मथुराः चोर झाडावरून आला आणि दागिन्यांची पर्स घेऊन पसार झाला

तपास करताना पोलिसांची दमछाक, मग 'असे' परत केले २० लाखांचे दागिने

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
9 hours ago
मथुराः चोर झाडावरून आला आणि दागिन्यांची पर्स घेऊन पसार झाला

मथुराः दैनंदिन घडणाऱ्या चोऱ्या, दरोड्याच्या घटना आणि चोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न याबाबतच्या बातम्या आपण नेहमीच वाचत असतो. पण मथुरेच्या वृंदावन या धार्मिक स्थळावर झालेली चोरी आणि ती चोरी करणारा चोर याविषयी तुम्हाला समजल्यावर हसावं की रडावं अशी तुमची अवस्था होईल. 

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अलीगढवरून वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात दर्शनासाठी अग्रवाल हे व्यापारी कुटुंब आले होते. दर्शनाच्या रांगेत या कुटुंबातील महिला उभ्या असताना एका महिलेच्या हातातील पर्स माकडाने हिसकावून घेत धूम ठोकली. धक्कादायक बाब म्हणजे त्या पर्समध्ये चेन, बांगड्या, झुमक्यांसह सुमारे २० लाख रुपये किमतीचे हिऱ्यांचे दागिने होते. त्यामुळे साहजिकच अग्रवाल कुटुंबाने माकडाचा पाठलाग केला. पण, ते माकड पर्स घेऊन मंदिरालगतच्या घराच्या छतावर चढले.



हा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या लक्षात आला. माकड तिथून पळून जात असताना काही लोकांनी त्या माकडाला फ्रुटी, लिची व इतर खाद्यपदार्थांचं अमिष दाखवून आपल्याकडे बोलावण्याचा प्रयत्न केला. मात्र, माकड काही घराचे छत सोडून खाली आले नाही.

दागिने घराच्या छतावर विखुरले
आजूबाजूचे लोक पर्स परत मिळवण्यासाठी माकडाकडे जात असताना, माकड एका छतावरून दुसऱ्या छतावर पर्स घेऊन पळून जात असे. सर्वांचे प्रयत्न संपल्यावर अखेर अग्रवाल कुटुंबासह उपस्थितांनी बांकेबिहारी पोलीस चौकीला घटनेची माहिती दिली. तोपर्यंत त्या माकडाने पर्स उघडून त्यातले सर्व दागिने घराच्या छतावर विविध ठिकाणी विखुरले.

आठ तासांच्या प्रयत्नानंतर दागिने हस्तगत
बांकेबिहारी पोलीस स्टेशनचे प्रभारी शिवकुमार शर्मा यांच्यासह पोलिसांची टीम घटनास्थळी आल्यावर त्यांनी माकडाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही माकड दाद देईना. शेवटी पर्समध्ये खाण्याचे कोणतेही पदार्थ नाही, हे लक्षात आल्यावर ती पर्स, दागिने घराच्या छतावरच टाकून माकड तिथून पसार झाले. आठ तासांच्या अथक परिश्रमानंतर, पोलीस पथकाने छतावरून हिऱ्यांचे दागिने गोळा केले आणि अग्रवाल कुटुंबाकडे सुपूर्द केले. हिरे आणि पाचूंनी जडवलेला एक हार, दोन अंगठ्या, दोन चेन, बांगड्या, झुमक्यांसह सर्व मुद्देमाल सुखरूप आहे हे पाहून अग्रवाल कुटुंबाने सुटकेचा निःश्वास सोडला. 

हेही वाचा