गोव्यातील टॅक्सी सेवेबाबत महत्त्वाची बातमी

'जीसीसीआय'सह अन्य संघटनांचा मोठा निर्णय, वाचा...

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th June, 02:59 pm
गोव्यातील टॅक्सी सेवेबाबत महत्त्वाची बातमी

पणजी : ॲप आधारित टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी सरकारने जारी केलेल्या गोवा वाहतूक अग्रिगेटर नियमावली २०२५ ला राज्यातील विविध औद्योगिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचा (जीसीसीआय), गोवा स्टेट इंडस्ट्रीज असोसिएशन, वेर्णा इंडस्ट्रीज असोसिएशन, लघु उद्योग भारती, गोवा टेक्नॉलॉजी असोसिएशन अशा विविध संघटनांनी अॅपला पाठिंबा दिला आहे. या सेवेमुळे सामान्यांसह उद्योग क्षेत्राला फायदा होणार असल्याचे मत या संघटनांनी व्यक्त केले आहे.

याबाबत जीसीसीआयने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अ‍ॅप-आधारित टॅक्सी सेवा आता लक्झरी राहिलेली नसून ती एक गरज बनली आहे. उद्योग क्षेत्राची उत्पादकता नियमन केलेली ॲपआधारित टॅक्सी सेवा नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. राज्यातील पर्यटन, उत्पादन, रिअल इस्टेट, किरकोळ विक्री, लॉजिस्टिक्स किंवा अन्य सेवा क्षेत्रातील व्यवसायांना ॲप टॅक्सीचा विश्वासार्ह आणि सुरक्षित वाहतूक पर्याय उपयुक्त ठरेल.

अशी सेवा अत्यावश्यक सुविधा आणते, कामगारांची कार्यक्षमता वाढवते व व्यवसाय सुलभता सुधारून राज्यात अधिक गुंतवणूकदार अनुकूल वातावरण तयार करते. नवीन नियमावलीत डिजिटल वाहतूक सक्षम करून स्थानिक उपजीविकेचे संरक्षण करते. यातील चालकांना सरकार-अधिसूचित भाडे पूर्ण देणे, आरोग्य विमा, वाहन अनुदान तरतुदी महत्त्वाच्या आहेत. ॲप टॅक्सीमुळे खाजगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होईल. यामुळे रहदारी कमी होणे, प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.