हातकणंगलेत आर्थिक वादातून विवाहित महिलेची निर्घृण हत्या

आरोपीचा गुन्हेगारी इतिहास उघड; पत्नीच्या खुनानंतर प्रेयसीचाही घेतला जीव

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
13th June, 06:05 pm
हातकणंगलेत आर्थिक वादातून विवाहित महिलेची निर्घृण हत्या

कोल्हापूरः हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील हॉटेल सागरिकामध्ये प्रियकराने विवाहित महिलेची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सुमन सुरेश सरगर (सध्या रा. उचगाव, मूळ जत, जि. सांगली) असे मृत महिलेचे नाव आहे. या महिलेची हत्या करणारा तिचा प्रियकर आणि घटनेतील संशयित आदमगौस पठाण (वय ४२, रा. घुणकी, ता. हातकणंगले) याला हातकणंगले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या घटनेविषयी मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान सुमन सरगर व आदमगौस पठाण याची ओळख झाली होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांच्यात वारंवार पैशाची देवाणघेवाण व्‍हायची. दरम्यान गुरूवारी सायंकाळी आदमगौस पठाण सुमन सरगर हिच्यासोबत कोल्हापूर-सांगली महामार्गावरील सारगिका लॉजिंगमध्ये आला. यावेळी पठाण आणि सुमन सरगर यांच्यात आर्थिक कारणावरून वाद झाला.

वारंवार मागणी करूनही सुमन रक्कम देत नाही, हे लक्षात येताच पठाणने तिच्या डोक्यात हातोडीचे घाव घालून तिची निर्घृण हत्या केली. हत्या करताच पठाण याने विषारी औषध घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हॉटेलमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी आत्महत्येची घटना रोखत पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी हॉटेल सागरिकासमोर गर्दी केली होती. तसेच जयसिंगपूर विभागाच्या पोलीस उपअधीक्षक रोहिणी सोळंकी व हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी सहकाऱ्यांसह तातडीने धाव घेऊन तपास सुरू केला.

स्वत:च्या पत्नीची क्रूरपणे हत्या
आदमगौस पठाण हा कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत कामाला आहे. पठाणची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून त्याने काही वर्षांपूर्वी स्वत:च्या पत्नीची देखील क्रूरपणे हत्या केली होती. मैत्रीचे नाते जोडून पैसे उकळण्याची आदमगौसची पद्धत होती, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, आता त्याने आर्थिक वादातून प्रेयसी सुमन सुरेश सरगर हिला देखील क्रूरपणे संपवलं आहे.

अनेक प्रश्न उपस्थित
सुमनची हत्या करण्यासाठी पठाणने वापरलेला हातोडा लॉजवर कसा आला? पत्नीची हत्या केलेल्या व्यक्तीबरोबर महिलेने प्रेमसंबंध का निर्माण केले? त्यांच्यात यापूर्वी कितीवेळा आर्थिक देवाण-घेवाण झाली या आणि अशा अन्य प्रश्नांचा शोध पोलीस तपासाद्वारे घेत आहेत. 

हेही वाचा