खोदून ठेवलेले रस्ते हॉटमिक्स डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत
केपे : कुडचडे काकोडा पालिकेच्या प्रभाग दोनमधील रस्त्यांची स्थिती बिकट झाली असून या प्रभागाचे नगरसेवक प्रसन्ना भेंडे यांनी नगराध्यक्ष पदाचा ताबा घेऊन सुद्धा प्रभागाच्या विकास कामांकडे ते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
कुडचडे मतदारसंघात भूमिगत वीज वाहिनीसाठी सर्व प्रभागातील रस्ते गेल्या चार वर्षांपासून खोदून ठेवले आहेत. प्रभाग क्र. दोनमधील भूमिगत वीज वहिनीचे काम संपून कित्तेक महिने उलटले आहेत पण खोदून ठेवलेल्या रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण केले जात नसल्याचे विनोद नाईक यांनी सांगितले.
प्रसन्ना भेंडे हे नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर आता चार वर्षे होत आली आहेत. पण त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकही काम या प्रभागात मुख्य करून कामराळ, देवलेमळ, अस्तेमळ याभागात केले नाही असेही नाईक यांनी सांगितले.
कामराळ येथे रेल्वे अंडरपासचे फक्त आता रुंदीकरण करण्यात आले आहे. उंची तशीच ठेवली असल्याने रेल्वे रुळाच्या खालील रस्तयावरून जाणाऱ्या वाहनचालकांना आजही पूर्वीसारखाच त्रास सोसावा लागत आहे, असे नाईक यांनी सांगितले. रुग्णांना आणण्यासाठी रुग्णवाहिका देखील या पुलाला अडकत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
यासह ग्रामस्थांना गावातील अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून त्याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. तसेच नगरसेवक भेंडे यांनी प्रभागातील विकास कामावर भर द्यावा असेही स्थानिकांनी सांगितले.