हणजूण पोलिसांत परस्परविरोधी गुन्हा नोंद
म्हापसा : आसगाव येथील आपल्या मालमत्तेत जाण्यासाठी फाटकासमोर गाडीचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून महाराष्ट्रातील कुटुंब व स्थानिक युवकांत वाद झाला. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा हणजूण पोलिसांत नोंदवण्यात आला होता.
ही घटना बुधवार, दि. ४ रोजी सायंकाळी ६.३० ते ७ वा. सुमारास आसगाव येथे आक्वा सोल रिसॉर्टजवळ घडली होती. या प्रकरणी महाराष्ट्रातील काहीजण तसेच डॉ. इनासिओ, रिट्झ व जॉन यांनी परस्परविरोधी हा गुन्हा नोंदवला आहे.
डॉ. इनासिओ फर्नांडिस व महाराष्ट्रातील महिलेने तक्रार दिली आहे.
घटनास्थळी महाराष्ट्रातील कुटुंबाची मालमत्ता आहे. या मालमत्तेच्या फाटकासमोर ते कार घेऊन आले. मात्र, सुरक्षा रक्षक येत नसल्याचे पाहून त्यांनी वारंवार हॉर्न वाजवला. त्याबरोबर जवळच असलेले डॉ. इनासिओ व त्याचे मित्र आले. त्यांनी जोरजारोने हॉर्न का वाजवला जात आहे. यामुळे शेजारील लोकांना त्रास होत असल्याचे सांगून हॉर्न बंद करण्यास सांगिले. त्यावरुन त्यांच्यात वादावादी झाली. यावेळी डॉ. इनासिओ यांनी आपल्या मोबाईलवर घटनेचे चित्रीकरण घेण्यास सुरुवात केली.
हा व्हिडीओ शूटींग करणारा मोबाईल खेचून घेण्यावरून दोघांमध्ये झटापट झाली. नंतर संबंधितांनी डॉ. इनासिओ यांना व्हिडीओ डिलीट करण्यास भाग पाडले. पुढील तपास हणजूण पोलीस करीत आहेत.