अपघातात अपंगत्व आलेल्या दावेदाराला २२.४६ लाख भरपाई द्या !

म्हापसा मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचा आदेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
7 hours ago
अपघातात अपंगत्व आलेल्या दावेदाराला २२.४६ लाख भरपाई द्या !
⚖️ अपघात आणि भरपाई: म्हापसा न्यायाधिकरणाचा महत्त्वाचा निकाल

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : म्हापसा मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने (लवाद) एका महत्त्वाच्या निकालात विनय ऊर्फ विनायक भिकाजी सावंत (रा. सावंतवाडा, आमोणा, डिचोली) यांना नो-फॉल्ट दायित्व रकमेसह २४.४६ लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. सावंत हे सावंतवाडा, आमोणा येथे झालेल्या बस अपघातात जखमी झाले होते आणि त्यांना त्यामुळे अपंगत्व आले होते.

या भरपाई दावा खटल्यात बसचा चालक व मालक प्रदीप सुहास नाईक (आमोणा) आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (डिचोली शाखा) यांना प्रतिवादी बनवण्यात आले होते.

📅 अपघाताची घटना

हा अपघात ३१ जुलै २०१३ रोजी रात्री १०.२० च्या सुमारास सावंतवाडा, आमोणा येथील बस थांब्याजवळ घडला होता. व्यवसायाने मासळी विक्रेते असलेले विनय सावंत हे जीए ०५ टी २७२७ क्रमांकाच्या प्रवाशी बसमधून माशेल ते आमोणा प्रवास करत होते. घटनेच्या वेळी बस थांब्यावर थांबल्यानंतर सावंत यांनी बसचा दरवाजा उघडला. त्याच क्षणी बस चालकाने अचानक बस रिव्हर्स घेतली, ज्यामुळे उघडलेल्या दरवाजातून विनय सावंत खाली कोसळले आणि त्यांच्या पायावरून बसचे चाक गेले. या अपघातात गंभीर दुखापत झाल्यामुळे गोमेकॉमध्ये त्यांच्यावर सात वेळा शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

💰 १० लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी

अपघातावेळी विनय सावंत ४४ वर्षांचे होते आणि मासळी विक्रीतून त्यांना मासिक १५ हजार रुपये उत्पन्न मिळत होते. या अपघातामुळे अपंगत्व आल्याने त्यांना १० लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी सावंत यांनी मार्च २०१७ मध्ये न्यायाधिकरणाकडे दावा याचिका दाखल केली होती. यामध्ये १ लाख रुपयांचा वैद्यकीय खर्च, ज्यात औषधांवर ६६ हजार ५५९ रुपये आणि इतर प्रवासी वाहतूक खर्चाचा समावेश होता, अशी माहिती त्यांनी दिली होती.

💡 महत्त्वाचे मुद्दे

  • अपघाताची तारीख: ३१ जुलै २०१३
  • जखमी व्यक्ती: विनय सावंत (अपंगत्व)
  • मागणी केलेली भरपाई: १० लाख रुपये
  • मंजूर भरपाई: २२ लाख ४६ हजार ५६० रुपये (६% व्याजासह)
  • शस्त्रक्रिया: गोमेकॉमध्ये सात वेळा
  • आदेश: विमा कंपनीला रक्कम स्टेट बँकेतील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाच्या चालू बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश.

👨‍⚖️ सुनावणी आणि न्यायाधिकरणाचा निर्णय

सुनावणीदरम्यान, न्यायाधिकरणाने असे निरीक्षण नोंदवले की या अपघातामुळे सावंत यांना ६० वर्षांपर्यंत म्हणजे अजून १६ वर्षे काम करण्याची संधी मिळाली असती. मात्र, त्यांना झालेल्या दुखापतीमुळे ३.३६ लाख रुपयांचे उत्पन्नाचे नुकसान झाले. तसेच, आयुष्यात आनंदी जीवन जगण्याची त्यांची संधी हिरावली गेली. न्यायाधिकरणाच्या पीठासीन अधिकारी शर्मिला पाटील यांनी मार्च २०१७ पासून वार्षिक ६ टक्के व्याजासह २२ लाख ४६ हजार ५६० रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला. प्रतिवादी विमा कंपनीला सदर रक्कम व्याजासह म्हापसा येथील स्टेट बँकेतील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाच्या चालू बँक खात्यात जमा करून न्यायाधिकरणास आणि दावेदाराला याची माहिती देण्याचे निर्देशही लवादाने दिले आहेत. याचिकादार दावेदारातर्फे अॅड. एस. नाईक यांनी, तर अॅड. एम. साळकर यांनी लवादाकडे युक्तिवाद केला.