आरोग्यदायी बडीशेप...

हॉटेलमध्ये जेवण जेवून झाल्यानंतर एका वाटीत आपल्याला बडीशेप खायला दिली जाते. ही बडीशेप का दिली जाते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
5 hours ago
आरोग्यदायी बडीशेप...

बडीशेप औषधी गुणांनी युक्त आहे. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ली असता आपल्या शरीराला बडीशेप अनेक आजारांपासून दूर ठेवते. जेवण झाल्यानंतर बडीशेप खायला दिली जाते कारण ती पचन क्रियेत मदत करते. बडीशेप शक्यतो कच्ची खावी किंवा हलकी भाजून घेऊन चावून चावून खावी. जास्त भाजली असता यामध्ये शरीरास आवश्यक असलेले तेल उडून जाते. 

बडीशेप, धणेपूड, जिरे, ओवा असे पदार्थ एकत्र करून सुद्धा जेवल्यानंतर पचन व्यवस्थित होण्यासाठी सेवन केले जातात. पोटात गॅस होत असेल, पोट जड झालं असेल किंवा गॅसमुळे पोटात दुखत असेल तर १ चमचा बडीशेप २ कप पाण्यात शिजवून, आटवून १ कप तयार झालेला काढा थोडीशी खडीसाखर घालून प्यायल्याने पोटाच्या तक्रारी कमी होतात. शी घट्ट होत असेल आणि शी करताना त्रास होत असेल तर बडीशेपच्या काढ्यात चमचाभर साजूक तूप घालून घोट घोट प्यावा. 

थकवा येऊन खूप तहान लागली असता बडीशेपचे सरबत तयार करून घेतले असता तहान भागते आणि थकवा सुद्धा नाहीसा होतो. पचन क्रिया सुधारणारी बडीशेप जेवणानंतर पाव चमचा या प्रमाणात चावून चावून खा किंवा बडीशेप, धणेपूड, जिरे इ. घातलेले मुखवास सुद्धा खायला हरकत नाही. पण एकावेळी अर्ध्या चमच्यापेक्षा जास्त प्रमाणात बडीशेप खाऊ नये. विशेषतः हॉटेल मधील पचायला जड असे पदार्थ खाल्ल्यानंतर बडीशेप नक्की खावी.


- वैद्य कृपा नाईक,
आयुर्वेदाचार्य