बार्देश : जमीन हडप प्रकरण : अखेर रोहन हरमलकरला ईडीकडून अटक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th June, 03:17 pm
बार्देश : जमीन हडप प्रकरण : अखेर रोहन हरमलकरला ईडीकडून अटक

पणजी : बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनी हडप केल्याप्रकरणी चर्चेत असलेले  व्यावसायिक रोहन हरमलकर यांना अखेर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंग कायद्यान्वये अटक केली आहे. म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयाने त्याला १४ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. २०२२ मध्ये हरमलकर यांनी कुंभारजुवे मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

१६०० कोटींच्या व्यवहारांची चौकशी

ईडीने गोव्यात आतापर्यंतची सर्वात मोठी छापेमारी केली. यात पिळर्ण, पर्वरी, दिवाडी आदी ठिकाणी छापे टाकून हणजूण, हडफडे, आसगाव परिसरातील जमिनींची बनावट कागदपत्रे तसेच सुमारे १६०० कोटींच्या स्थावर मालमत्तांचे दस्तऐवज जप्त केले होते. या छाप्यावेळी पिळर्णमधील हरमलकर यांच्या घरालाही टाळे ठोकण्यात आले होते.

हणजूणमधील जमीन हडप प्रकरण

कॅनडास्थित जॉयसे पिंटो यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर बनावट कागदपत्रांद्वारे कब्जा केल्याची तक्रार त्यांच्यातर्फे आंतोनियो डिकॉस्टा यांनी एसआयटीकडे दिली होती. हणजूणमधील सर्वे क्रमांक ४४४/८ मधील २,४५० चौ. मी. जमीन रोहन हरमलकर व इतर संशयितांनी षडयंत्र रचून हडप केल्याचा आरोप आहे. झालेल्या व्यवहारानुसार, ही जमीन डिसोझा कुटुंबाच्या नावावर करून २८ जानेवारी २०१९ रोजी हरियाणामधील आकाश व सीमा चौधरी यांना विकण्यात आली होती.

दुसरी तक्रार बार्देशचे तत्कालीन निबंधक अर्जुन शेट्ये यांनी म्हापसा पोलीस स्थानकात दिली होती. त्यात हणजूण येथील सर्वे क्रमांक ४२६/५ मधील जमीन हडप केल्याचे म्हटले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर हे प्रकरण एसआयटीकडे वर्ग करण्यात आले. 

वरील दोन्ही प्रकरणांत रोहन हरमलकर यांना विविध न्यायालयांनी सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. आता  ईडीने त्याला अटक करून १४ दिवसांची कोठडी मिळवली आहे.

हेही वाचा 

जमीन हडपप्रकरणी रोहन हरमलकरची १००० कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रे जप्त

* राजकीय नेत्यांच्या जमीन गुंतवणुकीत रोहन मध्यस्थ!

संशयित ‘नॉट रिचेबल’; कारवाईने राजकारण्यांचेही धाबे दणाणले

* जमीन हडप : रोहन हरमलकरला एका प्रकरणात सशर्त अंतरिम अटकपूर्व जामीन


हेही वाचा