रेश्मा वाडेकर हीच कोकेनच्या आयातीचा स्रोत जाणण्याचे साधन!

अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला वाडेकर दांपत्याचा जामीन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21 hours ago
रेश्मा वाडेकर हीच कोकेनच्या आयातीचा स्रोत जाणण्याचे साधन!

पणजी : संशयित रेश्मा वाडेकर हिने विदेशात प्रवास केल्याचे पुरावे गुन्हा शाखेने सादर केले आहेत. याशिवाय भारतात कोकेन कुठून आणला गेला हे उघड करण्यासाठी सर्वांत योग्य व्यक्ती म्हणजे संशयित रेश्मा वाडेकर आहे, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने मंगेश आणि रेश्मा वाडेकर या दाम्पत्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. याबाबतचा आदेश मडगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायाधिश पूजा कवळेकर यांनी दिला आहे.

गुन्हा शाखेने ड्रग्ज तस्करी प्रकरणी १४ एप्रिल २०२५ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, चिकोळणा - बोगमोळो येथे ड्रग्जची तस्करी होणार असल्याची माहिती गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. याची दखल घेऊन निरीक्षक लक्षी आमोणकर आणि प्रशल नाईक देसाई यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक प्रगती मळीक व इतरांनी सोमवार, दि. १४ एप्रिल रोजी चिकोळणा बसस्थानक परिसरात छापा टाकून ४३.२० कोटी रुपयांचे ४.३२ किलो कोकेन जप्त केले होते. त्यावेळी पोलिसांनी प्रथम निबू व्हिन्सेंट याच्यासह मुख्य संशयित रेश्मा वाडेकर आणि तिचा पती मंगेश या तिघांना अटक केली होती. या प्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, रेश्मा वाडेकर विदेशात गेल्याचे समोर आले. तसेच ती ३१ मार्च रोजी लाओस येथून दिल्ली विमानतळावर उतरून गोव्यात आली. तिने येताना वरील ड्रग्ज आणल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी रेश्माला विदेशात पाठविण्यासाठी प्रवास खर्च आणि व्यवस्था करणाऱ्या अहमदाबाद - गुजरात येथील चिराग रमेशभाई डुधात यालाही अटक केली. त्यानंतर वडोदरा - गुजरात येथे राहणारा तारिरो ब्राइटमोर मंगवाना या झिम्बाब्वेच्या नागरिकाला अटक केली. याच दरम्यान संशयित मंगेश आणि रेश्मा वाडेकर या दाम्पत्यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून दोघांचा जामीन फेटाळून लावला.

चिकोळणा येथे ४३.२० कोटींचे ड्रग्ज केले होते जप्त

गुन्हा शाखेने दि. १४ एप्रिल रोजी चिकोळणा बसस्थानक परिसरात छापा टाकून ४३.२० कोटी रुपयांचे ४.३२ किलो कोकेन जप्त केले होते. त्यावेळी पोलिसांनी प्रथम निबू व्हिन्सेंट याच्यासह मुख्य संशयित रेश्मा वाडेकर आणि तिचा पती मंगेश या तिघांना अटक केली होती. 

हेही वाचा