सुकमा : नक्षलविरोधी कारवायांना गेल्या काही काळापासून चोख प्रत्युत्तर देणाऱ्या छत्तीसगड पोलिसांवर आज सोमवारी नक्षलवाद्यांनी भीषण आयईडी हल्ला केला. सुकमा जिल्ह्यात दोंड्रा गावाजवळ हा स्फोट घडवून आणण्यात आला. या हल्ल्यात कोंटा विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आकाश राव गिरीपुंजे हुतात्मा झाले, तर अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. ही घटना सकाळी ९ ते १० वाजण्याच्या सुमारास घडली.
सीपीआय (माओवादी) ने दिलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक गिरीपुंजे आपल्या पथकासह पायी गस्त घालत असताना हा आयईडी स्फोट झाला. गंभीर जखमी झालेल्या गिरीपुंजे यांना तातडीने कोंटा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. इतर जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवण्यात येत आहे. स्फोटानंतर नक्षलवाद्यांनी तेथून पलायन केले असले तरी त्यांचा माग काढण्यासाठी विशेष फोर्स तैनात करण्यात आला आहे. छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शामरा यांनी या घटनेवर शोक व्यक्त करताना म्हटले की, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आकाश राव गिरीपुंजे हे अत्यंत शूर, कर्तव्यनिष्ठ अधिकारी होते. त्यांचा मृत्यूने छत्तीसगड आणि पोलीस दलाचे मोठे नुकसान झाले आहे.
हल्ल्यांची मालिका कायम
सुरक्षा दलांनी गेल्या काही महिन्यांत नक्षलविरोधी कारवायांत मोठे यश मिळवले आहे. अनेक भागांतून नक्षलवाद संपवण्यात यश आल्याचे चित्र असले तरी, अशा हल्ल्यांमधून नक्षलवादी अजूनही सक्रिय असल्याचे स्पष्ट होते. यापूर्वी जानेवारी २०२५ मध्ये विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या आयईडी स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे, पोलिसांसमोर अजूनही मोठे आव्हान कायम आहे.
राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, नक्षलविरोधी मोहिमेला अधिक तीव्रतेने राबवण्याचे संकेत दिले आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक गिरीपुंजे यांच्या बलिदानाचा बदला घेतला जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.