मला जाणवलेली एकच बाजू अधोरेखित करणार आहे. म्हणूनच तर सुरुवातीला इतकी पार्श्वभूमी सांगितली! लघुपटाचा विषय असा, की काही महिन्यांतच लग्न होणार असलेले तरुण जोडपे आपापल्या आयुष्याच्या आणि त्याचबरोबर करिअरच्याही वाटा धुंडाळत असते. एकमेकांबद्दल प्रेम, भविष्याबद्दल काळजी आणि सोबत एकमेकांच्या न पटणाऱ्या काही गोष्टी आणि असुरक्षितताही असतेच! असे म्हणतात एकदा पाण्यात पडल्यावर माणूस हातपाय मारतोच. लग्नाचे किंवा कोणत्याही नात्याचे हे असेच आहे. पण आजकाल पाण्यात पडण्यापूर्वीच इतका विचार केलेला असतो, खरेतर एक पाय पाण्यात टाकून दुसरा टाकेपर्यंत हा विचार चालूच असतो.
पाण्याबाहेरचा पाय आत टाकावा? का वेळ गेली नाहीये तोवर आतला काढून घ्यावा? असे हे विचार असतात काहीबाबतीत हे विचार करून, सगळ्या बाजूंचा तौलनिक अभ्यास करून निर्णय घेणे हे पटते. घाईघाईत, आंधळेपणाने निर्णय घेण्यापेक्षा ते कधीही चांगलेच; नाही का? पण कधीकधी मात्र यांचा अतिरेक होतो. मन विचारातच अडकून पडते. विश्वास ठेवायचे विसरून जाते. पाण्यात पडूनसुद्धा हातपाय मारण्याचे बंधन नसते. पाण्यातून (नात्यातून) बाहेर पडणे हे आता पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. अर्थातच ही चांगली गोष्ट आहे. पण बाहेर पडण्याचा पर्याय आहे म्हणून तो दरवेळेला स्वीकारावा का?
काहीवेळा पाणी बदलून, हातपाय मारण्याची तऱ्हा बदलून, आधारासाठी फ्लोट घेऊन पाण्यात राहणे शक्य असतेच. अतिविचारांच्या भोवऱ्यात फिरताना मात्र हे काही जाणवत नाही. मुळात पाण्यात पडायचा निर्णयच जिथे होत नसतो, तिथे पाण्यात तग धरायचा निर्णय न होणे हे साहजिकच. अर्थातच यात कुणालाही दोष देण्याचा उद्देश नसून, फक्त निरीक्षण नोंदवणे हा हेतू आहे. लघुपटातले हे जोडपे काहीशा अशाच मनःस्थितीतून जात असते. लग्न केल्यावर एकमेकांच्या न आवडणाऱ्या गोष्टींबद्दल त्रास करत आयुष्य काढण्यापेक्षा लग्न करायच्या आधीच या गोष्टींचा विचार करणे केव्हाही चांगलेच. खरेतर हाच धागा पकडून हा लेख लिहिता आला असता पण लघुपटाच्या शेवटी सगळे तर्क खोडून काढणारी एक घटना घडते. क्षेत्र लघुपटाच्या सुरुवातीलाच ती काही क्षणांसाठी पडद्यावर तरळते पण तिचा संदर्भ शेवटी लक्षात येतो. सेपिया... हे एका लाल-तपकिरी अशा रंगाचे नाव... जुने फोटो होतात ना? तोच हा रंग. या रंगाचा संदर्भ भूतकाळातील काही घटना, योगायोग आणि आठवणींशी जोडला आहे. ‘हो-नाही’ च्या हिंदोळ्यावर असलेल्या या जोडप्याच्या निदर्शनास अशीच एक सेपिया गोष्ट येते... इतर तर्कात न अडकून पडता त्या योगायोगावर विसंबून निर्णय घेणे सोपे असेल, नसेल... पण या शक्यतेवर विश्वास ठेवणे सुंदर नक्कीच असेल!
माझ्या मैत्रिणीचा मेसेज आला आणि त्याच काही दिवसांत मी हा लघुपट बघितला हाही एक सुंदर योगायोग म्हणावा असाच!
- मुग्धा मणेरीकर
फोंडा