गणेशगुडी-दांडेली भागातील हॉटेल्स, होम स्टे व्यवसाय ठप्प; पर्यटन व्यावसायिक हवालदिल
जोयडा : जोयडा तालुक्यातील गणेशगुडी येथील काळी नदीत सुरू असणाऱ्या जलसाहस क्रीडा प्रकारांवर १ जून ते ३० सप्टेंबर या ४ महिन्यांच्या कालावधीसाठी जिल्हा प्रशासनाने स्थगिती आणली आहे. त्याचा परिणाम स्थानिक पर्यटन व्यवसायावर झाल्याने व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयावर असमाधान व्यक्त केले आहे.
गणेशगुडी पासून दांडेलीपर्यंत काळी नदीत अनेक ठिकाणी राफ्टिंग, कयाकिंग, जाकोजीबात, बोटिंगसह अनेक प्रकारच्या जल क्रीडा होतात. ही नदी जल क्रिडांसाठी प्रसिद्ध असल्याने देश विदेशातून येथे वॉटर राफ्टिंगसाठी पर्यटकांचा राबता असतो. साहाजिकच त्यामुळे येथील रिसॉर्ट, होम स्टे व अन्य पर्यटन व्यवसाय देखील चालतो. मात्र जिल्हा पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनीच मुदतीपूर्वी म्हणजे १ जून ते ३० सप्टेंबर या ४ महिन्यांच्या कालावधीत जलक्रीडा बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने येथील व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
पाणी साठ्यात कमालीची घट, त्यामुळे धोका नाही
मुर्डेश्वर, होन्नावर, गोकर्णच्या समुद्र आणि नदी किनाऱ्यावर होणारे जलक्रीडा प्रकार आणि काळी नदीवर होणारे जलक्रीडा हे वेगळे आहेत. काळी नदी सुपा धरणाच्या खालच्या बाजूला असून अजून मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला नसल्याने नदीला पुराचा धोका नाही. धरणांच्या पाणी साठ्यात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे काळी नदीवरील जलसाहस क्रीडा सुरू ठेवण्यास कोणतीच अडचण नसल्याचे पर्यटक व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्याने जारी केलेल्या आदेशाबाबत पुनर्विचार करावा व जलसाहस क्रीडांना परवानगी द्यावी, अशी मागणी पर्यटन व्यावसायिकांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
मान्सूनपूर्व काळात या भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नदी नाल्यातील पाणी पातळी वाढली व समुद्रात वादळी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी कारवार जिल्ह्यातील समुद्र किनारे, नदी व नदीच्या किनारी भागात चालणाऱ्या जलसाहस क्रीडा सुरू ठेवणे योग्य नाही, म्हणून पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत सर्व प्रकारच्या जल साहस क्रीडाना बंदी घालण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.
व्यावसायिक हवालदिल
जोयडा, दांडेली येथील होम स्टे, रिसॉर्ट हे काळी नदीवर चालणाऱ्या जलसाहस क्रीडावर अवलंबून आहेत. पण येथे बंदीचा काळ सुरू होण्यापूर्वीच जलसाहस क्रीडावर बंदी घातली आहे. त्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या सर्व व्यवसायावर परिणाम झाला असून जिल्हाधिकाऱ्यांनी या क्रीडा पुन्हा सुरू करण्यास परवानगी द्यावी- रवी रेडकर, अध्यक्ष काळी पर्यटन संस्था, जोयडा