मडगावात ४ धोकादायक इमारतींवर हातोडा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : आठ दिवसांत कार्यवाहीचे सुतोवाच

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22 hours ago
मडगावात ४ धोकादायक इमारतींवर  हातोडा

मडगाव : मडगावातील दहा ते बारा धोकादायक इमारती सर्वेक्षणानंतर निश्चित करण्यात आलेल्या आहेत. त्यातील चार इमारती लवकरच पाडण्याची गरज आहे. त्यासाठी कोटेशन बेसिसवर निविदा घेऊन बांधकाम खात्याकडून पुढील आठ दिवसांत पाडण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

मडगाव पालिका मंडळ व त्यानंतर दक्षिण गोव्यातील अधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बैठका घेतल्या. यावेळी आमदार दिगंबर कामत, आमदार उल्हास तुयेकर, द. गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस, मुख्याधिकारी मॅन्यूएल वाझ व अधिकारी उपस्थित होते.  

मडगावातील कचरा व्यवस्थापनावर काम करण्यास सांगण्यात आलेले आहे. निधीसंदर्भात पालिका मंडळाच्या समस्या असून वित्त आयोगाच्या उर्वरित निधीचा वापर कशाप्रकारे करण्यात येऊ शकतो त्याबाबत सूचना केल्या. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कचरा हाताळणी करण्यासाठी काही नवी ई-वाहने घेण्यात येणार आहेत.

बेवारस गाड्यांवर आठ दिवसांत कारवाई

मडगाव येथील सार्वजनिक ठिकाणी रेंट अ कार व रेंट अ बाईक उभ्या करुन ठेवण्याचे प्रकार वाढलेले आहेत. वाहतूक पोलिसांसह आरटीओलाही यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय रस्त्याशेजारी उभ्या करून ठेवण्यात आलेल्या बेवारस गाड्यांना आठ दिवसांचा नोटीस वेळ देण्यात येईल. तरीही कारमालकाने गाडी न हटवल्यास पोलिसांकडून ती जप्त करत भंगारात काढण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.       

भिवपाची गरज ना : मुख्यमंत्री     

कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत विचारणा केली असता मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, सध्यातरी केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारचे निर्देश आलेले नाहीत. गोव्यातही कोविडच्या रुग्णांची संख्या जास्त नाही. त्यामुळे याआधी सांगितल्याप्रमाणे भिवपाची गरज ना, असे उत्तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.   

दुरुस्ती कामाचे ठेकेदाराला सूचना!

मडगाव व परिसरातील सांडपाणी वाहिन्या भूमिगत वीजवाहिन्या घातल्या जात असताना काही ठिकाणी फोडण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी समस्या निर्माण झालेल्या असून ठेकेदाराला तत्काळ दुरुस्ती काम हाती घेण्यास सांगण्यात आले. जलस्रोत खात्याला गटार व नाल्यांची साफसफाई हाती घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

सोनसडोत लवकरच नवा प्रकल्प   

मागील दीड ते दोन वर्षांत मडगावातील कचरा हाताळणी योग्यरित्या होत असून कचर्यावर प्रक्रिया करण्यात यश आले. सध्या सोनसडोत कचरा साठवणूक केली जात नाही. सोनसडो पूर्णपणे स्वच्छ करण्याचे काम केले आहे. त्याठिकाणी लवकरच अत्याधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.  

मंत्री गावडेंवरील प्रश्नांवर माैन   

कला अकादमीला दंड ठोठावण्यात आला आहे तसेच मंत्री गोविंद गावडे यांच्याबाबत पुढे कोणता निर्णय झाला अशाप्रकारचे प्रश्न केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोणतेही उत्तर न देता मडगावातील विकासकामांवर चर्चा सुरू असल्याचे सांगत हसतहसत या विषयाला बगल दिली.